अनोखी रचना लाभलेल्या आणि पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणार्या कंदीलपुष्पांविषयी माहिती देणारा हा लेख...
जैवविविधतेने समृद्ध असलेला पश्चिम घाट हा नैसर्गिक कंदीलफुलांमुळे खुलून येतो. महाराष्ट्रात कंदीलफुलांच्या नानाविध प्रजाती पाहायला मिळतात अन् प्रत्येक कंदीलफुलाचे एक विशिष्ट आणि दुर्मीळ असे वसतिस्थान असते, जिथे ठराविक प्रजातीच्या कंदीलफुलांचेच अधिवास पाहायला मिळतात. यामध्ये अतिशय दुर्मीळ असणारी इव्हान्स सिरोपेजिया (शास्त्रीय नाव : सिरोपेजिया इव्हान्सी) ही मनमोही कंदीलफुलाची प्रजात अतिशय डोंगराळ भागात उतारांच्या कडेने वाढलेली दिसते. आपल्या अंडाकृती पानांच्या श्रृंखलेत मध्येच छोट्या कंदिलाप्रमाणे आकारित होऊन, फिकट राखाडी रंगाच्या छटेत देठाकडे फुगीर होत जाते. ‘थॉमस इव्हान्स’ या वनस्पतीशास्त्रज्ञाच्या नावावरून वनस्पतीचे नामाभिदान करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सातार्याच्या उंच कडेकपारीत या कंदीलफुलाचा फुलोरा साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये पाहायला मिळतो. शास्त्रीयदृष्ट्या सिरोपेजिया मिडिया म्हणून संबोधली जाणारी याच वनस्पतीची दुसरी प्रजाती आपल्या गोलाकार केसाळ किंचित भाल्याच्या आकारात आच्छादलेल्या, विसंगत पानांच्या गर्दीतून उठावदार दिसते.
निसर्गाची रूपकता, वनस्पती अन् पक्षांच्या सौंदर्याचे साम्य दर्शविणारी एक कंदीलफुलाची प्रजात म्हणजेच मोर खरचुडी. शास्त्रीय भाषेत तिला ’सिरोपेजिया ऑक्युलाटा’ असे म्हणतात. पश्चिम घाटात प्रामुख्याने जास्त पर्जन्यमान असलेल्या कोकणपट्ट्यात ही वनस्पती सर्रास पाहायला मिळते. करवंदीच्या जाळ्यांशेजारी या वनस्पतीचा वेल जोर धरतो. हिरव्या शिरांनी वेष्टिलेल्या लंबगोलाकार पानांच्या तुरळक गर्दीतून, एखाद्या मोराप्रमाणे भासणार्या या फुलाचे रूप आपल्या नजरेस पडते. कोकणच्या काही भागांत ’सिरोपेजिया अॅटेन्युआटा’ आपली वेगळीच लकब दाखविते. इतर फुलांच्या तुलनेत फुलाच्या पाकळ्या टोकाकडे अगदी लांबट होत एकत्र येतात. गवताच्या पात्यांप्रमाणे या वनस्पतीची पाने लांबट होत जातात. काही ठिकाणी सड्याच्या लगतच ती पाहायला मिळते, म्हणूनच तिला ’सडा खातुंडी’ असेही म्हणतात. याहून भिन्न ’सिरोपेजिया विन्सिफोलिया’सारखी गच्छेदार कंदील फुलाची प्रजाती आपल्या कमी उंचीच्या फुलांमुळे सहज लक्षात येते. पिवळसर फुलांच्या कमानीवर मध्येच हिरव्या रंगाची छटा, तर टोकाच्या कडेने काळ्या रंगात विस्तीर्ण झालेल्या पाकळ्या विलोभनीय दिसतात. मध्येच फिकट लाल रंगाचे ठिपके अन् मानेचा काहीसा भाग सोडता उर्वरित सर्व ठिकाणी लाल रंगाची छटा या फुलांवर पाहायला मिळते. याउलट तीन ते चार फूट उंचीची सहा ते आठ फुलांच्या गुच्छातून फुलून येणारी ’सिरोपेजिया मॅकॅनी’ ही एक दुर्लभ कंदीलफुलाची प्रजात आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अशाच स्वरूपाची मात्र टोकाकडून बंद असणारी पांढरट पिवळ्या रंगाची कंदीलपुष्पाची प्रजात आढळते. तिला ’सिरोपेजिया सह्याद्रीका’ असे म्हणतात. ही कंदीलफुले गुच्छांमध्ये बहरून येतात. साधारण जुलै-ऑगटच्यादरम्यान या वनस्पतीची फुले पाहायला मिळतात. ‘सिरोपेजिया शिवरायीआना’सारखी नव्याने शोधण्यात आलेली प्रजात विशाळगडावरील पतंगांना आपल्या पांढर्या शुभ्र फुलांनी वेड लावते. ‘सिरोपेजिया कोकनेन्सीस’ ही वनस्पती वेंगुर्ला आणि देवगडच्या काही सड्यांवर त्यानंतर कोल्हापुरातील तिलारी भागात आढळते. त्यादरम्यानच्या इतर ठिकाणी तिचा मागमूसही लागत नाही. अशी विविधता आणि अधिवासातील वेगळेपण घेऊन कंदा-कंदातून या वनस्पतीच्या नानाविध प्रजाती पावसाळ्यात रुजून येतात, याखेरीज वनस्पतीच्या कांद्याचा(कंद) व पानांचा उपयोग काही ठिकाणी भाजीसाठी केला जातो.
वनस्पतीच्या काही प्रजाती वेदनाशामक, रक्तशुद्धी आणि मुत्राशयसंबंधी आजारांवर उपयुक्त ठरतात.औषधी गुणधर्म आणि सौंदर्याची लयलूट करणार्या या वनस्पतीच्या कांद्यांचा अमर्याद वापर आज या वनस्पतीच्या प्रजातींवर घाला घालत आहे. घटते जंगल क्षेत्र, बदलते हवामान यांचा परिणाम या वनस्पतीच्या अधिवासावर होतो आहे. मात्र, याचे सौंदर्य आणि या फुलांची दुर्लभता या गोष्टी लक्षात घेता, त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण तितकेच गरजेच आहे. पर्यावरणाचे हे खरेखुरे कंदील त्यांच्या अधिवासात जेव्हा कायम टिकून राहतील, तेव्हाच खरी निसर्गाची दिवाळी साजरी होईल!
परेश गुरव
(लेखक रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात साहा. प्राध्यापक आहेत.)