सांस्कृतिक गुलामीचे खांदेकरी

03 Nov 2025 12:28:28

Lalu Prasad Yadav
 
भारत हा विविधतेचा देश आहे. येथे दिवाळी साजरी केली जाते, तसेच पोंगल, बैसाखी, नाताळ असे सगळेच सण साजरे केले जातात. प्रत्येकाला आवडेल तो सण साजरा करण्याचा, स्वतःच्या श्रद्धांना जपण्याचा प्रत्येक भारतीयाला समान अधिकार संविधानाने दिला आहेच. पण समस्या तिथे सुरू होते, जेव्हा काही तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते हिंदू सणांवर टीका करतात आणि पाश्चात्य सणांचे गोडवे गाताना, कुटुंबाबरोबर ते साजरे करतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे या वृत्तीचे अलीकडील एक आदर्श उदाहरण ठरावे. महाकुंभसारख्या सनातन परंपरेच्या सोहळ्यावर अंधश्रद्धा, अनाठायी खर्च अशा टीका करणारे लालू, अचानक हॅलोविन साजरे करू लागले आहेत! युरोपीय देशात प्रामुख्याने सॅल्टिक समाजातील मान्यतेनुसार, हॅलोविनदरम्यान मृत व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात. त्यामुळे भुतांची प्रेतांची वेशभूषा करण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते. भारताच्या मातीतील हिंदूंच्या सणांना मागास समजायचे आणि परकीय सणांना प्रगत म्हणायचे, हीच विरोधकांची मनोवृत्ती झाली आहे. दिवाळीत प्रदूषण, होळीला पाण्याचा अपव्यय, गणपतीत प्लास्टिक आणि कुंभमेळ्यात खर्च!
 
लालूंनी हॅलोविन साजरे केले, ठीकच आहे. पण प्रश्न इतकाच जे महाकुंभावर टीका करतात, त्यांनी हॅलोविनमध्ये होणार्‍या तथाकथित खर्चाविषयी का मौन धरले? कारण येथे मुद्दा संस्कृतीचा नाही, राजकीय ढोंगीपणाचा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेवर टीका करताना आणि परकीय गोष्टीला आधुनिकतेचे लेबल द्यायची वसाहतवादी संस्कृतीचे दर्शनच विरोधक घडवत आहेत. भारतात होणार्‍या श्राद्धपक्षांवर टीका करणारे हे राजकीय संधीसाधू धर्मनिरपेक्ष नेते, युरोपीय मान्यतेनुसार मात्र पितरांच्यासाठीचा सण आनंदाने साजरा करत आहेत. देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला, तरी या देशातील काही नेत्यांच्या बुद्धीमधील गुलामी जाताना दिसत नाही. आजच्या राजकारणात ‘धर्मनिरपेक्षता’ ही अनेकदा निवडक संवेदनशीलतेची झालेली आहे. हिंदू सणांचा उपहास आणि परकीय संस्कृतीचा उदोउदो करत, सध्या संपूर्ण पुरोगामी कंपू सांस्कृतिक गुलामीचीच पालखी नाचवत आहेत. लालूंचे कुटुंब या पालखीचे एक खांदेकरी आहे, एवढेच!
 
 
घराणेशाहीचे वारसदार
 
 
बिहारच्या निवडणूक प्रचारादरम्यानन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, "मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावे की, ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले नाही.” राहुल यांच्या या वक्तव्याने एक गोष्ट स्पष्ट होते की, राहुल गांधींना अजूनही भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी काहीही उमगलेले नाही. भारत हा सार्वभौम देश आहे आणि त्याचे नेतृत्व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या टिप्पणीवर अवलंबून नाही. भारताने नेहमीच आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे जगासमोर मांडली आहे. मग ते संयुक्त राष्ट्रांचे व्यासपीठ असो, ‘जी२०’ परिषद असो किंवा ‘ब्रिस’सारखे जागतिक मंच असो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर देण्याची काहीच गरज नाही. कारण भारताचे नेतृत्व प्रतिक्रियेचे नव्हे, तर निर्णयाचे राजकारण करते. मोदींनी एकदा स्पष्ट सांगितले होते, ‘ना आँख झुकाके बात होगी, ना आँख उठाके, बात होगी तो सिर्फ आँख मिलाके होगी|’ मोदींचे हे वाय फक्त भाषणापुरते मर्यादित नव्हते, तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तत्त्वज्ञान त्यात अंतर्भूत होते. ही भूमिका स्वाभिमानातून येते, गुलामीच्या मानसिकतेतून नव्हे.
 
राहुल गांधींना अजूनही राजकारणातील परिपक्वता म्हणजे काय, हेच समजलेले नाही. ज्यांना राजकारण हे वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळालेले आहे, त्यांना देशभक्तीचा अर्थ कसा उमगणार? राहुल यांच्या कुटुंबाने कायमच भारताबद्दल टीकेचे सूरच लावले. राजकीय आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवल्याने देशभक्ती वाढेल, असा काही नियम नाही. कारण, विषाच्या बाटलीवर ‘अमृत’ जरी लिहिले, तरी आतले द्रव्य बदलत नाही, हेच खरे. भारताचे पंतप्रधान जगात देशाचे अस्तित्व दृढ करतात, ते कुणाच्या दबावाखाली नाही. त्यामुळेच भारत अमेरिकेच्या व्यापारी कराराच्या दबावाला झुगारु शकतो; रशियाकडूनही तेलखरेदी सुरू ठेवू शकतो. यामुळेच मोदी ट्रम्प यांना घाबरतात, हा आरोपही हास्यास्पदच ठरतो. मोदींच्या नेतृत्वातील सरकारने कृतींनीच दाखवून दिले की, ट्रम्प असोत वा बायडन, भारताची धोरणे भारतच ठरवतो, परकीय शक्ती नाहीत. ही गोष्ट राष्ट्रभक्तीतीच्या दृष्टिकोनानेच साधली जाते. हा दृष्टिकोन राहुल गांधींसारख्या राजकारणातील घराणेशाहीचा वारसा जपणार्‍यांना उमजेल कसा?


कौस्तुभ वीरकर
Powered By Sangraha 9.0