बालनाटयाला शास्त्रीय आधार!

30 Nov 2025 14:04:55
 
Children’s Drama
 
भारतीय शास्त्रामध्ये अनेक गोष्टींना वैज्ञानिक आधार सिद्ध करुन दाखवला आहे. मात्र, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आज भारतीय संस़्कृतीमधील अनेक चांगल्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करतो. वास्तविकपणे, दोन्ही संस्कृतीमधील उत्तमतेचा संगम साधणे अनिवार्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नाट्यकलेचाही उत्तम अभ्यास केला आहे. यामध्ये बालनाट्यालाही स्थान असून, त्यालाही शास्तीय आधार सिद्ध झाला आहे, त्याचा घेतलेला आढावा...
 
आजची नाट्य-सिनेसृष्टी पाश्चात्त्य संस्कृती आणि परंपरांचं अनुकरण करताना दिसते. आजचीच कशाला, अनेक वर्षांपासून आपण हेच कळत-नकळत करत आलो आहोत. कळत-नकळत पाश्चात्यांचेच गोडवे गात आलो आहोत. अर्थात यात वाईट असे काहीच नाही. भारतीय संस्कृती ही सातत्याने परिवर्तित होत राहिलेली आहे. चांगलं ते घेणारी आणि वाईट ते सोडून देणारी आहे. पण, असं करता-करता त्यांचं कसं आणि किती चांगलं सांगण्याच्या भरात, आपलं कसं जुनंपुराणं आणि काही अंशी कसं जुनाट, बुरसटलेलं आहे, असा समजच आपण करून बसलो.
 
नको त्या गोष्टीही त्यांच्याकडून आपण घेतल्या आणि आपल्या चांगल्या गोष्टी, आपण सहज विसरलो. हाच पॅटर्न आपल्याला बालनाट्यातही आढळून आला आहे. मग, त्यांचं कसं आधुनिक आणि चांगलं म्हणताना, आपल्याकडच्या ‘परिकथा’ कंटाळवाण्या कशा, हेच आपण गृहीतच धरलं आणि पाश्चात्त्य कलेकडे आपण आकर्षित होत गेलो. आपल्या भाषेत, राहणीमानात, परिवेशात, वागण्या-बोलण्यात त्याच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसू लागलं. मग, उत्तम संहिता असलेली, आपल्या मातीतली, भारतीय भाषेतील बालनाटकेही काही लिहिली आणि सादरही करण्यात आली. मात्र, मी ही शृंखला भेदण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकं बसवताना, संहिता निवडताना मी जाणूनबुजून आपले विषय निवडले आणि ते आपल्या भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला.
 
कारण विल्यम शेसपिअर आणि भरतमुनींचं ‘नाट्यशास्त्र’ वाचल्यानंतर असं लक्षात आलं की, आपले भरतमुनी खूप पूर्वी सखोल अभ्यास करून प्रकटले आहेत. त्यांनी केलेला सखोल अभ्यास आणि त्यातून आपल्याला मिळणारं नाट्यशास्त्राचं ज्ञान आजही किती वैज्ञानिक आणि मी तर म्हणेन आधुनिक आहे, याची जाणीव मला झाली. ‘नाट्यशास्त्र’ वाचत असताना एक श्लोक माझ्या मनाला भिडला आणि मी त्या पद्धतीने नाटकं लिहायला, बसवायला घेतली. त्याचबरोबर महाकवी कालिदासांनी रचलेला श्लोकही मी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेते. कारण मला वाटतं, बाल्यावस्थेत नाटक हे केवळ मनोरंजनक्षम नसून संस्कारक्षमसुद्धा आहे.
 
माझा विश्वास आहे की, भारतातील बालनाट्याच्या विकासासाठी आपण पाश्चिमात्य पद्धतींचे अंधानुकरण करू नये. तसेच केवळ आपल्याही परंपरेतच अडकून राहू नये. उलट, या दोन्ही जगातील श्रेष्ठ गोष्टींचा योग्य संगम करणं आवश्यक आहे. पाश्चात्त्य तंत्र, नाट्यशास्त्रीय पद्धती आणि उत्पादन व्यवस्थापनामुळे, बालनाट्याला व्यावसायिकता आणि संरचनात्मक शिस्त प्राप्त होते; परंतु त्यांचा भारतात उपयोग करताना, भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात विकसित झालेल्या आपल्या सखोल स्थानिक ज्ञानपरंपरेचं आधारभूत भान ठेवणं अत्यावश्यक आहे. भारतीय नाट्यपरंपरा ही केवळ अभिनयकौशल्य देत नाही, तर प्रेक्षकांसोबत होणार्‍या भावानुभूतीचं, सौंदर्यबोधाचं आणि आत्मानुभवाचं सर्वांगीण तत्त्वज्ञानही प्रदान करते आणि हिच तत्त्वे बालनाट्याच्या केंद्रस्थानी आहेत.
 
नाट्यशास्त्रातल्या खालील महत्त्वपूर्ण श्लोकात (अध्याय - ६, श्लोक - १०) नाट्यनिर्मितीतील या समग्र दृष्टिकोनाच्या सूत्ररूपाचं वर्णन झालं आहे.
 
रसः भावाभिनयधर्मैः वृत्तिप्रवृत्तिभिः
सिद्धिः स्वरागानरङ्गसङ्ग्रहः|
 
हा श्लोक प्रेक्षकांमध्ये रस, म्हणजे सौंदर्यबोध किंवा भावानुभव, कसा उद्भवतो याची संपूर्ण प्रकिया स्पष्ट करतो. श्लोकातील प्रत्येक घटक नाट्यनिर्मितीसाठी एक निश्चित मार्गदर्शक ठरतो.
 
१. (रसः) रस - नाट्यकृतीचा मुख्य उद्देश म्हणजे, प्रेक्षकांच्या अंतर्मनात विशिष्ट भावानुभूती निर्माण करणे.
 
२. (भावाभिनयधर्मैः) - रसाची उत्पत्ती भाव आणि अभिनय यांच्याच साहाय्याने होते. हे दोन्ही मिळून, कथानकातील भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची प्रमुख साधने आहेत.
 
३. (वृत्तिप्रवृत्तिभिः) - यामध्ये वृत्ती (नाट्यशैली) आणि प्रवृत्ती (प्रदेशानुरूप किंवा परिस्थितीनुरूप रूपांतर) यांचा समावेश आहे.
चार प्रकारांच्या वृत्ती : भारती (वाचिक/भाषिक तत्त्वप्रधान), कैशिकी (ललित, करुण, प्रेमप्रधान), सात्त्वती (ऊर्जस्वल, उदात्त) आणि आरभटी (युद्धप्रधान, धाडसी). या वृत्तीच्या माध्यमांतून नाट्यकृतीचे स्वरूप व भावसंचार निश्चित होतात.
प्रवृत्तीमुळे नाट्यकृती स्थानिक संस्कृती, प्रादेशिक भावविश्व आणि सामाजिक संदर्भांशी जुळवून घेतली जाते. या दोघांच्या संयोगातूनच सादरीकरणाचे रूप, स्वरूप आणि त्याची परिणामकारकता ठरते.
 
४. (सिद्धिः) - नाट्यकृती यशस्वी तेव्हाच ठरते, जेव्हा ती प्रेक्षकांच्या मनात अपेक्षित रस जागृत करते.
 
५. (स्वरागानरङ्गसङ्ग्रहः) - या संपूर्ण नाट्य प्रक्रियेचा उत्कर्ष स्वर (संगीतस्वर), गान (गायन), रंग (मंचरचना/मांडणी) आणि संग्रह (या सर्व घटकांचे सुसंवादी संयोग) यांच्या एकात्मतेतून साध्य होतो.
 
बालनाट्यात या श्लोकाचे महत्त्व : हा श्लोक बालनाट्यनिर्मितीसाठी एक समग्र, सौंदर्यशास्त्रीय आणि सांस्कृतिक आधार प्रदान करतो. पाश्चात्त्य पद्धती रचना, तंत्रज्ञान आणि नाट्य नियोजनाचे आधुनिक साधन देतात, तर ‘नाट्यशास्त्र’ नाट्याचे भावमूल्य, सौंदर्यरूप आणि प्रेक्षकांच्या मानसिक व भावनिक सहभागाची सूक्ष्म जाण देते. बाल प्रेक्षकांचं संज्ञान, कल्पनाशक्ती आणि भावविश्व अद्याप विकसित होत असतं. त्यामुळे नाट्यकृती त्यांच्यासाठी अर्थपूर्ण, संवेदनक्षम आणि सांस्कृतिकदृष्ट्याही जिव्हाळ्याची असणे आवश्यक ठरते. यामुळे बालनाट्य केवळ मनोरंजन न राहता, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा सर्जनशील अनुभव बनते. भारतातील बालनाट्याचं भवितव्य हे परंपरा आणि आधुनिकता यांच्या संघर्षात नव्हे, तर त्यांच्या सजग, सर्जनशील आणि समीक्षात्मक संयोगात आहे. पुढील श्लोक मुलांना नाट्याविषयी माहिती देतो
 
देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं ऋतुं चाक्षुषं|
रूद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा |
त्रैगुण्योभ्दवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते |
नाट्यं भिन्नरूचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम |
 
या श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणे ः देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं ऋतुं चाक्षुषं| अर्थात देव आणि ऋषी असं म्हणतात की, नाट्य ही एक दृश्य ऋतु (कला/उत्सव) आहे. मन मोहून टाकणारी, सर्व इंद्रियांना आनंद देणारी आणि सौंदर्याची अनुभूती देणारी कलाविधा.
 
रूद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा| अर्थात, शिव आणि पार्वती यांच्या संयोगातून नाट्याची निर्मिती झाली. यातील अभिनय (अंग, शब्द, मन, भाव) आणि रसात्मक अनुभव, हे दोन्ही त्याच्या दोन मूलभूत अंगरचना आहेत.
 
 नवी जीवन प्रतिबिंबित होतं. या जीवनात असंख्य रस, भावना, परिस्थिती, संघर्ष आणि अनुभव दिसतात; नाट्य हे त्यांचं प्रतिबिंब आहे.
 
नाट्यं भिन्नरूचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्| अर्थात, वेगवेगळ्या आवडी-निवडी, प्रवृत्ती, स्वभाव असलेल्या लोकांसाठी नाट्य हे अनेक अंगांनी विविध असलं, तरी एकच सामूहिक आराध्य आहे. म्हणजेच, प्रत्येकजण त्यात काही न काही आनंद, अर्थ किंवा आत्मानुभव शोधतो.
 
संक्षेपाने अर्थ : नाट्य ही देवांनी मानवजातीला दिलेली अशी कला आहे, जी दृश्य, श्राव्य (दृकश्राव्य) आणि अनुभूतींच्या माध्यमातून, जीवनाचं प्रतिबिंब दाखवते. ती शिव-पार्वतीच्या सर्जनातून जन्माला येते, त्रिगुणात्मक मानवी जीवनासारखीच बहुरंगी आहे आणि विविध आवडींच्या लोकांसाठी एकच समान भावानुभवाचं, मनोरंजनाचं आणि आत्मविकासाचं साधन बनते.
 
हा श्लोक का महत्त्वाचा आहे?
 
हा श्लोक नाट्यशास्त्राच्या उद्देशसिद्धीचा आधार स्पष्ट करतो:
 
नाट्य केवळ मनोरंजन नसून, विश्वचरित्राचं प्रतिबिंब आहे
 
नाट्य ही सर्वांच्या आवडी, अनुभव आणि भावविश्वाला स्पर्श करणारी, सार्वत्रिक कला आहे
 
नाट्याचं अंतिम ध्येय म्हणजे बहुविध मार्गांनी एकात्म अनुभव निर्माण करणं, जे आजच्या बालनाट्याच्या संकल्पनेशी पूर्णतः सुसंगत आहे.
 
महाकवी कालिदास यांनी, नाट्याचा अर्थ सांगणारा हा संस्कृत श्लोक रचला आहे. आमच्या बालनाट्य शिबिरांत प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला हा श्लोक म्हटला जातो. सुरुवातीचे काही दिवस मुलांना हा श्लोक सतत म्हणायला सांगितलं जातं. यामागील उद्देश हाच की, त्यांना एखाद्या भाषेतील शब्द उच्चारण्यासाठी त्या शब्दांचा अर्थ समजणं आवश्यक नसत हे समजणे. सुरुवातीला हा श्लोक त्यांना अगदी अनोळखी, जणू एखाद्या परकीय भाषेतलाच भासतो आणि त्यातील एकही शब्द त्यांना समजत नाही. मात्र, त्यातील ध्वनी, ताल आणि लय याधारे मुलं तो सहज पाठ करतात.
 
या प्रक्रियेतून मुलांना एक महत्त्वाची गोष्ट समजते. ती म्हणजे, छान बोलण्यासाठी आधी छान ऐकता आलं पाहिजे. श्रवण आणि ध्वनी अनुभवातूनच, बोलायला शिकण्याची पहिली पायरी घडते. अशाप्रकारे, नाट्य जगतामध्ये प्रवेश करताना ध्वनी अर्थापूर्वी येतो आणि ऐकणं, हीच अभिव्यक्तीची पहिली पायरी ठरते. इथून पुढे उचललेलं प्रत्येक पाऊल, हे बालनाट्याला वेगळ्या उंचीवर नेण्यास पात्र ठरतं.
 
 - रानी राधिका देशपांडे
 
Powered By Sangraha 9.0