प्रेमात आकंठ बुडालेला प्रेमी किंवा बॉलीवूडच्याच भाषेत सांगायचं तर ‘आशिक’ आणि त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनालाही बरेचदा थेट स्पर्श करते. गेल्या काही काळात याच धाटणीचे चित्रपटही एकामागोमाग प्रसिद्ध झाले. ‘सैयारा’ असेल किंवा ‘एक दिवाने की दिवानीयत’, या चित्रपटांना प्रेक्षकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. याच धर्तीवर गेले अनेक दिवस चर्चेत असलेला ‘तेरे इश्क मे’ हा चित्रपटसुद्धा दि. २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल झाला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आनंद. एल. राय यांचा हा चित्रपट असून, सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि अभिनेत्री कृती सेनन चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. तेव्हा, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरला आहे की प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणारा आहे, ते जाणून घेऊया...
या चित्रपटाची कथा सुरु होते राजधानी दिल्लीत. शंकर गुरुक्कल (धनुष) हा ‘डीयूएसयू’ (दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ)चा अध्यक्ष. हिंसक, दबंग असा स्वभाव आणि स्वतःच्या भावनांवर विशेषतः रागावर त्याचा अजिबात ताबा नाही. अशा स्वभावासाठी कुप्रसिद्ध असलेला हा विद्यार्थी, तर दुसरीकडे मुक्ती (कृती सेनन) ही एक संशोधक असून, ‘पीएचडी’ वगैरे करणारी अत्यंत हुशार मुलगी. तिला तिच्या संशोधनातून हे सिद्ध करायचे आहे की, माणूस कितीही हिंसक असला तरी तो बदलू शकतो. माणसाच्या हिंसक स्वभावावरही वेगळ्या पद्धतीने मात करता येऊ शकते. यासाठीच तिला तिच्या संशोधनाकत्मक प्रयोगासाठी म्हणजेच ‘पीएचडी’च्या प्रबंधासाठी सापडतो तो शंकर.
प्रारंभी शंकर मुक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. संशयी नजरेने तिच्याकडे बघून, कटाक्षाने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्नही करतो. पण, तिच्या शांत स्वभावामुळे आणि प्रामाणिक दृष्टिकोनाने तो हळूहळू मुक्तीकडे आकर्षित होतो. तिच्यासोबत वेळ घालवताना एरवी गरम रक्ताच्या शंकरमधील माणूस जागृत होऊ लागतो. त्याच्या वागण्यात, नजरेत आणि स्वभावात घडणारा बदल खुद्द शंकरलाही जाणवू लागतो. मुक्ती तिची ‘पीएचडी’ पूर्ण करते, पण शंकरच्या मनाला मात्र एक मोठा धक्का बसतो. त्याला उमगते की, त्याच्या प्रेमाला मुक्तीच्या आयुष्यात अपेक्षित स्थान कधी मिळालंच नाही आणि मग कथा थेट सात वर्षे पुढे सरकते. त्यानंतर पुढे सुरू होणारा प्रवास, तुटलेलं मन, स्वप्नांची राख आणि नव्या भावनांचा उदय हे सगळं पुढे चित्रपटात पाहायला मिळतं. त्यामुळे हा चित्रपट एक भावनिक आणि गहन वळण घेतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद. एल. राय असून, त्यांनी यापूर्वी धनुषसह ‘रांझना’ हा चित्रपटसुद्धा केला होता, तर ‘रांझना’ची कथा लिहिणारे हिमांशु शर्मा यांना यावेळी नीरज यादव यांचीही साथ मिळाली आहे. या दोघांनी ‘तेरे इश्क मे’ चित्रपटाची कथा लिहिली आहे. ‘रांझना’ हा चित्रपट आज कित्येक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. ‘तेरे इश्क मे’सुद्धा प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील; पण चित्रपटाच्या कथेमुळे नाही, तर कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे. चित्रपटाची कथा मोठ्या पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शक म्हणून आनंद. एल. राय नक्कीच यशस्वी ठरले आहेत. अनेक दृश्ये त्यांनी अगदी उत्तमरित्या मांडली आहेत. पण, उत्तरार्धात चित्रपटाची कथा मात्र अक्षरशः प्रेक्षकांना डोयाला हात लावण्याची वेळ आणेल, अशीच म्हणावी लागेल. जी प्रेमकहाणी साधी, सरळ किंवा थोडीफार वेगळ्या धाटणीची होऊ शकली असती, तिला अगदीच काहीतरी वेगळे रंग देऊन, अफाट दाखवण्याच्या प्रयत्नांत ती प्रेक्षकांच्या पूर्णपणे डोयावरुनच जाण्याची शक्यता अधिक.
संपूर्ण चित्रपटात तर्कशुद्धतेचा अगदी प्रकर्षाने अभाव जाणवतो. आता बॉलीवूडचे चित्रपट हे डोकं बाजूला ठेवूनच बघायचे असतात, असा एक समज असला तरी प्रेक्षकांना किती गृहित धरावं, याचीही काही मर्यादा असायला हवीच की! म्हणजे एखादी अपूर्ण प्रेमकथा पूर्ण होऊ न शकणं, हे ऐकायला अगदी हृदयस्पर्शी वाटत असलं, तरी पडद्यावर या कथानकाची मांडणी करताना तर्क आणि वास्तवाचा संतुलित विचार हा करावाच लागतो, जो या चित्रपटात जणू वगळण्यातच आला आहे. विशेषतः जेव्हा कथेत भारतीय वायुदल आणि नौदलाचा उल्लेख येतो, तेव्हा तर्क, वास्तविकता यांची गरज अधिकच जाणवते.
‘सिनेमॅटिक लिबर्टी’चा विचार केला, तरीही बर्याच गोष्टी या पचनी न पडणार्या अशाच. कदाचित ‘रांझना’ आणि इतर चित्रपटांनी गाठलेली उंची, यामुळे राय आणि नीरज यादव यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फारच जास्त वाढलेल्या असू शकतात. तरीही ‘उत्कट प्रेमकथा’ हा प्रकार प्रभावीपणे दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतो. चित्रपटाचा पूर्वार्ध हा खरोखरच प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवतो. तसा ‘उत्कट प्रेमकथा’ मांडण्यात आनंद. एल. राय यांचा हातखंडा. ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘रांझना’ नंतर या चित्रपटातही त्यांची जिद्दी, वेड लावणारी प्रेमकथेची छाप उमटलेली दिसते.
अभिनयाविषयी बोलायचे तर धनुष हा चित्रपटाचा सर्वांत मोठा आधारस्तंभच म्हणावा लागेल. त्याच्या चेहर्यावर उमटणार्या भावना, डोळ्यांत दिसणारी वेदना आणि राग प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. कृतीनेही तिची बिनधास्त मुलीची भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. ‘मीमी’ चित्रपटानंतर कृतीचा उत्तम अभिनय या चित्रपटात पाहायला मिळतो. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात आश्चर्यचकीत करतो तो मोहम्मद झीशान अय्यूब. त्याची भूमिका लहान असली तरी ती सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडते. त्याच्या पात्रामुळे चित्रपटात वेगळी ऊर्जा निर्माण होते. झीशान आणि धनुष यांच्यातील एक खास दृश्य तर थेट मनाला स्पर्शून जाते. त्या दोघांमधली समज, संवादांची पकड आणि उत्कट भावनांची खोली चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.
याशिवाय धनुषच्या वडिलांच्या भूमिकेत प्रकाश राज दमदार उपस्थिती दाखवतात. त्यांची भूमिका लहान असली, तरी अत्यंत प्रभावी ठरली आहे. अनेकदा खलनायकाच्या रुपात असलेले प्रकाश राज इथे मात्र फार वेगळचं पात्र साकारताना दिसतात. याशिवाय अन्य कलाकारांनीसुद्धा आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या असून, हीच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल.
याशिवाय चित्रपटातील गाणीसुद्धा उत्तम झाली आहेत. पण, फार ‘हिट’ किंवा ‘सुपरहिट’ ठरावं असं काहीच नाही. ए. आर. रहमान यांच्या संगीतातून अपेक्षा खूप होत्या; पण ‘तेरे इश्क में’ आणि ‘जिगर ठंडा’ ही दोनच गाणी विशेष लक्षात राहतात. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे, सहकुटुंब पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. कारण, गरज नसताना कुठेही ‘बोल्ड सीन्स’ नाहीत. एकूणच काय तर, कथानकाचा थोडा समंजसपणे केलेला शेवट आणि उत्तम संगीताची जोड मिळाली असती, तर कदाचित हा चित्रपट यावर्षीचा ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट नक्कीच ठरला असता.
दिग्दर्शक : आनंद. एल. राय
लेखक : हिमांशू शर्मा आणि नीरज यादव
निर्मिती : कलर येलो प्रॉडशन आणि टी सीरिज
कलाकार : धनुष, कृती सेनन, मोहम्मद झीशान अय्युब आणि प्रकाश राज
रेटिंग : २.५ स्टार
- अपर्णा कड