डाव्या विचारांचा बुरखा फाडून त्याचे भेदक वास्तव जगासमोर मांडणारे प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत अभिजित जोग यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे हिंदुत्व विभागप्रमुख ओंकार मुळ्ये यांनी साधलेल्या संवादाच्या पूर्वार्धात डावा विचार आणि उजवा विचार म्हणजे काय, हे आपण समजून घेतले. त्याचबरोबर सकारात्मकतेच्या दिशेने होणार्या चळवळीत घुसखोरी करून ती ‘हायजॅक’ करायच्या डाव्यांच्या रणनीतीचाही जोग यांनी पर्दाफाश केला. आजच्या या मुलाखतीच्या उत्तरार्धात ‘सांस्कृतिक मार्सवाद’ म्हणजे नेमके काय? त्याचे आणि ‘वोकिझम’चे भारतीय संस्कृतीवर आक्रमण कशापद्धतीने होते? यांसारख्या काही प्रश्नांची अगदी सोप्या शब्दांत अभिजित जोग यांनी केलेली मांडणी प्रत्येकाला विचारप्रवृत्त करणारी अशीच!
‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकात ‘सांस्कृतिक मार्सवादा’चा वारंवार उल्लेख करण्यात आलाय. तेव्हा नेमके ‘सांस्कृतिक मार्सवाद’ म्हणजे काय?
पहिल्या मार्सवादामधील संघर्षबिंदू हा आर्थिक स्वरूपाचा होता. म्हणजेच, ‘भांडवलशाही विरुद्ध कामगार’, ‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ अशाप्रकारच्या एकमेव संघर्षाची कल्पना ‘मार्सवादा’त केली होती. जेव्हा त्यांनी ठरवले की, आपल्याला आता बंदुकीच्या नळीतून निघणारी कामगारांची क्रांती करायची नाही, तर आपल्याला संस्कृतीला बळ देणार्या संस्था पोखरून टाकायच्या आहेत आणि त्या उद्ध्वस्त झाल्या की, त्याआधारे आपल्याला कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम या तीन गोष्टी संपवायच्या आहेत. त्या एकदाच्या संपल्या की, संस्कृती कोसळून पडणार. संस्कृती कोसळली की, ‘कम्युनिझम’कडे लोक आकर्षित होणार. त्यामुळे त्यांनी एका संघर्षबिंदूऐवजी अनेक संघर्षबिंदू निर्माण केले. यातून संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी संघर्ष भडकवायला सुरुवात केली. उदा. पाश्चिमात्य देशात ‘वंश’ हा एक संघर्षबिंदू आहे. स्त्री विरुद्ध पुरुष, भाषा-भाषांमधील संघर्ष, असे अनेक संघर्ष डाव्यांनी निर्माण केले. यातून समाजाला विभाजित केले गेले. यामुळे पाश्चिमात्य जगात जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, ते एकाअर्थी ठरवून घडवण्यात आले आहे. संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर संघर्ष भडकावणे या संकल्पनेला ‘सांस्कृतिक मार्सवाद’ म्हणू शकतो.
संस्कृतीला बळ देणार्या संस्थांना नष्ट करणे, ही सांस्कृतिक मार्सवाद्यांची रणनीती असल्याचे तुम्ही म्हणता. यातून त्यांनी नेमके काय साध्य केले?
रशियामध्ये जी तथाकथित ‘कम्युनिस्ट क्रांती’ झाली, तिचादेखील मोठ्या प्रमाणात पराभव झाला. कार्ल मार्सच्या संकल्पनेनुसार; जेव्हा रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलण्यात आली, तेव्हा त्याचे कालांतराने पतन झाले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. उत्पादकता पूर्णपणे संपली होती. याचाच अर्थ ‘मार्सवादी’ विचारांनी अर्थव्यवस्था चालवण्याचा प्रयत्न केला, तर ती कधीच चालत नाही, हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. त्यादरम्यान, पडलेल्या दुष्काळातही अनेक लोकांचे हाल झाले. माणूस माणसाला खातोय, इथवर परिस्थिती पोहोचली होती. रशियातील लोकांची भूक भागवण्यासाठी मग अमेरिकेने आपला मदतीचा हात पुढे केला होता. कम्युनिस्ट जगतात एकीकडे या गोष्टी घडत असताना, दुसरीकडे पाश्चिमात्य जगतात मात्र खूप मोठी समृद्धीची लाट आली होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर उत्पादकता, वैज्ञानिक प्रगती, तंत्रज्ञान प्रगती या सगळ्या गोष्टी इतया झपाट्याने होत होत्या की, तिथे मोठ्या प्रमाणात समृद्धी नांदत होती. जगाच्या इतिहासात अशाप्रकारची समृद्धी यापूर्वी पाश्चिमात्य जगतात कधी निर्माण झाली नव्हती. हे डाव्यांना बघवणं शय नव्हतं. त्यामुळे त्यांना पाश्चिमात्य संस्कृती नष्ट करण्याच्या दिशेने आणखी जोमाने प्रयत्न सुरू केले. १९५६ सालादरम्यान सार्या जगासमोर कम्युनिस्ट राजवटींचे अक्षरशः धिंडवडे निघाले. त्यादरम्यान, ‘फ्रँकफर्ट स्कूल’च्या प्राध्यापकांनी असा एक नवा सिद्धांत निर्माण केला, ज्याच्या आधारावर त्यांनी ठरवले की, पाश्चिमात्य जगतात आता आपण तुटलेपणा आणि निराशेचे राज्य सुरू करायचे. त्यासाठी त्यांनी ‘क्रिटिकल थेअरी’ नावाचा एक सिद्धांत मांडला, ज्यात तीन विचारसरणींचा संगम होता;१) मार्सवाद, २) लैंगिकतेवर बंधन नाही आणि ३) वस्तुनिष्ठ सत्य व वस्तुनिष्ठ वास्तव असे काही नसते. याच्या आधारावर संपूर्ण विश्वात (विशेषतः पाश्चिमात्य जगतात) डाव्यांनी मोठी उलथापालथ केली. अमेरिकेतील ‘नॅरेटिव्ह’वर ताबा मिळवला. म्हणजेच, सर्वप्रथम शिक्षकांना शिकवणार्या संस्थांना लक्ष्य केले. या शिक्षकांच्या माध्यमातून हळूहळू डाव्या विचारसरणीचा इतरांच्या मनात शिरकाव होत गेला. पुरोगामीत्वाची व्याख्याच बदलून टाकली. यांचे मुख्य लक्ष्य होते, कुटुंबव्यवस्था. ती नष्ट करण्यासाठी त्यांनी चार गोष्टींचा वापर केला; अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिकतेचा अतिरेक, ‘ट्रान्स जेंडरिझम.’ यातूनच पुढे कुटुंबव्यवस्था, देशप्रेम संपवायच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. जगावर आलेले हे आजवरचे भयंकर आक्रमण आहे, असेच म्हणावे लागेल.
पाश्चात्त्य जगतात किंवा भारतातही डावे सत्तेत नाहीत. तरीही, त्यांनी आपले वैचारिक वर्चस्व कसे निर्माण केले?
ज्याअर्थी डाव्यांनी ‘क्रिटिकल थेअरी’मध्ये ठरवले की, वस्तुनिष्ठ सत्य आणि वस्तुनिष्ठ वास्तव असे काही नसते; त्याआधारे ‘मॉरल रिलेटिव्हिजम’ची थेअरी मांडली. म्हणून ते नैतिकतेची एक रेघ ओढतात आणि तुम्ही जर १०० टक्के त्यांच्या विचारांना मान्यता देत असाल, तर तुम्ही नैतिक ठरतात. त्यांच्या विचारांना जर विरोध केला, तर तुम्ही केवळ वैचारिक विरोधक नाही; थेट वाईट व्यक्ती ठरवले जातात. त्यातून पुढे तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी कुठलाही मार्ग वापरला, तरी त्यांच्यालेखी तो योग्य ठरतो. याला ’चांगुलपणावर एकाधिकारशाही’ असे संबोधता येईल. याचा दुसरा प्रकार म्हणजे आकर्षक मुखवटे; म्हणजे आतला चेहरा कसाही असता, तरी बाहेरील चेहर्याची लोकांना भूरळ पडते. तिसरे म्हणजे, शोषक आणि शोषितांचे विभाजन. यातले शोषक जे असतात, त्यांच्यावर अपराधित्वाची भावना लादली जाते. याविरुद्ध जे शोषित आहेत, त्यांच्यावर बळीची मानसिकता निर्माण केली जाते. आपल्या शब्दाचा शस्त्र म्हणून वापर करणे, ही गोष्टदेखील त्यांच्यात चालते. म्हणजे, ’सगळे मुस्लीम अतिरेकी नसतात; पण सगळे अतिरेकी मुस्लीम का असतात’ हा विचार आणि त्यामागचे विश्लेषण सुरू होणे खरे आवश्यक आहे. मात्र, ते होऊ नये, यासाठी डाव्यांनी एक शब्द बनवला ‘इस्लामोफोबिया.’ ‘इस्लामोफोबिया’चा शिक्का आपल्यावर बसू नये, म्हणून लोक घाबरतात. अशा पद्धतीने राजकीय सत्ता जरी नसली, तरी वैचारिक दहशत निर्माण करून त्यांनी या गोष्टी घडवून आणल्या आहेत.
वैचारिक आक्रमणाविषयी भारतीय समाजामध्ये अजूनही म्हणावी तितकी जागरूकता का दिसून येत नाही? तुम्हाला यमागची कारणे काय वाटतात?
या सर्व गोष्टी सर्वसमावेशकतेसाठी केल्या जाताहेत, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे लोक आनंदाने त्यामध्ये सहभागी होतात. मात्र, एखाद्या गोष्टीशी सहमत नसल्याचे आपले अधिकार आपण त्यांच्या स्वाधीन करतोय, हे लक्षातच येत नाही. म्हणून जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे. जाणीव-जागृती झाली तर नक्की काय घडतंय, हे कळेल. जोपर्यंत ते कळणार नाही, तोपर्यंत आपण त्याचा प्रतिकार करू शकणार नाही. ०.२ टक्के लोक हे जन्मतःच ‘ट्रान्सजेंडर’ असतात. भावनिक दृष्टिकोनातून योग्य समुपदेशन करण्याची त्यांच्यात फक्त आवश्यकता असते.
‘सांस्कृतिक मार्सवाद’ किंवा ‘वोकिझम’चे भारतीय संस्कृतीवरही आक्रमण होत आहे, असे तुम्ही म्हणता. हे नेमके सर्वसामान्यांनी कसे ओळखावे?
डाव्या विचारसरणीचा हा हल्ला संस्कृतीवरील हल्ला आहे. त्यामुळे कुठल्याही देशात जो मुख्य सांस्कृतिक प्रवाह असतो, त्याच्यावर हे लोक हल्ला करून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रमुख सांस्कृतिक प्रवाह ‘ख्रिस्ती’ आहे. त्याचप्रमाणे भारतातील प्रमुख सांस्कृतिक प्रवाह ‘हिंदू धर्म’ आहे. भारतातील डाव्यांचा हल्ला हा मुख्यत्वे हिंदू धर्मावर असतो. त्यासाठी त्यांच्याकडे चार ’डी’ आहेत. पहिला - ’डी हिंदुलायझेशन’, म्हणजे हिंदू धर्मापासून लोकांना दूर करायचे. आदिवासी, लिंगायत हे हिंदू नाहीत, असा अपप्रचार करत राहायचा. अशाप्रकारे हिंदू धर्मातील विविध गटांना दूर करायचे, हा पहिला भाग. दुसरा - ‘डिसॅफेशन’, म्हणजे आपल्या धर्माबद्दल प्रेम, आपुलकी, आदर वाटू नये यासाठी प्रयत्न करायचा. मग प्रश्न- शंका निर्माण करायच्या. संस्कार, चालीरीती, सांस्कृतिक गोष्टी, आठवणींबद्दल भ्रम निर्माण करायचा. यातून संस्कृतीबद्दल एकप्रकारची निराशा तयार झाली की, मुळांपासून तोडून टाकणे सोपे होते. तिसरा मुद्दा ‘डिव्हाईड’, म्हणजे जास्तीत-जास्त जणांना विभाजित करा. भारतात जाती, भाषा, धर्मावरून आधीच संघर्ष सुरू आहेत. वामपंथी लोक भारत आणि हिंदू धर्म यांच्याशी शत्रुत्व असलेल्या इतर शक्तींशी युती करतात. मग, एकदाचे विभाजन झाले की, नष्ट झालातच म्हणून समजा. ‘इवॅन्जेलिकल चर्च’, ‘अमेरिकन डीप स्टेट’ यांसारखे ‘ब्रेक इंडिया फोर्सेस’चे घटक एकत्र येऊन भारताला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यामागची वैचारिक पेरणी ही ‘सांस्कृतिक मार्सवादा’ने केलेली असते. यालाच भारतात ‘अर्बन नक्षल’ असेही म्हणतात. दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरण पाहिल्यास आरोपींविषयी चर्चा करण्याऐवजी हा स्फोट सरकारने घडवून आणला का? त्याचे बिहार निवडणुकीशी काही कनेशन होते का? आरोपी असलेले डॉटर लहानपणी कसे हुशार होते... असे प्रश्न निर्माण करून त्यांनी केलेल्या कृत्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न डावे लोक करत असतात. ही त्यांची कार्यपद्धती आहे. ज्यांना याची कल्पना नसते, ते लवकर याला बळी पडतात.
‘डावी वाळवी’ या पुस्तकातून वाचकांनी कोणता सर्वांत महत्त्वाचा संदेश घेऊन जावा, असे तुम्हाला वाटते?
जे आपल्याला दिसते, ते कुठलाही विचार न करता लगेच स्वीकारू नका. त्याचे पहिले विश्लेषण करा. कारण ‘दिसते तसे नसते’, हेही लक्षात ठेवले पाहिजे. अनेक गोष्टी अशा असतात, ज्या ‘सेल्फ प्रूव्हन’ आहेत, हे मान्य केले पाहिजे. म्हणजे स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजेत, हे आपण मान्यच करतो; परंतु जर स्त्रियांच्या हक्कांच्या आड लपून कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो आपण ओळखला पाहिजे. आजचे जग हे आभासी स्वरूपाचे झाले आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीवर अंधळा विश्वास ठेवू नका!