संघकार्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय

30 Nov 2025 11:36:51
 
Dinanath Champanerkar
 
प्रखर हिंदुत्व, अविरत संघकार्य आणि अटळ राष्ट्रभक्ती ही कै. दिनानाथ चंपानेरकर यांच्या आयुष्याची त्रिसूत्री होती. समाजात संघकार्य रुजविण्याबरोबरच आपल्या कुटुंबातही त्यांनी संघसंस्कारांची पखरण केली. अशा या संघसमर्पित व्यक्तिमत्त्वाच्या अनेेकविध आठवणी, अनुभव हजारो स्वयंसेवकांच्या आजही स्मृतिपटलावर कायम आहेत. एका सामान्य लोहार कुटुंबात जन्मल्यानंतरही, असामान्य कार्यकर्ता म्हणून उभे राहिलेले संघतपस्वी कै. दिनानाथ चंपानेरकर हे म्हणूनच संघकार्याच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय ठरले.
 
संघाचा परिसस्पर्श झाला आणि जीवनाचं सोनं झालं, अशी अनेक उदाहरणे आहेत. याच श्रृंखलेतलं एक नाव म्हणजे कै. दिनानाथ रामचंद्र तथा नाना चंपानेरकर. आडनावावरून तरी असं वाटेल की, हे नाव तथाकथित सवर्ण वर्गातील असेल; परंतु नानांचा जन्म मनोर (आताचे पालघर जिल्ह्यातील एक गाव) या गावी लोहारकाम करणार्‍या एका सामान्य कुटुंबात दि. १८ ऑगस्ट १९४९ रोजी श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी झाला. ‘चंपानेरकर’ हे आडनाव गुजरातमधील बडोद्याजवळील पावागडच्या पायथ्याशी असलेल्या ‘चंपानेर’ या गावाच्या नावावरून आलंय. इस्लामी आक्रमणात बर्‍याच गावांतून विस्थापित झालेली अनेक कुटुंबे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वसली, त्यातलंच एक मनोर.
 
लहानपणीचे ‘दिनू’ हे या कुटुंबातले नववे अपत्य. त्यांच्या पश्चात एक बहीण, असे एकूण मिळून पाच भाऊ आणि पाच बहिणी असे मोठे कुटुंब. नानांच्या वयाच्या तिसर्‍याच वर्षी वडिलांचे निधन झाले आणि घरची परिस्थिती एकदमच नाजूक झाली. नानांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. सकाळी शाळा आणि संध्याकाळी मोठ्या भावंडांना कामात मदत करायची, विळी-कोयत्यांना धार लावून देणे, भाता चालवणे, घण मारणे अशी कामे लहानपणापासूनच सुरू झाली.
 
या सगळ्या विपरीत परिस्थितीत भरपूर खेळायला आणि सवंगडी मिळण्याचे स्थान झाले ती गावात लागणारी संघाची शाखा. नानांची मुले सुरेंद्र आणि वीरेंद्र हे १९९८ मध्ये मनोर येथे विस्तारक होते. त्यावेळेस ते अनेकांना भेटले, जे म्हणायचे की, "दिनू नानांमुळे मी शाखेत आलो, नाहीतर माझं काय झालं असतं.” नाना म्हणायचे, अगदी १००च्या संख्येत विठ्ठल मंदिरासमोर संघाची शाखा लागायची. नानांच्या पुढच्या आयुष्यात जी शिस्त, नीटनेटकेपणा, स्वाभिमान आणि जाज्वल्य असे हिंदुत्व हे सगळं रोज या संघाच्या शाखेत जाण्यामुळेच हळूहळू विकसित झाले.
 
घरातले वातावरण अगदीच वेगळं होतं आणि त्यामुळेच संघ शाखा ही त्यांच्यासाठी परिसस्पर्शाप्रमाणेच ठरली आणि त्यांनी हे त्याचवेळेस मनाशी पक्के केले असावे की, "मी संघाचे काम आजन्म करीन.” किंबहुना, भावंडांच्या अनास्थेतही त्यांनी इतया विपरीत परिस्थितीत आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. चंपानेरकर कुटुंबातले दिनू नाना पहिले ग्रॅज्युएट (बी.एससी.) झाले. या सगळ्यात त्यांची आई जानकीबाई यांचा खूप मोलाचा वाटा आहे. सर्वप्रकारच्या अडीअडचणीत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांना वाटत होतं की, आपला मुलगा चांगला शिकला आहे, आता तो चांगली नोकरी करेल आणि कुटुंबाची परिस्थिती थोडी चांगली होईल; परंतु दिनू नानांनी आपल्या मनाशी पक्के केले होते की, आयुष्यातली काही वर्षं तरी संघाचं पूर्णवेळ काम करायचं. म्हणून ते १९७२ रोजी संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले.
 
नानांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर तालुयात प्रचारक म्हणून आपले काम सुरू केले. या भागात जुने संघाचे कार्यकर्ते आजही नानांची आवर्जून आठवण काढतात आणि त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करतात. याचदरम्यान, १९७५ साली देशात आणीबाणी लादली गेली आणि संघाचे प्रत्यक्ष संघस्थानावर चालणारे काम बंद झाले. संघाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रचारक भूमिगत झाले आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात विविध प्रकारची कामे सुरू झाली. नानाही भूमिगत झाले. जे-जे नियोजन होत होतं, त्याचे जमिनीस्तरावर क्रियान्वयनाचे काम नाना बघत होते. पत्रकवाटप असो, विविध ठिकाणी होणारे सत्याग्रह असो, या सगळ्याचं नाना नियोजन करत असत आणि स्वयंसेवकांच्या पालकांना धीर देऊन क्रियान्वयन नीट होईल, असं बघत होते.
 
त्याकाळात संघकामाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्राची स्थिती आव्हानात्मकच होती. त्यामुळे निवास, भोजनाकरिता खूपच मर्यादित घरं होती. अशाच एका घरी जेवण झाल्यानंतर नानांना दक्षिणा म्हणून सव्वापाच रुपये ठेवले, नानांनी खूप विरोध केला; पण त्या माऊलीने काहीच ऐकलं नाही. नाना विचार करत होते, "मी खरंच या दक्षिणेसाठी पात्र आहे? काय करू?” त्यांना काहीच कळत नव्हतं. शेवटी त्यांनी ती दक्षिणा स्वीकारली आणि मनोमन विचार केला, इतया दिवस बर्‍याच वेळा पायी प्रवास होत आहे, काही दिवस तरी थोडा गतीने प्रवास करता येईल.
 
पुढे बारामतीमध्ये आणीबाणीविरोधात जनजागृती म्हणून पत्रके वाटत असताना नानांना पोलिसांनी पकडले आणि त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात झाली. जशी ही बातमी नानांच्या आईंना समजली, तशा त्या खूपच अस्वस्थ झाल्या. "माझा मुलगा तर चांगले काम करत होता, मग असं कसं काय झालं?” त्या मुलाला भेटायला नाशिक येथे गेल्या आणि नानाला म्हणाल्या, "बस झालं... तू इथून बाहेर पडलास की, थेट घरी येशील. माझी शपथ आहे तुला!!” आईने देव पाण्यात ठेवून आपल्या मुलाची आतुरतेने वाट बघितली. कारागृहातील वातावरण अगदीच वेगळं होतं. अगदी दीर्घकालीन संघ शिक्षा वर्गासारखं. रोज अधिकार्‍यांचे बौद्धिक वर्ग चालायचे. शारीरिक, चर्चासत्रे सगळं चालत होतं. नाना संघाचा घोषही इथेच शिकले. यादरम्यान, त्यांना समजले की, हे समाजवादी, कम्युनिस्ट जे लोकांना रक्तरंजित क्रांतीची भाषणं देतात; परंतु ते तर कारागृहात पाच-सहा महिन्यांतच निराशेच्या गर्तेत गेले होते. जेव्हा खरंच परीक्षेची वेळ आली, तेव्हा त्यांचं खरं रूप समोर आलं.
 
१९७७ मध्ये आणीबाणी उठल्यानंतर नागपूरहून नानांची सुटका झाली. आईला शब्द दिल्यानुसार नाना घरी आले. पिढीजात धंदा न करता, बी.एड. पूर्ण करून शिक्षक बनले. त्याचं मुख्य कारण होतं, संघकामासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा म्हणून.
१९८१ मध्ये नानांचं लग्न मुंबईतील मंगला विनायक खारकर यांच्याशी झालं. सासरी आल्यावर नाव बदलण्यात आलं - सौ. दीपा दीनानाथ चंपानेरकर, ज्या पुढे जाऊन ‘नानी’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. नानींना लक्षात आलं की, आपले ज्यांच्याशी लग्न झाले आहेत, ते काही सामान्य जीवन जगणारे व्यक्ती नाहीत. त्यामुळे त्यांनीही संघकाम समजून घेतलं आणि आपल्यापरीने संपूर्ण सहकार्य नानांना दिलं. याच कारणाने चंपानेरकरांच्या घरातील वातावरण एका आदर्श हिंदू घरासारखं होतं; जिथे संस्कार, स्वदेशी विचार, अनुशासन याची ठायीठायी प्रचिती येते. नाना-नानी या जोडप्याला एकूण तीन अपत्ये झाली. पहिली मुलगी वैशाली आणि त्यानंतर जुळी मुलं सुरेंद्र आणि वीरेंद्र.
 
जव्हार-मोखाड्यात संघकाम अधिक दृढ व्हावे, यादृष्टीने नानांनी मनोर येथील आपली नोकरी सोडली आणि जव्हार येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली; परंतु त्या काळात काँग्रेसी मानसिकता असलेल्या जव्हारच्या नेतृत्वकर्त्यांनी नानांना खूप त्रास दिला. कुठलेही ठोस कारण नसताना ‘मेमो’ मिळाला. ११ महिने पगार थांबवून ठेवला (त्याच कालावधीत जुळी मुलं झाली होती). अशा परिस्थितीत १९८४ साली सुरू झालेल्या राम मंदिर आंदोलनात नाना सक्रिय सहभागी झाले होते. या सगळ्या विपरीत परिस्थितीमुळे नानांना जव्हारची नोकरी सोडावी लागली आणि ते त्याच तालुयातील विक्रमगड येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. दर शनिवार-रविवार न चुकता नानांचा प्रवास होत असे.
 
नाना त्याकाळी नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्याचे अनुक्रमे जिल्हा सहकार्यवाह, कार्यवाह आणि संघचालक राहिले आणि तेही तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त काळ! या काळात पालघर जिल्ह्यात अनेक कामं उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जसे की, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एकल विद्यालय, छत्रपती शिक्षण मंडळ. नाना आपल्याबरोबर आहेत, हाच आधार अनेक कार्यकर्त्यांना विपरीत परिस्थितीतही काम करण्यासाठी ऊर्जा देत असे. नानांनी अनेक वर्ष संघ शिक्षा वर्गात शिक्षक, बौद्धिकप्रमुख, कार्यवाह या नात्याने काम केले.
 
नाना म्हणजे प्रखर हिंदुत्व! ते म्हणायचे, आपल्या भारत देशात आपण ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ या घोषणा नाही देणार, तर कुठे देणार. राम मंदिर आंदोलनात त्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले. दि. ६ डिसेंबर रोजी ज्यावेळेस विवादित ढांचा उद्ध्वस्त झाला आणि रामाचं छोटंसं मंदिर निर्माण झालं, तेव्हा विक्रमगडमध्ये त्यांनी मोठी रॅली काढून आनंद साजरा केला होता. त्यांचा इतिहासाचा अभ्यासही खूप होता. आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रचंड पराक्रमाची आठवण करून देत आपणही काम केले पाहिजे, याचे दाखले ते नेहमी द्यायचे. संघकाम हे त्यांना प्राणाहून प्रिय होतं. आपली मुले शिक्षणासाठी बाहेर राहायला लागल्यानंतरही त्यांचे पहिले वाय असायचे, "शाखेत गेला होतास का?” आणि उत्तर ‘नाही’ मिळालं की, म्हणायचे, "रोज वेळेवर जेवतोस ना?”
 
नानांच्या घरातले सगळेजण सक्रिय कामात राहिले. पत्नी नानी यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि ‘जनकल्याण समिती’चे काम केले आहे. मुलगी वैशाली ही ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’त पूर्ण वेळ राहिली. मुलगा वीरेंद्र सहा वर्षे संघाचा प्रचारक होता आणि दुसरा मुलगा सुरेंद्र गेल्या १५ वर्षांपासून प्रचारक आहे आणि सध्या कोकण प्रांताचा सहप्रांत प्रचारक आहे.
५० वर्षांपासून संघाचे अविरत काम करणार्‍या नानांचं शरीर थकलं होत, प्रवास करण्यात खूप कष्ट होत होते. त्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केली. अखेर, २०१९ मध्ये ते पालघर जिल्ह्याचे मा. संघचालक म्हणून कामातून मुक्त झाले.
 
काही महिन्यांतच त्यांना पोटाचा कॅन्सर असल्याचे लक्षात आले. खूप शेवटच्या टप्प्यावर असलेल्या या आजारामुळे त्यांचे पोट नेहमी दुखत राहायचे. जुलै २०२० मध्ये ऑपरेशन करून गाठ काढली गेली, पोट दुखणं बंदही झालं होतं; परंतु घरी परत आल्यावर आतल्या आत रक्तस्राव सुरू झाला. नाशिक येथे उपचारासाठी रुग्णालयात नेले; परंतु प्रकृती अजूनच ढासळत गेली. दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्याचा सर्व वृत्तांत सुरेंद्रने त्यांना सांगितला. ते प्रसन्न असल्याचे दिसते होते. ६ तारखेला सकाळी १०च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. संघाप्रति त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.
 
 
Powered By Sangraha 9.0