भारतीय सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते, बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी जीवनाच्या रंगमंचावरुन कायमची ‘एक्झिट’ घेतली. ६५ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय आणि निर्मितीतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या धर्मेंद्र यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा हा श्रद्धांजलीपर लेख...
धर्मेंद्र... कोणी म्हणतात ‘धरमजी’, ‘धरमपाजी’, कोणी पडद्यावरचा ‘ही मॅन’ म्हणून कौतुक करतात. कोणाला तुमच्यातील अष्टपैलूत्व भावते.
मला तुमची सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे, आपले माणूसपण, आपला चांगुलपणा. मला आठवतंय, ८० व ९०च्या दशकात आम्हा चित्रपट पत्रकारांना चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टिंगसाठी आमंत्रित करण्यात येत असे. जेव्हा आपली भूमिका असलेल्या ‘हुकुमत’, ‘एलान-ए-जंग’, ‘मर्दोवाली बात’, ‘धरम और कानून’ अशा चित्रपटांचे चित्रीकरण असेल, तर एक अनुभव कायमच येत असे; दिवसभराचे चित्रीकरण संपल्यावर स्टुडिओतून बाहेर पडण्यापूर्वी आपण एखाद्या कामगाराला आवर्जून जवळ बोलावून ५० वा १०० रुपयांची नोट त्याच्या हातात देत.
आपल्याला श्रद्धांजली वाहताना माझी प्रतिक्रिया होती, ‘मुंबईतील सुरू असलेल्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेल्या चित्रपट स्टुडिओतील कामगारांचा आपला नायक काळाच्या पडद्याआड गेला.’ आपणास खरी श्रद्धांजली हिच आहे. आपले किती चित्रपट ‘सुपरहिट’ झाले आणि किती अपयशी ठरले, यापलीकडे जाऊन आपली ही अतिशय वेगळी ओळख.
धर्मेंद्रजी, आपणास भारत सरकारच्या वतीने २०१२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने २०१८ साली ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, याचा आम्हाला विशेष आनंद झाला. १९९७ साली आपणास ‘फिल्मफेअर’च्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तेव्हा आपण कमालीचे भावूक झाला होता, हे आजही लक्षात आहे. आपणास खूपच उशिरा पुरस्कार प्राप्त होत आहे, अशी आपली प्रामाणिक भावना होती. पडद्यावरचा एकाच वेळेस पंधरा-वीस जणांना लोळवणारा नायक चक्क डोळ्यांत अश्रू येत बोलत होता. ‘गरम धरम’ ‘नरम धरम’ वाटला. हा खरा धर्मेंद्र दिसत होता. चित्रपटसृष्टीतील आपल्या दीर्घकालीन मेहनती, यशस्वी, अष्टपैलू व चौफेर वाटचालीसाठी आपणास असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
धर्मेंद्रजी, आपले बालपण पंजाब राज्यातील लुधियाना येथील. सर्वसामान्य भारतीय माणसाला शालेय वयात असते, तसेच आपणासही चित्रपट पाहण्याचे वेड. विशेषतः त्या काळात एकपडदा चित्रपटगृहात रांग लावून तिकीट मिळवण्याचे ‘थ्रील’ आणि मग चित्रपट पाहताना टाळ्या-शिट्ट्यांनी भरभरून त्याचा आनंद घेण्याची तुमची वृत्ती तुम्ही अनुभवलीत आणि कालांतराने तुम्हीच चित्रपट अभिनेता म्हणून कार्यरत असतानाही त्या आठवणी कायम जपल्यात, कधी अतिशय भावूकपणे व्यक्तदेखील केल्यात.
धर्मेंद्र, आपला जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावी झाला. आपले खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल. आपला जन्म एका जाट शीख कुटुंबात झाला.
आपण आपले सुरुवातीचे शिक्षण ‘लालटन कलान’ येथे केले. वडील सरकारी शाळेचे हेडमास्तर असल्यामुळे आपणास घरात शिक्षणाचे वातावरण मिळाले आणि आपले बालपण सहनेवाल इथेच गेले. पंजाब विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘फिल्मफेअर नवीन चेहरे’ स्पर्धेत आपण विजेते ठरलात आणि हाच आपल्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. येथूनच आपला मुंबईकडे येण्याचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच आपणास चित्रपटांची आवड होती. एकदा आपण सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर आपण सुरुवातीला एका गॅरेज आणि ड्रिलिंग फर्ममध्ये काम केले. त्यावेळी आपला पगार फक्त २०० रुपये होता.
अर्जुन हिगोरानी निर्मित व दिग्दर्शित ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या पहिल्या चित्रपटासाठी आपणास केवळ ५१ रुपये मानधन मिळालं होतं. निर्मात्यांनी आपणास बोलावलं आणि मानधनाविषयी चर्चा सुरू झाली. ऑफिसमध्ये एकूण तीन केबिन होत्या. तीन केबिनमध्ये तीनजण होते. प्रत्येकाने त्यांच्या खिशातून १७ रुपये काढले आणि आपणास ५१ रुपये दिले. या पहिल्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
तसं पाहिलं, तर आतापर्यंतची आपली तब्बल ६५ वर्षांची खणखणीत व उत्साही रुपेरी वाटचाल. सर्वच प्रकारच्या चित्रपटांमधून आपण विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत, आपला हा यशस्वी प्रवास सुरू ठेवला. त्यासाठी लागणारी क्षमता, कामात सातत्य ठेवण्याची सकारात्मक वृत्ती, अभिनयाशी असलेली बांधिलकी आणि आपल्या अभिनयातून जनसामान्य प्रेक्षकांना आनंद देण्याचा गुण ही आपली ठळक वैशिष्ट्ये. आपण दिलीपकुमार यांचे निस्सीम भक्त! एकदा त्यांनी आपणास आपल्या ‘पाली हिल’च्या बंगल्यावर आमंत्रित केले असता, दिलीपसाहेबांच्या लक्षात आले की, हिरवळीवर आपल्या गप्पा सुरू असतानाच, तुम्हाला कडायाच्या थंडीचा विलक्षण त्रास होत होता. त्यांनी लगेचच आपल्या घरातील शाल आपणास दिली. त्यात त्यांच्या प्रेमाची ऊबच आपल्यास लाभली, अशीच आपली प्रामाणिक भावना झाली. विशेष म्हणजे, आजही ती शाल आपण एक चांगली आठवण म्हणून जपून ठेवली.
आपण निर्मिती केलेल्या आणि अनिल शर्मा दिग्दर्शित ‘अपने’ या चित्रपटाच्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यात दिलीपकुमार व सायरा बानू यांच्या उपस्थितीत भावूक होत सांगितले, हे आठवतेय. चित्रपटसृष्टीतील झगमगाटात हा क्षण मनाला चटका लावून देणारा.
आपली रुपेरी प्रतिमा ‘ही मॅन’ अथवा ‘मारधाड हिरो’ अशी असली, तरी प्रत्यक्षात तुम्ही अतिशय भावूक, संवेदनशील व कुटुंबवत्सल असे माणूस. सर्वप्रकारची नाती जपणे, कुटुंबासमवेत सण व सोहळ्यात सहभागी होणे, गरजूंना तत्परतेने मदत करणे, ही आपली ठळक वैशिष्ट्ये होती.
आपल्या चित्रपटांच्या नावावर नुसती नजर टाकली, तरी आपण केवढीतरी विविधता दिली आहे, हे लक्षात येते. आपण खूपच मोठ्या प्रमाणावर चित्रपटांतून भूमिका साकारल्या. ती संख्या ३०० वगैरे आहे. त्यातील काही उल्लेखनीय चित्रपट सांगायचे, तर ‘बंदिनी’ (सामाजिक), ‘आई मिलन की बेला’ (प्रेमत्रिकोण), ‘सत्यकाम’ (आदर्शवादी), ‘नया जमाना’ (सत्यवचनी), ’फूल और पत्थर’ (साहसी नायक), ‘मेरा गांव मेरा देश’ (डाकूपट), ‘यादो की बारात’ (ही मॅन), ‘जुगनू’ (अॅशन हिरो), ‘शोले’ (डाकूपट, सूडपट), ‘चुपके चुपके’ (मिश्कील, खुमासदार), ‘दिल्लगी’ (हलका फुलका), ‘कब, यू और कहा’ (रहस्यमय), ‘अनुपमा’ (नायिकाप्रधान), ‘माँ’ (प्राणी-पक्षी चित्रपट), ‘शालीमार’ (विदेशी कल्पना), ‘कयामत’ (निगेटिव्ह भूमिका), ‘अलिबाबा और चालीस चोर’ (फॅन्टसी), ‘बगावत’ (ऐतिहासिक), ‘ड्रीम गर्ल’ (प्रेमपट), ‘चरस’ (गुन्हेगारीपट), ‘द बर्निंग ट्रेन’ (अपघाती), ‘एलान-ए-जंग’ (अतिरेयांचा पाडाव) असे कितीतरी प्रकारच्या चित्रपटांमधून आपण प्रेक्षकांसमोर आलात आणि ती वाटचाल अथकपणे सुरूच राहिली.
हेमा मालिनी यांच्यासोबत आपली विशेष जोडी जमल्याचे ठळकपणे अधोरेखित होते. ‘तुम हसी मै जवा’, ‘सीता और गीता’, ‘बगावत’, ‘आसपास’, ‘रझिया सुल्तान’, ‘आझाद’, ‘प्रतिज्ञा’, ‘दिल का हीरा’, ‘शोले’, ‘ड्रीम गर्ल’, ‘दिल्लगी’, ‘पत्थर और पायल’, ‘अलिबाबा और चालीस चोर’ अशा अनेक चित्रपटांतून आपण एकत्र भूमिका साकारलीय. राज कपूर यांच्या दिग्दर्शनातील ‘मेरा नाम जोकर’ या बहुचर्चित चित्रपटातूनही आपण भूमिका साकारलीय. आपण अगदी ‘कृष्णधवल’ चित्रपटापासून (‘अनपढ’, ‘देवरा’, ‘खामोशी’) कार्यरत होता. चित्रपटाचे स्वरूप बदलले, तसे आपण ’लाईफ इन अ मेट्रो’ अशा चित्रपटातून भूमिका साकारली. ’पोस्टर बॉईज’ या ग्रामीण विनोदी मराठी चित्रपटाच्या त्याच नावाच्या हिंदी रिमेक चित्रपटातूनही आपण भूमिका साकारली.
विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निर्मितीमागची आपली भावना व्यक्त करताना "मराठी चित्रपट आशयदृष्ट्या सरस व सकस असतात,” असे आपण कौतुकाने म्हटले होते. आपण ‘विजयता फिल्म’ या नावाची चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन करून ‘घायल’ (सनी देओल), ‘बरसात’ (बॉबी देओल) या चित्रपटांची निर्मिती करतानाच, मुलांना रुपेरी पदार्पणाची संधी दिलीत. त्यासह आपण ‘घायल’, ‘२३ मार्च १९३१ शहीद भगतसिंग’, ‘यमला पगला दीवाना’ इत्यादि चित्रपटांची निर्मिती केली. जुहू समुद्र किनार्यालगत ‘सनी सुपर साऊंड’ हे मिनी थिएटर सुरू केले. आपल्याला चित्रपटसृष्टीने भरभरून दिले, त्याची आपण परतफेड केली हा गुण महत्त्वाचा!
आपले आपल्या मुलांवर व आपल्या मुली ईशा व आहना यांच्यावर बेहद प्रेम. त्यांचे पिता म्हणून आपणास केवढा तरी आनंद व अभिमान. आपण अभिनय वाटचालीत मराठी चित्रपट (हिचं काय चुकले), पंजाबी चित्रपट (‘काकण दे ओले’, ‘तेरी मेरी इक जिंद्री’ इत्यादि) प्रादेशिक चित्रपटांतून पाहुणा कलाकार अथवा विशेष कलाकार अशा भूमिका साकारल्यात आणि आपले अनुभवविश्व समृद्ध केलेत. आपण राजस्थानातील बिकानेर या लोकसभा मतदारसंघाचे २००४ ते २००९ या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. लोकसभेत काही प्रश्नही मांडले. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय अशा अनेक क्षेत्रांतून आपली वाटचाल सुरू राहिली.
‘श़ोले’ या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मी आपली काही महिन्यांपूर्वीच आपल्या जुहू येथील बंगल्यावर सदिच्छा भेट घेऊन आपणास माझ्या कलेशनमधील ’शोले’ची वृत्तपत्रीय जाहिरात, काही फ़ोटो, ‘हिचं काय चुकले’ या चित्रपटात आपण भूमिका केलेले फोटो दाखवले असता, आपण मनापासून दाद देत म्हणालात, "तस्वीरें बोलती हैं...” मोजयाच शब्दांत आपण खूप बोलतात.
आपण अनेक वर्षे ट्विटरवर प़ोस्ट करीत राहिलात, हे विशेष होय. कधी आपला जुना चित्रपट प्रदर्शित झाला त्या तारखेनुसार आठवणीत गेला, तर कधी आपण आपल्या लोणावळा-खंडाळा येथील फार्महाऊसवर शेतीत रमला, प्राणी-पक्षी यांच्यासह असलेली खास छायाचित्रे पोस्ट केलीत. त्यातून आपले वेगळेपण दिसून आले आणि ते आवडले.
आपली भूमिका असलेला शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ हा २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे आणि आपल्या अष्टपैलू अभिनयाचे कौतुक झालेला ‘शोले’ मूळ शेवटासह (लायमॅस) १२ डिसेंबर रोजी पुन्हा थाटात प्रदर्शित होत आहे, अशा वेळी आपण... असो. आपल्या अफाट लोकप्रियता आणि कार्यकर्तृत्वाने आपण आमच्यातच आहात.
सनी देओलच्या एका प्रामाणिक मताशी मी सहमत आहे, ‘आपल्यावर चरित्रपट (बायोपिक) निर्माण व्हायला हवा.’
धरमजी, आपण बरेच काही आहात, होतात...!