मुंबई : (Mangal Prabhat Lodha) 'वंदे मातरम' गाण्याला विरोध करणारे आ. अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या घरासमोर 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन करणार असल्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली.
येत्या ७ नोव्हेंबरला 'वंदे मातरम' गीताला १५० वर्ष पूर्ण होत असून या अनुषंगाने 'सार्ध शताब्दी महोत्सव' अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये 'वंदे मातरम'चे समूह गायन होणार आहे. यानिमित्ताने मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गामदेवी येथील शारदा मंदिर या शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांसह समूह गायन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनची फाशी रद्द करून माफीची मागणी करणारे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे आमदार अस्लम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या घरासमोर स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्ती गीत 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन करणार आहे."
हेही वाचा : Devendra Fadnavis : बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
'वंदे मातरम' हे गीत कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, तर या गीताने केवळ राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते. या गीताला विरोध करून आझमींसारखे नेते राष्ट्रद्रोह करत असून शारदा मंदिर शाळेतील समूह गायन हे 'वंदे मातरम्' गीताला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर आहे. राष्ट्रभक्तीच्या भावनेने आम्ही वंदे मातरम म्हणणारच तसेच या गीताचा विरोध करणाऱ्यांच्या कार्यालयासमोरही वंदे मातरम्' चे सामूहिक गायन करू, असे आव्हान मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आमदारांना दिले.
वंदे मातरम् गीत स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे प्रतीक
"वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तर आपल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना वंदन करून राष्ट्रप्रेमाची ज्योत या गीतामुळे सदैव तेवत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरम्' गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासकीय स्तरावर विविध शिक्षण संस्थांमध्ये या गीताच्या समूह गायनाचे आदेश दिले आहेत. या निमित्ताने मनामनात राष्ट्र भक्तीची ज्योत जागवणाऱ्या या गीताचे राज्यभरात समूह गायनासोबतच परिसंवाद, निबंध लेखन आणि व्याख्याने असा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात होणार आहे," अशी माहितीही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.