प्रकाशपर्व सरता सरता ‘नंदा’दीप निमाला...

03 Nov 2025 11:58:36

Nandkishore Chandratre

प्रत्येक संस्था अथवा संघटनेच्या वाटचालीत असे काही समर्पित कार्यकर्ते असतात, ज्यांच्यामुळे संघटनेचा मार्ग अधिकच प्रकाशमान होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिकच्या परिवारातील असेच एक संघनिष्ठ स्वयंसेवक आणि शहर बौद्धिक प्रमुख म्हणून दायित्व निभावणार्‍या नंदकिशोर चंद्रात्रे यांची प्राणज्योत दि. २५ ऑक्टोबर रोजी मालवली. त्यांच्या निधनाने नाशिकच्या संघवर्तुळात अखंडपणे तेवणारा एक ’नंदा’दीप कायमचा निमाला आहे...

ध्यानीमनी नसताना निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या दुःखद निधनाची वार्ता येणे, अत्यंत धक्कादायक असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर बौद्धिक प्रमुख नंदकिशोर चंद्रात्रे यांच्या निधनाने, संघवर्तुळात असाच मोठा धक्का बसला.
धक्कादायक जाणे : दि. १४ ऑटोबर रोजी नाशिकमधील ज्येष्ठ संघकार्यकर्ते श्रीधर राजाराम तथा मोहनराव भागवत यांचे, सांगली येथे दुःखद निधन झाले. त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मेरी-म्हसरुळ-दिंडोरी रोड परिसरात संघकार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत मी प्रमुख वक्ता होतो, तर संयोजक कार्यकर्त्यांपैकी एक नंदूजी चंद्रात्रे हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होते.
थोडे अधिक मागे गेलो, तर दि. ३० सप्टेंबर रोजी त्याच परिसरातील स्नेहनगर वस्तीच्या शस्त्रपूजन उत्सवात मी प्रमुख वक्ता होतो आणि शहर कार्यकर्ते आणि त्या परिसरातील स्वयंसेवक म्हणून, नंदूजी चंद्रात्रे उपस्थित होते. त्यांनी प्रात्यक्षिकात सहभागदेखील घेतला होता. शस्त्रपूजन उत्सवात मी नाशिक शहरात उपलब्ध आहे, असे त्यांना तत्पूर्वी कळवलेले असल्यामुळे, कदाचित ती योजना त्यांनी केलेली असावी. या कार्यक्रमात त्यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. कै. भागवत यांच्या श्रद्धांजली सभेचे विविध वृत्तपत्रांत येत असलेले कात्रण मी त्यांना पाठवत होतो. त्यांचा नमस्कारही येत होता.
आणि अचानक दि. २५ ऑटोबर रोजी सायंकाळी विविध समूहांवर, त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाची बातमी फिरु लागली. ते वाचून अत्यंत धक्काच बसला. प्रारंभी ‘जनकल्याण समिती’ व आता ‘सेवा भारती’च्या मनोहर रुग्णसेवा केंद्रात ते, दुपारी ३ वाजेनंतर नियमित सेवा देत असत. ही सेवा देतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
प्रतिकूल परिस्थिती : त्यांचे निकटवर्तीय आप्त व ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव जोशी (इंदिरानगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूजी यांचे पितृछत्र ते दोन वर्षांचे असतानाच हरपले. विशेष म्हणजे, त्यांचे वडील हे आझाद हिंद सेनेत होते. ते रंगून येथे पकडले गेले. कसेबसे ते भारतात आले. पुढे त्यांनी नाशिक रोडच्या सियुरिटी प्रेसमध्ये नोकरी केली. नंदूजी दोन वर्षांचे असतानाच पितृछत्र हरपल्यामुळे, नंदूजींचा सांभाळ त्यांच्या मातोश्री व त्यांचे ज्येष्ठ सावत्र बंधू यांनी केला. त्यांचे ज्येष्ठ बंधू मनमाड येथे नोकरीस असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात होते. स्वाभाविकच नंदूजीदेखील बालपणी स्वयंसेवक झाले. पुढे नाशिकला आल्यावर ते समर्थ शाखेचे स्वयंसेवक झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे शिक्षण ‘बीएस्सी’पर्यंत झालेले होते. औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी व पुढे विक्री अधिकारी म्हणून त्यांनी, अनेक वर्षे नोकरी केली. परंतु, स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी सामाजिक कार्य केले. ते आणि त्यांच्या काही ध्येयवादी तरुण मित्रांनी एकत्र येऊन, संस्कार निकेतन एक वेगळ्या पद्धतीचे उपक्रम करणारी शाळाही चालवली.
 
मनोहर रुग्णसेवा : गेली काही वर्षे प्रारंभी ‘जनकल्याण समिती’ व त्यानंतर ‘सेवा भारती’ संचालित मनोहर रुग्णसेवा केंद्र या उपयोगी साहित्यसेवा पुरवणार्‍या केंद्रात, ते अल्प मानधनावर काम करून सेवा देत होते. या कामातदेखील आपल्या सौजन्यपूर्ण व मनमिळावू स्वभावामुळे, रुग्णोपयोगी साहित्य घ्यायला येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांचा आत्मीय संवाद होत असे.
शहर बौद्धिक प्रमुख : नाशिक शहराचे बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांची अधूनमधून भेट अथवा फोनवर बोलणे होई. त्यांना बौद्धिक विषयात काही अडचण असल्यास, त्यासंबंधी ते शंका विचारत. मासिक बौद्धिक पत्रकात माझ्या काही प्रकाशित लेखांचा ते विनंती करून आवर्जून समावेश करीत.
 
मागील महिन्यात ‘जनजाती कल्याण आश्रमा’चे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मधुकर आचार्य (वणी, जिल्हा नाशिक) यांच्या पत्नी डॉ. अनिता आचार्य यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर माझ्या पत्नीने लिहिलेल्या स्मृतिलेखाचा समावेश करण्यासाठी, त्यांनी अनुमती घेतली. त्याचे प्रूफ त्यांनी मला पाठवले, त्यामध्ये काही किरकोळ बदल मी त्यांना करून दिले. असे आमचे अधूनमधून साहित्य आणि संवादाचे आदानप्रदान होत असे.
 
अहिल्यादेवी होळकर अभ्यासवर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्ताने रा. स्व. संघाचे मा. सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे यांनी आवाहन केल्यानुसार, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते. मी नंदुजी यांना एक कल्पना सूचवली की, आपण एक दिवसभराचा अभ्यासवर्ग पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यावर आयोजित करावा. जेणेकरून वक्ते अथवा लेखक यांना त्याचा लाभ होईल. या चर्चेत ज्येष्ठ स्वयंसेवक व पूर्व बौद्धिक प्रमुख आदरणीय अशोकराव जुनागडे हेदेखील उपस्थित होते. मनोहर रुग्णसेवा केंद्र येथेच ही बैठक झाली.
 
त्यानंतर संघशिक्षावर्गाची धावपळ आटोपल्यावर, अशोकराव जुनागडे यांच्या घरी आमची तिघांची एक प्रदीर्घ बैठक होऊन, दिवसभराच्या अभ्यासवर्गाचा आराखडा निश्चित केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन व कार्याचे अभ्यासक व लेखक देवीदास पोटे यांना दिवसभर उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्याचे काम, अशोकराव व नंदूजी यांनी माझ्यावर सोपवले. त्याप्रमाणे बोलणे होऊन पोटे यांनी अनुमती दिली. नियोजनाप्रमाणे हा अभ्यासवर्गही व्यवस्थित पार पडला. त्यासाठी नंदूजींनी शहरातील बौद्धिक विभागातील कार्यकर्त्यांना भेटी-बैठका करून, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्यांचा सहभाग मिळवला. एक चांगला अभ्यासवर्ग संपन्न झाला. देविदासजी पोटे यांच्या उपस्थितीचा महिला व पुरुष कार्यकर्त्यांना भरपूर लाभ झाला. पोटे यांच्या प्रकट सत्रातील विषय मांडणी ऐकण्यासाठी शहरातील सर्व स्वयंसेवकांनी उपस्थित राहावे, असा प्रयत्न नंदूजी यांनी केला होता. त्याप्रमाणे त्या सत्रात मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने आमचे वारंवार बोलणे व्हायचे. या अभ्यासवर्गाच्या व्यवस्थेतील किरकोळ त्रुटी व एकूण बौद्धिक विभागातील कार्यकर्त्यांचा संमिश्र प्रतिसाद यामुळे त्यांनी कुठेही नाराजी व्यक्त न करता शांतपणे त्या वर्गाचे संचालन केले. बौद्धिक विभागात नवख्या असणार्‍या कार्यकर्त्यांनादेखील छोट्या छोट्या जबाबदार्‍या देऊन, नंदूजी यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला, हे लक्षात येत होते.
 
रुग्णसेवा केंद्र रौप्यमहोत्सव : प्रारंभी ‘जनकल्याण समिती’च्या व विद्यमान ‘सेवाभारती’च्या मनोहर रुग्णसेवा केंद्र या प्रकल्पाशी, स्थापनेपासून माझा शहर कार्यवाह या नात्याने आलेला संबंध त्यांना माहिती होता. त्यामुळे या प्रकल्पाला २५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे, त्याच्या रौप्य महोत्सवी वर्ष नियोजनाच्या बैठकीत ‘सेवा भारती’ पदाधिकारी व मनोहर रुग्णसेवा प्रकल्प समिती कार्यकर्त्यांसह त्यांनी मला आवर्जून बोलावले होते. प्रकल्प समितीच्या मर्यादित कल्पनांमध्ये थोडेसे अधिक धाडसाने निधी संकलन करावे, असे मी सूचवले. त्यात झालेल्या मनमोकळ्या चर्चेत ते शांतपणे मुद्दे लिहून घेत होते आणि आवश्यक तेथे सहभागही नोंदवत होते. झालेल्या चर्चेचा गोषवारा ‘सेवा भारती’ प्रांत कार्यालयास व प्रांत पदाधिकार्‍यांना अवगत करावा व त्यांच्याकडून आपल्या चर्चेतील मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करून घ्यावे, असे मी त्यांना सूचवले होते. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा ड्राफ्टदेखील मला बघण्यासाठी पाठवला होता. चर्चेतील जवळपास सर्व बिंदूंचाच गोषवारा त्यांनी त्यात घेतलेला होता. यातून परिपूर्णतेचा एकूण असलेला त्यांचा आग्रह अनुभवण्यास मिळाला. यापुढील रौप्यमहोत्सवी वर्षातील कार्यक्रम, स्मरणिका, निधी संकलन यात त्यांची मोठी उणीव भासणार आहे.
 
‘जनजाती कल्याण आश्रम’ दिनदर्शिका : साधारण ऑगस्ट महिन्यात ‘जनजाती कल्याण आश्रमा’चे उपाध्यक्ष प्रकाश मेहेंदळे यांनी, पुढील वर्षीच्या कल्याण आश्रमाच्या दिनदर्शिकेमागील पृष्ठांवर विशेष माहितीअंतर्गत संघशताब्दीनिमित्ताने दोन लेख देण्याचा प्रस्ताव मांडला. पैकी एक लेख मी व एक लेख नंदूजी चंद्रात्रेंचा असेल, असे त्यांचे नियोजन होते. त्याप्रमाणे ऑगस्टमध्येच आमची तिघांची बैठक मनोहर रुग्णसेवा केंद्रातच झाली. त्यात आम्ही विषय बिंदू निश्चित केले, ‘संघशताब्दी आढावा’ हा विषय माझ्याकडे व प्रांतातील एकूण सेवाकार्यांवर आधारित माहितीपर लेख हा नंदूजी चंद्रात्रे यांनी लिहावा, असे निश्चित झाले. त्याविषयी बिंदूंची आम्ही सविस्तर चर्चा करून, त्याप्रमाणे माझा लेख मी पाठवून दिला. नंदूजी चंद्रात्रे यांनी त्यांचा लेख मला अवलोकनार्थ पाठवला आणि मी तो वाचून, त्याच्यावर किरकोळ दुरुस्ती सूचवली. त्याप्रमाणे त्यांनी दुरुस्ती करून लेख अंतिम केला. दिवाळीची धावपळ आटोपल्यावर दुसर्‍याच दिवशी, मेहेंदळे व प्रा. वसंतराव जोशी माझ्याकडे दिनदर्शिका देण्यासाठी आले. नंदूजींना दिनदर्शिका पोहोचवण्यासंबंधी आमची चर्चादेखील झाली. त्यांच्या लेखासंबंधीदेखील चर्चा झाली आणि दुसर्‍याच दिवशी ही दुःखद निधनाची वार्ता आली. मी ही बातमी मेहेंदळे यांना पोहोचवल्यावर, यांनादेखील प्रचंड धक्का बसला. नंदूजींचे जाणे, असे सर्वांनाच चटका लावून गेलेले आहे.
 
संघाची हानी : माझ्याकडे प्रदीर्घकाळ नाशिक शहराचे संघाचे काम होते आणि शहराचा जवळपास दुपटीने वाढलेला विस्तार लक्षात घेता, शाखा कार्यातील अल्पअनुभव असलेले, परंतु शिकण्याच्या मनस्थितीत असलेले कार्यकर्त्यांना संघकामाची रिती, नीती, पद्धत आणि गती ही कशी सांभाळायची, हे सर्व शहर कार्यकर्त्यांनाच संपर्क-संबंध-सहवासद्वारे करावे लागते. त्यामुळे हे किती अवघड असते, हे मी समजू शकतो. त्यातून शारीरिक आणि बौद्धिक हे संघटन म्हणून आवश्यक असलेले दोन्ही महत्त्वाचे कार्य विभाग सांभाळणे, हे तसे अवघडच कार्य. गेली काही वर्षे सलग नंदूजी चंद्रात्रे बौद्धिक विभागाचे काम सांभाळत होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मोठी हानी झाली आहे.
 
हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अत्यंत नम्रतेने संवाद करण्याची शैली आणि संघकार्यासंबंधी दृढता व त्यासाठी वेळ देण्याची तयारी, हे आदर्श कार्यकर्त्याला आवश्यक असलेले सर्वच गुण त्यांच्याकडे होते. अशा कार्यकर्त्याचे कमी वयात आकस्मिक निघून जाणे अत्यंत लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांवरदेखील हा खूप मोठा आघात आहे. दीपावली प्रकाशपर्व सरतासरता संघाच्या नाशिक शहर कार्यकारिणीतील, नंदूजी यांच्यासारख्या एका दीपाचे असे निर्वाण होणे, अत्यंत दुःखद आहे.
कै. नंदूजी चंद्रात्रे यांना विनम्र श्रद्धांजली!
दिलीप क्षीरसागर


(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य आहेत)
९४२२२४५५८२
Powered By Sangraha 9.0