कचर्‍यातून ’पर्यावरण’ संतुलन

Total Views |
Waste management
 
आज भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन ही सर्वात मोठी समस्या आहे. याच आव्हानाला मानव, भूमी, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम साधत निसर्गऋण प्रणालीने डॉ. शरद काळे यांनी व्यावहारिक आणि टिकाऊ उत्तर दिले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी भारत सरकारने २०१३ साली त्यांना पद्मश्रीने गौरविले. आज ते गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अशा पद्मश्री डॉ. शरद काळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
 
  • विज्ञान आणि पर्यावरण ही सांगड घालण्याची तुमची आवड नेमकी कशी रुजली?
माझी सगळ्यात मोठी वैज्ञानिक गुरु माझी आई होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा होती. शाळेने खूप चांगले संस्कार केले. मुळामध्ये निसर्गात कचरा हा शब्द नाही. तो शब्द ‘रिसोर्स निसर्ग संपत्ती’ म्हणून वापरायला पाहिजे. माणसाच्या शरीरात २३ मूलद्रव्ये असतात. ही सगळी २३ मूलद्रव्ये आपल्या शरीराला गरजेची आहेत. ही २३ मूलद्रव्ये आपण जग सोडल्यानंतर पुन्हा मातीत मिसळतात. ती नवीन शरीराला उपलब्ध होतात. दिवसाला मुंबईमध्ये सहा हजार-आठ हजार टन कचरा निर्माण होतो. हे प्रत्येक शहरामध्ये घडते. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये ही मूलद्रव्य सगळी त्या डम्पिंग यार्डवर बंदिस्त होतात. निसर्ग पुन्हा त्यातून ती काढेलही, पण आपण ज्या परिस्थिती तिथे निर्माण केल्या आहेत, त्या वाईट आहेत. त्यामध्ये योग्य बॅटेरिया न वाढल्यामुळे त्यांचे पुन्हा रिसायकलिंग होणार नाही. यामुळे एक असंतुलन निर्माण होईल आणि ते असंतुलन आपल्याला परवडण्यासारखे नाही. कारण, सजीव सृष्टी ही त्या समतोलावरती अवलंबून आहे.
 
  • गोव्यातील साळीगाव कचरा प्रक्रिया प्रकल्प भारतात नावाजला. या प्रकल्पाचे यश नेमके काय?
 
डॉ. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते. त्यांना मी सांगितले की, हा प्रकल्प जर तुम्हाला यशस्वी करायचा असेल, तर एक-दोन गोष्टी कराव्या लागतील. एक हा प्रकल्प चालवण्यासाठी वेगळे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ लागेल. पंचायतीकडे ते देऊ नका, कारण त्यांना ते चालविणे अवघड होईल. यासाठी पर्रीकरांनी ‘गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन’ निर्माण केले आणि दुसरे की, त्या प्रकल्पामध्ये ज्या कचर्‍याची प्रक्रिया होती, ती प्रक्रिया करणार्‍या लोकांना आपल्याला दोन-तीन रुपये प्रतिकिलोग्रॅमप्रमाणे पैसे द्यावे लागतील. त्यांनी तेदेखील मान्य केले. गोव्यातील साळीगाव हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. तिथे १२५ मेट्रिक टन जैविक कचरा येतो. त्याचे आम्ही पूर्ण पुनर्रचक्रांकन करून एक प्रकल्प चालतो. आमचा गॅस आहे. त्याच्यात तिथे काम करणार्‍या ८० माणसांचा स्वयंपाक होतो आणि खत जे मिळते ते शेतकर्‍यांना किंवा आजूबाजूचे महाराष्ट्रातले शेतकरी घेऊन जातात. तो १२५ टन कचरा पूर्णपणे प्रोसेस होतो. हे साळीगाव प्रकल्पाचे यश म्हणावे लागेल. कारण गेली आठ-नऊ वर्षे हे सातत्याने घडत आहे. किती पैसे मिळतात हे महत्त्वाचे नाही, पण तेवढा कचरा डम्पिंगवर गेला नाही, साचला नाही. मात्र, अजूनही जेवढे यश त्याच्यात मिळायला पाहिजे, तेवढे मिळालेले नाही. प्रक्रिया होते, पण त्यातला प्लास्टिकचा कचरा सिमेंट प्लांटला जाळण्यासाठी पाठवावा लागतो. वास्तविक प्रत्येकाने ठरवले पाहिजे, मी ‘झिरो वेस्ट’ राहीन, माझे घर ‘झिरो वेस्ट’ असेल. कचरागाडीत कचरा टाकला, म्हणजे ‘झिरो वेस्ट’ नाही, तर तुम्ही गाडीत कचरा न टाकल्याने ‘झिरो वेस्ट’ होईल.
 
  • दैनंदिन जीवनमानात ‘झिरो वेस्ट’ कसे साधले पाहिजे?
 
अगदी सोपे आहे. मला तुमची फक्त १५ मिनिटे हवी. या कचर्‍यामध्ये पर्यावरणाचे नुकसान करणारे दोन घटक असतात. एक अन्नाचा कचरा आणि दुसरा म्हणजे ‘वापरा आणि फेका’ हा कचरा. या दोन्ही गोष्टी आपल्याला कमी करता येतील. लोक म्हणतात, ‘सिंगल युज प्लास्टिक’वर बंदी घाला, मात्र तुम्ही स्वतःवर बंदी घाला ना. मी माझी भाजीची पिशवी घेऊन जाणार; त्याच्याकडून पिशवी मागणार नाही. आपण मागतो, म्हणून ते देतात. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कापडाच्या पिशव्या घेऊन गेलात आणि त्याच्यात भाजी आणली, तर विषय संपतो. घरातल्या खायच्या गोष्टी प्लास्टिकमध्ये येतात, त्या पिशव्या स्वच्छ धुवून ठेवायच्या. दुसरं, तुमचा स्वयंपाकघरातला कचरा म्हणजे अन्न आहे. हे अन्न कचर्‍यात टाकू नका. ज्या गोष्टी तुम्ही खाऊ शकत नाही, त्या गोष्टी तुम्ही कटिंग बोर्डवर घेऊन बारीक कट करा. मिसरच्या ड्रायपॉटमध्ये पाणी न घालता त्याचा छान लगदा बनवा. घरात एका बादलीमध्ये दोन किलो खत घ्या आणि त्याच्यामध्ये हा लगदा छान चोळून टाका. यासाठी केवळ मेहनत करायला लागेल. कारण सूक्ष्मजीव फक्त छोट्या स्वरूपातले कण घेऊ शकतात. मिसरमध्ये बारीक करून टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही हे मिस करता, तेव्हा आठ तासांमध्ये त्या कचर्‍याचे खत होते. फक्त आठ तासांमध्ये तुमचा ४०० ग्रॅम कचरा कमी होईल. म्हणजे मुंबईच्या नऊ हजार टन कचर्‍यापैकी फक्त तीन हजार टन कचरा कमी करण्यासाठी आपल्याला १५ मिनिटे द्यायची आहेत.
 
  • डम्पिंग यार्ड कचरामुक्त करणे शय आहे का? हे यार्ड स्वच्छतेनंतर मानवी राहण्यायोग्य होतात का?
 
एखाद्या डम्पिंग यार्डमध्ये जैविक कचरा असेल, तर तीन ते सहा महिन्यांमध्ये पूर्णपणे त्यातील कचर्‍याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावू शकतो. आपण कांजूर मार्गसारखा एक मोठा डम्पिंग यार्ड घेऊ. एकूण क्षेत्रापैकी एक हजार चौ. मीटरचा एरिया घेतला आणि तिथे तीन महिन्यांनी तो समजा रिकव्हर केला, तर पुढचा हजार स्क्वेअर मीटरचा घेतला, हे रिकव्हर करणे अगदी सोपे आहे. रिकव्हर केल्यानंतर तिथे अजिबात काही धोकादायक नाही. कारण, हा सगळा नागरिकांच्या घरांमधून आलेला कचरा असतो. यामध्ये विषारी घटक असण्याची शयता फार कमी असते. या कचर्‍याला चाळणी लावली, तर ते डम्पिंग यार्ड पूर्णपणे रिकव्हर होऊन त्यातल्या गोष्टी काढून घेता येतात. जर त्याच्यात काही विषारी घटक असतीलच, तर ती जमीन सॅनिटरी लॅण्ड फील करता येते. ही कल्पना संपूर्णतः भारत सरकारने विकसित केली आहे. ही रिकव्हर केलेली ठिकाणी पूर्णपणे राहण्यायोग्य होतात, त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. आज अनेक वैज्ञानिक प्रक्रिया उपलब्ध आहेत. त्याच्यात अडचण काही नाही, फक्त त्याला एक पॉलिटिकल वील लागेल, सपोर्ट लागेल. जर या दोन्ही गोष्टी नसतील, तर सायन्स उपयोगी पडत नाही.
 
  • भाभा अणुशक्ती केंद्रातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प ही संकल्पना कशी आली?
 
माझा विषय सूक्ष्मजीवशास्त्र असल्यामुळे मला त्याच्याबद्दल आवड होतीच. एके दिवशी डॉटर काकोडकर सर विचारत होते की, आपल्या कॅन्टीनमधून निघणार्‍या कचर्‍याचे काय करायचे? खूप अन्न निघते. याचवेळी मी एक ‘निसर्गऋण’ ही कल्पना मांडली. आपल्याला बायोगॅस प्लांट करता येतील. पहिला प्लांट दोन हजार साली बीएआरसीमध्ये सुरू केला, जो आजही चालू आहे. त्याच्यानंतर अणुशक्ती नगरला केला. कालांतराने काही महानगरपालिकांमध्येही सुरू केला. हा प्रकल्प काही ठिकाणी चालला, तर काही ठिकाणी चालला नाही. जो चालला नाही, त्याची कारणे तांत्रिक नव्हती. प्रशासकीय कारणांमुळे तर कुठे पैसे नव्हते. डॉ. मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी होती की, त्यांनी जी प्रोसेसिंग फी मान्य केली. त्याच्यामुळे तो प्लांट दहा वर्षे चालू आहे. भारत सरकारलाही किंवा महाराष्ट्र सरकारला माझी अशीच विनंती राहील की, तुम्ही प्रोसेसिंग फी दिल्याशिवाय कचर्‍यातून ऊर्जानिर्माण हा प्रकार विसरून जा. कारण या कचर्‍यात गोष्टी इतया विचित्र आणि विविध प्रमाणात मिसळल्या जातात, त्यांच्यापासून तुम्हाला फॅटरीसारखा गॅस मिळणार नाही. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी अशीच ठेवा की, हा वेस्ट प्रोसेसिंग प्लांट आहे. यात किती कचर्‍यावर प्रक्रिया झाली, हे त्याचे यश आहे.
 
  • ‘सिव्हेज वॉटर ट्रीटमेंट’मध्ये नवीन तंत्रज्ञान कोणते?
 
यामध्येही विकेंद्रीकरणाच्या गरज आहे. मोठमोठे सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट आपण निर्माण करतो. बर्‍याच ठिकाणी पहिले काही महिने ते चालतात. कारण त्यांची क्षमता पूर्ण नसते. इथे पुन्हा युवकांना या प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान आपण शिकवले पाहिजे. मी दहा हजार लिटर सिव्हेज ट्रीटमेंटसाठीही एक प्रणाली विकसित केली. एखाद्या सोसायटीचे जर दहा हजार लिटर सिव्हरेज पाणी निर्माण होत असेल, हे केवळ किचन आणि बाथरूममधून येणारे पाणी ट्रीटमेंट करण्यासाठी एखादी वेगळी यंत्रणा उभारता येते. हे केल्यास नद्यांवर जो ताण येतो, तो येणार नाही. हे पाणी नदीत गेले, तरी चालेल.
 
  • भविष्यातील आव्हाने लक्षात घेता, सध्या काही नवीन तंत्रज्ञानावर तुमचा अभ्यास सुरू आहे का?
 
वातानुकूलन यंत्रातून येणार्‍या पाण्यावरून अनेकदा शेजार्‍यांशी अथवा सोसायटींमध्ये भांडणे असतात. ते पाणी आपण असेच बाहेर सोडून देतो. मात्र ते पाणी अतिशय शुद्ध असते. मानसरोवराइतके शुद्ध पाणी यातून बाहेर पडत असते. हे पाणी साठवले पाहिजे. यासाठी एसीचे नियमित व्यवस्थापन आवश्यक आहे. ही ट्यूब तुम्ही आपल्या घरात घ्या. ते पाणी चांगल्या कंटेनरमध्ये जमा करा. मुंबईसारख्या किनारी शहरात ११ महिने आर्द्रता असते. त्यामुळे एसी चालू असतो. रोज पाच लीटर इतके पाणी विचारात घेतल्यास, मुंबईसारख्या शहरात दररोज दहा लाख लिटर इतके पाणी साठवले जाईल. सगळे पाणी एकत्र करून ‘पाणीक्रांती’ करता येईल. खतांचे एकत्रीकरण करून ‘खतक्रांती’ करता येईल. आज परिवहन व्यवस्थेत एसी गाड्या आहेत. त्या गाड्या धुण्यासाठी लागणारे पाणी किमान त्या एसीच्या पाण्यातून भागवले जाईल.
 
  • पर्यावरण आणि स्वच्छता याबाबत नागरिकांना काय आवाहन कराल?
 
सर्वप्रथम आपले घर ‘शून्य कचरा’ करण्याचा प्रयत्न करा. अन्न टाकू नका. ज्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही, पण बायोलॉजिकल आहेत, त्या बारीक करून त्यांचे खत करा. यामध्ये तुमचे डम्पिंग यार्ड पूर्ण नष्ट करण्याची ताकद आहे. ‘वन टाईम युज’ प्लास्टिक वापरू नका. या पिशव्या कापताना कॉर्नर कट करू नका. कमीत कमी वाहनांचा वापर करा. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर उत्तम सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहेत. त्यांचा वापर जास्तीत जास्त करा. रोज एक-दीड किमी चालण्याने जर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभणार असेल, तर सहज शय असणार्‍या गोष्टी करा.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.