रायगडमध्ये प्रथमच दिसला काळसर वटवट्या; उरणमधील 'या' पाणथळीवर वावर

03 Nov 2025 18:43:53
dusky warbler
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातून प्रथमच काळसर वटवट्या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी हा दुर्मीळ हिवाळी स्थलांतरित पक्षी आहे (dusky warbler). उरण येथील पाणथळीवर रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी पक्षीनिरीक्षकांना या पक्ष्याचे दर्शन झाले (dusky warbler). या पक्ष्याची महाराष्ट्रामधील ही पाचवी नोंद आहे (dusky warbler). या नोंदीमुळे रायगड जिल्ह्यात सापडणाऱ्या पक्ष्यांची संख्या ४३२ झाली आहे. (dusky warbler)
 
 
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असले तरी, हिवाळाच्या तोंडावर स्थलांतरी पक्षी मात्र राज्यात दाखल झाले आहेत. यामध्ये काही राज्यात हिवाळी हंगामात दरवर्षी येणारे पक्षी आहेत, तर काही प्रवासी स्थलांतरी म्हणजेच 'पेसेज मायग्रंट' आहेत. यामधीलच दुर्मीळ हिवाळी स्थलांतरी पक्ष्यांचे दर्शन देखील राज्यात घडू लागले आहे. थोडक्यात असे पक्षी की, ज्यांचा स्थलांतराचा पट्टा हा महाराष्ट्रात येत नाही. मात्र, त्या प्रजातीमधील काही मोजकेच पक्षी हे राज्यात स्थलांतर करुन येतात. यामधीलच एक काळसर वटवट्या पक्ष्याचे दर्शन उरणच्या पाणथळीवर झाले आहे. जसखार गावाजवळच्या पाणथळीत पक्षीनिरीक्षक वैभव पाटील आणि यश शेट्टी यांना हा पक्षी रविवारी सकाळी दिसला.
 
 
यापूर्वी महाराष्ट्रामधून या पक्ष्याची नोंद संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पुणे, महाबळेश्वर आणि ताडोबामधून करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच हा पक्षी निदर्शनास आला आहे. हा इवलासा पक्षी लांब पल्ल्याचा स्थलांतरी पक्षी आहे. जो सायबेरिया आणि ईशान्य आशियातील तैगा जंगलात प्रजनन करतो. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये हिवाळ्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करतो. हे पक्षी चीन, म्यानमार, थायलंड, इंडोचायना आणि भारतीय उपखंडाच्या काही भागांसह दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्ये हिवाळ्यात येतात. काही संख्या ही हिमालयाच्या पायथ्याशी, तर काही तैवानपर्यंत जाते. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस ते एप्रिलच्या मध्यापर्यंत ते हिवाळी स्थलांतरी भागात असतात. जरी हे पक्षी स्थलांतर मार्गाचा अवलंब करत असले, तरी यामधील काही पक्षी हे 'भटके' म्हणून ओळखले जातात. म्हणजे ते त्यांच्या सामान्य स्थलांतराच्या मार्गापासून खूप दूर भरकटत जातात. महाराष्ट्रात दिसणारे या प्रजातीचे पक्षी हे याचेच उदाहरण आहे.
Powered By Sangraha 9.0