कोवीदार ध्वज आणि धर्मपरंपरा

30 Nov 2025 14:26:45


Ayodhya Ram Mandir
 
मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी विवाह पंचमीच्या शुभ मुहुर्तावर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी परिसरातील दिमाखदार सोहळ्यात राममंदिरावर धर्मध्वज डौलाने फडकला. भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा आणखीन एक अध्यायच या धर्मध्वज रोहणाच्या सोहळ्याने रचला गेला. त्यानिमित्ताने या धर्मध्वजाचे माहात्म्य, त्यावरील कोविदार वृक्षाचे चिन्हसंकेत आणि एकूणच ध्वजाचे असलेली विविध संस्कृतींमधील स्थान याविषयी आजच्या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊया...

एखाद्या चिन्हाच्या छोट्याशा चित्रातून मोठा आशय सांगितला जातो. अशी कितीतरी चिन्ह आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. सहज बाहेर पडलो तर चौकातला लाल-पिवळा-हिरवा सिग्नल कधी थांबायचे आणि कधी चालायचे ते सांगतो. मर्सिडिझचा लोगो गाडीची ओळख सांगतो. खाद्यपदार्थांवरील हिरवा ठिपका तो पदार्थ शाकाहारी असल्याचे दर्शवतो. लाल क्रॉसचे चिन्ह दवाखाना किंवा औषधाचे दुकान सुचवतो. अशा लहानशा चिन्हांचा वापर करून माणूस मोठा संदेश अचूकपणे देऊ शकतो.

 
Ayodhya Ram Mandir

शुंग राजाच्या सैनिकाच्या हातात असलेला गरुडध्वज

असेच एक चिन्ह आहे - ध्वज. ध्वज हे एखाद्या देवाचे, राजाचे, राजघराण्याचे किंवा राष्ट्राचे चिन्ह असते. चिन्ह पाहिले की, ती देवता, राजा किंवा राष्ट्र बरोबर कळते. राष्ट्राचे आणि ध्वजाचे नाते इतके अतूट असते की, राष्ट्र म्हणजे त्याचा ध्वज आणि ध्वज म्हणजेच ते राष्ट्र! मग राष्ट्राला पूजा करायची असते, तेव्हा ध्वजाची पूजा केली जाते. ध्वजाला सलाम केला जातो. ध्वजाचा मान राखणे म्हणजेच राष्ट्राचा मान राखणे असे होते. राष्ट्राचे मूर्तिमंत रूप म्हणजे त्याचा ध्वज. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये - देशाचा ध्वज देशाचे प्रतिनिधित्व करतो. जर कधी शत्रूदेशाचा निषेध नोंदवायचा असेल, तेव्हा त्याचा झेंडा जाळला जातो. ध्वजाचा अपमान म्हणजेच त्या देशाचा अपमान केल्यासारखे असते. भारतातील जुन्या युद्धांमध्ये एखाद्याच्या रथावरील ध्वज पाडणे, हा त्या वीराचा मोठा अपमान समजला जात असे.
 
Ayodhya Ram Mandir 

विष्णूच्या भक्तांना प्रिय असलेले - गरुड आणि हनुमान - भारताबाहेरील विष्णू भक्तांमध्ये देखील अतिशय प्रिय होते. कंबूज देशाच्या म्हणजे कंबोडियाच्या खमेर घराण्यातील प्रसिद्ध राजा होता सूर्यवर्मा दुसरा. या विष्णुभक्त राजाने सर्वांत मोठे विष्णूचे मंदिर बांधले. त्या अंकोर वाट मंदिरात त्याने रामायणाची, महाभारताची, समुद्रमंथनाची चित्रे अंकित करवून घेतली. त्यामध्ये एक चित्र आहे राजाच्या मिरवणुकीचे. त्या मिरवणुकीमध्ये राजाचे दोन ध्वज दिसतात - कपिध्वज आणि गरुडध्वज!


जगभरातील विविध संस्कृतींनी असे ध्वज वापरले. ग्रीक, रोमन, पर्शियन, चिनी सर्व संस्कृतींनी वेगवेगळ्या ध्वजांचा खुबीने वापर केला. सर्वांत प्राचीन वाङ्मयामध्ये ऋग्वेदात आणि अथर्ववेदात ध्वजांचा उल्लेख येतो. अथर्ववेदात म्हटले आहे - देवांच्या सैन्याकडे सूर्यकेतू होता. अर्थात, त्यांच्या ध्वजावर सूर्याचे चित्र होते. जैन आणि बौद्ध धर्मात देखील ध्वज एक शुभचिन्ह मानले गेले आहे.

विष्णूचे वाहन असलेला, अफाट शक्तिशाली आणि वेगवान गरुड अनेक राज्यांचा ध्वज होता. विष्णुभक्त राजांनी गरुडध्वज फडकावला. गरुडासारखा शक्तिशाली आणि वेगवान असलेला हनुमानसुद्धा तितकाच लोकप्रिय होता. विष्णूचा अवतार असलेल्या रामाचे वाहन म्हणजे हनुमान. गरुडाप्रमाणे उडणारा हनुमान. राम ज्याचा आदर्श होता, त्या अर्जुनाच्या रथावर हनुमानाचा ध्वज होता. कृष्णाने गीता सांगितली ती हनुमंताच्या ध्वजाच्या खाली. अर्थात रामाच्या कृपाछत्राच्या खाली!

असा हनुमंताचा ध्वज अनेक राजांचा झेंडा होता. हा कपिध्वज रामाचा ध्वज आहे, रामाचे चिन्ह आहे. रामाच्या भक्तांनी असा कपिध्वज धारण केला.
Ayodhya Ram Mandir

 

 शीख राजा रणजीत सिंहाच्या ध्वजावर भैरव, दुर्गा आणि हनुमान दिसत आहेत. साहजिकच आहे, कारण पंजाबमध्ये लोकप्रिय असलेले रामायण सुद्धा हनुमंताने सांगीतलेले - हनुमान नाटक होते. तो वीर हनुमान राजा रणजीत सिंहाच्या ध्वजवर होता. या हनुमंताच्या कृपाछत्राखाली शिखांनी अफगाणी सैन्याशी, मुघलांशी अनेक युद्ध लढली.
 
ज्याचा ध्वज अर्जुनापासून सूर्यवर्मापर्यंत अनेक राजांनी हातात घेतला, त्या रामाचा ध्वज कसा होता? रामाच्या कोविदार ध्वजाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात आला आहे. रामायणात राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकुटच्या वनात होते. त्यावेळी भरत हत्ती, घोडे, रथ, सैनिक अशी चतुरंग सेना घेऊन त्यांना शोधायला आला. लक्ष्मणाने दुरून पाहिले - धूळ उडवत सैन्य येताना दिसत आहे. त्यात रथ आहेत. रथांवर ध्वज आहेत. आणि ध्वजांवर कोविदार वृक्षाचे चिन्ह आहे. म्हणजे हे सैन्य रघुवंशाचे आहे तर! भरत सैन्य घेऊन येत आहे! लक्ष्मणाने रामाला घाईघाईने येऊन सांगितले, "भरत, आपल्याशी युद्ध करायला सैन्य घेऊन येत आहे. हातात धनुष्य बाण घेऊन सज्ज हो रामा! हा कैकयीचा मुलगा आपल्याला वनात सुद्धा शांतपणे राहू देणार नाही, असे दिसते.” रामाच्या मनात मात्र भरताविषयी अशी शंका आली नाही. त्याने लक्ष्मणाला सांगितले की, भरत आपल्या भेटीला येत आहे. लक्ष्मण शांत झाला आणि लवकरच भरत भेटीचा प्रसंग घडला.

एष वै सुमहान् श्रीमान्

विटपी सम्प्रकाशते|

विराजत्य् उद्गत स्कन्धः

कोविदार ध्वजो रथे ॥ २-९६-१८

हा श्रीमान, भव्य, दिव्य असा कोविदार वृक्षाचा ध्वज रथावर स्थापित आहे.

 
Ayodhya Ram Mandir

 अगदी अलीकडे अनेक संस्थानांच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह होते. जसे या कोटा संस्थानाच्या ध्वजावर दिसत आहे.

रघुवंशातील राजे रथाला कोविदार वृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज लावत. कोविदार वृक्षाला मराठीत ‘कांचन’ म्हणतात. याला जांभळ्या किंवा गुलाबी रंगाची फुले येतात. असंख्य फुलांनी झाड बहरले की, त्यावर एकही पान दिसत नाही. आयुर्वेदात हा वृक्ष औषधी म्हणून वर्णीला आहे. अनेक विकारांवर उपयुक्त असलेला कांचन वैद्यांच्या नियमित वापरात असलेली औषधी आहे.

राम-रावण युद्धात रावण त्याच्या रथात आरूढ होऊन रणांगणात आला. त्याच्या रथावरील ध्वजावर मानवी शिराचे चित्र होते (ध्वजं मनुष्यशीर्षन्). कदाचित रावणाच्या ध्वजावर मानवी कवटी असावी असे वाटते. युद्धात लक्ष्मणाने बाण मारून त्याच्या ध्वजाच्या चिंध्या चिंध्या करून टाकल्याचे वर्णन वाल्मिकींनी केले आहे.

तैः सायकैर्महावेगै रावणस्य महाद्युतिः|

ध्वजं मनुष्यशीर्षन् तु तस्य

चिच्छेद नैकधा ॥ ६-१००-१४

 
Ayodhya Ram Mandir 

गुप्त सम्राट समुद्रगुप्तच्या नाण्यावर डावीकडे दिसणारा गरुडध्वज

राम-रावण युद्धात आधी रामाकडे वाहन नव्हते. रावण रथात आणि राम पायी असे युद्ध झाले. तेव्हा देव आपसात म्हणाले, "हे काही बरोबरीचे युद्ध नाही. रामाकडे पण रथ असायला हवा.” मग इंद्राने आपला रथ आणि सारथी पाठवला. या रथाला बारीक घंट्या लावल्या होत्या आणि त्यावर एका सोनेरी बांबूवर इंद्राचा ध्वज लावला होता. महाभारतात, अर्जुनाने रामाच्या ध्वजाखाली युद्ध केले होते, तर रामायणात, रामाने इंद्राच्या ध्वजाखाली युद्ध केले! आपला ध्वज आपल्याला शक्ती देतो. विजय देतो.

इतयातच रामजन्मभूमी मंदिरावर कोविदार ध्वजाची पुनर्स्थापना झाली. रामरायाच्या अयोध्येत पुन्हा कोविदार ध्वज झळकला, ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या ध्वजावर - सूर्य, ॐ आणि कोविदार वृक्ष आहेत. अनेक वर्षांनी रामाचा ध्वज पुन्हा फडकत आहे.

राम म्हणजे मूर्तिमंत धर्म. त्यामुळे रामाचा ध्वज हाच धर्माचा ध्वज आहे. सनातन हिंदू धर्माचा ध्वज आहे. हा ध्वज जेव्हा रामाच्या मंदिरावर चढवला गेला, तेव्हा हिंदू धर्माच्या ध्वजाचेच जणू आरोहण झाले आणि म्हणूनच हा क्षण एका यज्ञाची पूर्णाहुती असली तरी एका नवीन पर्वाची सुरुवात सुद्धा आहे. ही घोषणा आहे! रामराज्याच्या पर्वाची सुरुवात आहे. रामराज्यात प्रत्येकजण आपापले कर्म निष्ठेने, तत्परतेने, आनंदाने आणि कौशल्याने करतो. रामराज्यात सर्व प्राणीमात्रांसाठी हितकारक असलेलेच कर्म केले जाते.

सर्वे लक्षणसम्पन्नाः सर्वे धर्मपरायणाःदशवर्षसहस्राणि रामो राज्यमकारयत्|

उत्तम लक्षणांनी युक्त असलेली प्रजा, रामराज्यात धर्मपरायण असते. प्रत्येकजण- विद्यार्थी, शिक्षक, पालक, बालक, पती, पत्नी, राजा, मंत्री, सैनिक, शेतकरी, कामगार, मालक... प्रत्येक जण आपापल्या धर्माचे पालन करतात. त्या पर्वाची ही सुरुवात आहे. अशा रामराज्याचे सुजाण आणि धार्मिक नागरिक होण्याची शक्ती रामाचा कोविदार ध्वज आपल्याला देईल यात शंका नाही!

 - दीपाली पाटवदकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0