पाकिस्तान जगात सर्व स्तरांवरच बदनाम झालेला आहे. कधी कामगिरीमुळे, कधी कट्टरतेमुळे तर कधी नियमबाह्य वर्तणुकीमुळे पाकिस्तानला अपमान सहन करावा लागला आहे. मात्र, यावरुन सुधारेल तो पाकिस्तान कसला? ‘यथा राजा तथा प्रजा’या म्हणीनुसार पाकिस्तानी जनताही तशीच वागू लागली आहे. अशा या जपानमध्ये दाखल झालेल्या तोतया फुटबॉलपटूंच्या कबुतरबाजीची ही नुकतीच चर्चेत आलेली सत्यकथा...
पाकचे टोपणनाव : भारत-पाकिस्तान फाळणीनंतर आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (एएफसी)च्या राष्ट्रीय संघटनेत, भारतीय फुटबॉल संघांला ‘ब्लू टायगर्स’ हे टोपणनाव देण्यात आले. भारताच्या ध्वजावरील अशोकचक्र चिन्हावर असलेला निळा रंग, तसेच भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला बंगालचा वाघ यावरून हे टोपणनाव देण्यात आले. फाळणीनंतर गडद हिरव्या रंगावर एक चंद्रकोर आणि तारा असलेल्या ध्वज असलेल्या पाकिस्तानला ‘फाल्कन्स’ हे टोपणनाव मिळाले. पाकिस्तानमधून वेगळे झाल्यावर बांगलादेशच्या संघाला ‘एएफसी’च्या यादीत, बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या बंगाली वाघावरुन ‘बंगाल टायगर्स’ हे टोपणनाव मिळाले.
फाल्कन्सची स्थिती : पाकिस्तान १९४८ मध्ये ‘फिफा’चा सदस्य झाला आणि १९५४ मध्ये ‘आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन’मध्ये सामील झाला. फाल्कन्स अद्याप फिफा विश्वचषक अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले नाही. फाल्कन्सने दक्षिण आशियाई प्रदेशाबाहेर कधीही कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पात्रता मिळवलेली नाही, १९५० आणि १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला, पाकिस्तानचा फुटबॉलमध्ये उदय होत होता. परंतु, फुटबॉलची जागतिक लोकप्रियता अन्यत्र वाढू लागल्याने, पाकिस्तानमध्ये या खेळाची स्थिती खालावली. सुरुवातीच्या काळात मिळवलेला दर्जा, खेळ संघटनेच्या अभावामुळे आणि प्रशासनाचे फुटबॉलकडे लक्ष नसल्यामुळे राखता आला नाही. दक्षिण आशियातील क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे, फुटबॉलला पाकिस्तानमध्ये लोकप्रियता मिळविण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे.
पाकी कबुतरबाजी : कबुतरबाजीचे मराठीत दोन मुख्य अर्थ आहेत. १) एक म्हणजे आपल्याला परिचित असलेला अर्थ - कबुतरांना पाळणे, उडवणे, त्यांच्याशी संबंधित खेळ किंवा छंद जोपासणे. २) तर कबुतरबाजीचा दुसरा अर्थ म्हणजे, बेकायदेशीरपणे लोकांना परदेशात पाठवण्याच्या गुन्ह्यासाठी ‘कबुतरबाजी’ ही संज्ञा वापरली जाते. विशेषतः, मानवी तस्करीच्या संदर्भात हा शब्द विशेषतः पंजाबमध्ये प्रचलित आहे. तिथे अशा प्रकारच्या तस्करीला ‘कबुतरबाजी’ म्हटले जाते.
‘फाल्कन्स’ची परिस्थिती चांगली नसतानाही, ‘फाल्कन्स’चा संघ फुटबॉलमध्ये आपले नाव जिवंत ठेवण्यासाठी येन केन प्रकारेण धडपडतो आहे. त्यासाठी कबुतरबाजीच्या आहारी जात, त्या माध्यमातून फर्जी ‘फाल्कन्स’ला विदेशी स्पर्धेत सहभाग घेण्यासही पाठवले जात आहे. पण असे करताना दुसर्या बाजूने ’फाल्कन्स’ आपली बदनामी करून घेत आहे.
कथा फर्जी ‘फाल्कन्स’ची : या कबुतरबाजीचं एक ज्वलंत उदाहरण जगापुढे नुकतेच उघडकीस आलं. त्या फर्जी ‘फाल्कन्स’ची सत्यकथा आपण आता पाहू.
या कथेचा सूत्रधार असलेल्या मलिक वकासने, पाकिस्तानी लबच्या फुटबॉल पथकासह दि. १५ जून रोजी सियालकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून, जपानमधील कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी उड्डाण केले. या २२ खेळाडूंच्या पथकाने लबचा गणवेश परिधान केला होता. पाकिस्तानकडून सर्व इमिग्रेशन आणि सुरक्षा परवाने वगैरे सोपस्कार पार पाडल्यानंतर, जपानमध्ये यशस्वीरित्या पोहोचल्याबद्दल ते सारे आनंदी होते. या २२ खेळाडूंनी पाकिस्तानमधील इमिग्रेशन अधिकार्यांना पटवून दिले होते की, ते ‘गोल्डन फुटबॉल ट्रायल’ नावाच्या लबचे सदस्य आहेत. त्यांनी असेही सांगितले होते की, ते जपानी फुटबॉल लबसोबत काही सामने खेळतील आणि नंतर मायदेशी परततील. त्यांच्याकडे जपानला जाण्यासाठीचा व्हिसादेखील होता.
गुजरांवाला येथील एफआयए (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी)चे प्रादेशिक संचालक मोहम्मद बिन अशरफ यांच्या मते मलिक वकासने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, ’ते आणि त्यांच्यासोबत असलेले युवक दि. १५ जून रोजी पंजाबमधील सियालकोट जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खासगी एअरलाईन्सच्या ‘फ्लाईट एफझेड ३३८’मध्ये चढले, जिथे त्यांना मंजुरीनंतर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.’ मलिक वकासच्या मते, ’सर्व मुले क्रीडा गणवेशात होती आणि ते त्यांच्या गंतव्यस्थानाकडे वाटचाल करत असल्याच्या आनंदात होते.’ मलिक वकास म्हणतो की, ’मुले विमानात सेल्फी काढत आणि गप्पा मारत खुशीत होते. तथापि, जेव्हा ते जपानमधील कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (ओसाका) पोहोचले, तेव्हा इमिग्रेशन अधिकार्यांनी त्या सर्व २२ मुलांना इतर प्रवाशांपासून वेगळे केले आणि त्यांची कठोर चौकशी सुरू केली. त्यांची स्वतंत्र खोलीत वैयक्तिकरित्या मुलाखत घेण्यात आली.’
मलिक वकासने ‘एफआयए’ला सांगितले की, त्यानंतर जपानी इमिग्रेशन कर्मचार्यांनी सर्व मुलांचे पासपोर्ट घेतले, त्यांची क्रीडा कागदपत्रे त्यांच्याकडे ठेवली आणि त्यांची पडताळणी सुरू केली. काही अधिकार्यांनी फोन करायला सुरुवात केली, तर काहींनी त्यांची कागदपत्रे संगणकावर तपासायला सुरुवात केली. आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्ही निघू शकणार नाही, असेही सांगण्यात आले. पाकच्या काही लोकांनी जपानला जाण्यासाठी एक संपूर्ण बनावट फुटबॉल संघ तयार केला आणि त्यांनी या संघासाठी व्हिसादेखील मिळवला. जेव्हा जपानमधील अधिकार्यांना त्यांचा संशय आला, तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
पाकिस्तानच्याच राष्ट्रीय तपास संस्थेने (एफआयए) या मानवी तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे, ज्यामध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळाडू असल्याचे भासवून आणि जपानमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या युवकांचा समावेश होता. जे सर्वजण खेळाडू असल्याचे भासवत होते, त्या २२ फर्जी ’फाल्कन्स’ना जपानमध्ये अटक करून, त्यांना पुढील कारवाईसाठी स्वदेशी पाठवण्यात आले. हा गट पूर्णपणे फुटबॉल खेळाडूंच्या पोशाखात प्रवास करत होता आणि ‘पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन’शी (पीएफएफ) संलग्न असल्याचेही भासवत होता. त्यांच्याकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेले (बनावट) ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही होते.
फुटबॉल न येणार्यांचा फुटबॉल क्लब : या योजनेचा कर्ता-करविता पाकिस्तानच्या सियालकोटमधील पसरूर येथील रहिवासी मलिक वकास हाच आहे. त्याने ’गोल्डन फुटबॉल ट्रायल्स’ नावाचा एक बनावट फुटबॉल क्लब सुरू केला असून, प्रत्येक इच्छुकाकडून या प्रवासासाठी ४० लाख शुल्कही आकारले. दि. १५ सप्टेंबर रोजी गुजरांवाला येथील ‘एफआयए’च्या कंपोझिट सर्कलने, वकासलाही अटक केली. त्याच्याविरुद्ध आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वीही अनेक जणांना असेच जपानला पाठवले आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्याने १७ लोकांची जपानला जाण्याची व्यवस्था केली आणि जपानी लब, बोविस्टा एफसीचे बनावट आमंत्रण वापरून १५ दिवसांचा व्हिसाही मिळवला. त्यापैकी कोणीही आजवर परतलेला नाही. फर्जी ’फाल्कन्स’चा हा मानवी तस्करीचा दुसरा प्रयत्न मात्र आता असफल ठरला आहे.
डॉनचा फुटबॉल : हा लेख पाकिस्तानातील फुटबॉल व तस्करी याच्याशी संबंधित असल्याने, पाकिस्तानच्या एका डॉनचा फुटबॉलचा खेळ माझ्या डोळ्यांसमोर येतो. यानिमित्ताने त्या फुटबॉलची माहिती सहज वाचकांना सांगावीशी वाटते. आपल्या कुप्रसिद्ध दाऊदपेक्षाही खतरनाक समजला जाणारा, हा ४५-४६ वर्षांचा अंडरवर्ल्ड डॉन म्हणजेच उझैर बलोच होय. हा आज जरी तुरुंगात असला, तरी आतापर्यंत त्याने डॉनसारखे सगळे उद्योग केलेले आहेत. उझैर बलोच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पोलिसांच्याच वाहनातून पळवून नेऊन, त्यांचे अपहरण करीत असे. क्रूरतेचा कळस म्हणजे त्यांचे शिर तो धडापासून वेगळे करून, त्याने तो फुटबॉल खेळत असे. खरा डॉन कसा असतो याबद्दल सांगताना ही गोष्ट, पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वसअतुल्लाह खान यांनी एका वृत्तसस्थेला दिलेल्या मुलाखतीत वर्णन केली होती.
तस्करांनी शोधली नवीन वाट : जमिनीवरील मार्ग कडक झाल्यामुळे आणि गेल्या दोन वर्षांत, मध्य पंजाबमधील शेकडो तरुणांना बोट उलटण्याच्या अनेक घटनांमध्ये जीव गमावावा लागल्याने, मानवी तस्करांनी एक नवीन पद्धत शोधली आहे. ते आता बनावट कागदपत्रांचा वापर करून, लोकांना परदेशात पाठवत आहेत. गुजरांवाला येथे बॉडीबिल्डिंग, कुस्ती आणि वेटलिफ्टिंग हे लोकप्रिय खेळ आहेत, परंतु या खेळांच्या नावाखाली, मानवी तस्करीचे कोणतेही प्रकरण कधीही नोंदवले गेले नाही. या खेळांचे संघटन याबद्दल खूप कडक आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रवेश मिळण्यापूर्वी, खेळाडूंना कठोर चाचण्यांना सामोरे जावे लागते. पण फुटबॉल लबच्या नावाखाली युवकांना जपानमध्ये पाठवणे, हे एक धक्कादायक प्रकरण आहे. त्यामुळे याची चौकशी होणे आवश्यकच आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच खटला चालवला पाहिजे, कारण देशाचा सन्मान धोयात आहे. मानवी तस्करीच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवणारे पाकिस्तानी पत्रकार इबाल मिर्झादेखील तेच सांगत आहेत.
पाकिस्तानी क्रीडाविश्वातील तोतयागिरी उघडकीस आली म्हणून ठीक, नाहीतर पाकी क्रीडाक्षेत्रात असे कुठे काय काय घडत असेल, हे देवच जाणे. क्रीडेच्या नावाखाली आपल्या शेजारील देशातील युवकांना काय शिकवण मिळत आहे हे कळल्यावर, भारतीयांना खरंच थक्क व्हायला होत असेल आणि आपले युवक किती भाग्यवान आहेत, हे देखील लक्षात येत असेल ना! म्हणूनच आपण जे म्हणत असतो की, ‘मेरा भारत महान’ ते उगाच नाही.
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४