सिनेविश्वाची ‘खाष्ट सासू’ हरपली, अभिनेत्री दया डोंगरेंचे निधन

    03-Nov-2025
Total Views |

मुंबई : मराठी सिनेविश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. अनेक वर्षे मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्याच आठवड्यात अभिनेते सतिश शाह यांचंही निधन झालं होतं. त्यानंतर आता दया यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. दया यांनी त्यांच्या अभिनयाने खाष्ट सासूची भूमिका अजरामर केली होती.

दया यांना घरातूनच अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला होता. १९४० साली पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री होत्या, तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या. तसेच त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या दया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असत. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) नाट्यशिक्षण घेतले, जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर दया यांनी बरेच चित्रपटसुद्धा केले.

मराठीत त्यांचे अनेक चित्रपट हे गाजले होते. ‘उंबरठा’ (१९८२) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. यानंतर ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची रुक्ष माती’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी-हिंदी चित्रपटांत त्यांनी नकारात्मक भूमिका, विशेषतः ‘खाष्ट सासू’च्या भूमिका साकारल्या. ‘तुझी माझी जमली जोडी रे’, ‘नांदा सौख्य भरे’ यांसारख्या मालिकांमध्येही त्या दिसल्या. ‘दौलत की जंग’ (१९९२) आणि ‘आत्मविश्वास’ (१९८९) सारख्या हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केले होते.

पण लग्नानंतर दया दिल्लीत स्थायिक झाल्या. तसेच पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी करिअर सुरू ठेवले. १९६४ पासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत त्यांनी १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये ‘गजरा’, ‘बंदिनी’ आणि ‘आव्हान’ यांसारख्या कार्यक्रमांसाठी काम केले. ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले. तसेच नाटकांमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता.

दया यांना दोन मुली आहेत. दोघीही विवाहित असल्याने मोठी मुलगी संगीता मुंबईत आणि धाकटी अमृता बंगळुरूमध्ये राहते. तर त्यांचे पती शरद डोंगरे यांचं २०१४ मध्ये अकस्मात निधन झाले होते. गेली अनेक वर्षे दया सिनेविश्वापासून लांब आहेत.