प्रख्यात लेखक वसंत वसंत लिमये लिखित ‘टार्गेट असद शाह’ ही मराठी कादंबरी २०२२ साली प्रकाशित झाली होती. अल्पावधीतच या कादंबरीने मराठी वाचकमनाचा ठाव घेतला. सप्टेंबरमध्ये या कादंबरीची तिसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. मराठी साहित्यात सखोल अभ्यास करून रचलेले कथानक अशा ‘थरार शैली’ची सुरुवात वसंत लिमये यांच्या ‘लॉक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ या कादंबर्यांपासून झाली. ‘टार्गेट असद शाह’ ही या श्रृंखलेतील तिसरी कादंबरी. त्यांची ही तिसरी कादंबरी आता इंग्रजीमध्ये वाचकांच्या भेटीला येत आहे. दि. ३० नोव्हेंबरपासून ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध असेल. वसंत वसंत लिमये यांची कन्या रेवती वसंत लिमये यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, इस्लामी दहशतवाद व कल्पितापलीकडे जाणारे कादंबरीतले वास्तव या पार्श्वभूमीवर लेखकाशी साधलेला हा खास संवाद...
मराठीमध्ये आपली ‘टार्गेट असद शाह’ ही कादंबरी वाचकांनी उचलून धरली आणि आता ती इंग्रजीमध्ये प्रकाशित होत आहे. तेव्हा, ही कादंबरी इंग्रजीमध्ये आणण्यामागे नेमक्या काय भावना आहेत?
ही कादंबरी इंग्रजीमध्ये वाचकांच्या भेटीला येत आहे, याचा आनंद आहे. मराठीमध्ये प्रथम लेखन केल्यानंतर, वेगवेगळ्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना ही कादंबरी इंग्रजीमध्ये वाचायची तर होतीच, परंतु हा विषय आणखी एका मोठ्या वाचकवर्गापर्यंत न्यायचा होता, त्या अनुषंगाने या कादंबरीचा अनुवाद झाला आहे. एका अर्थाने आपल्या आजूबाजूचा भोवताल पाहता, न ठरवताही कादंबरी योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचते आहे.
मध्यंतरी शेफाली वैद्य आपल्या कादंबरीवर भाष्य करताना म्हणाल्या होत्या की, दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या कादंबरीमधील संवाद आणि दृश्य पुन्हा पुन्हा आठवत होते. तेव्हा, कादंबरीतील जग आणि सध्याचे भीषण वास्तव याबद्दल काय सांगाल?
‘टार्गेट असद शाह’ या कादंबरीचं विचारबीज अनेक वर्षांपासून मनामध्ये होतं. यानंतर त्या अनुषंगाने मी जो अभ्यास केला, त्यावरून मी कथानक रचलं. वाचकांना ते वास्तवदर्शी वाटलं. मात्र, आताच्या घडीला आपल्या अवतीभोवती दहशतवादाचे वास्तव उघडकीस येत आहे. त्यामुळे हे सारं हादरवून टाकणारं आहे, असे मी म्हणेन. पंतप्रधानांच्या जीवाला धोका असू शकतो, हे मी कल्पनेत साकारले होते. मात्र, याचे वास्तव आपल्याला आता बघायला मिळते आहे.
इस्लामी दहशतवाद असो किंवा एकूणच दहशतवाद्यांच्या यंत्रणेचा आपल्या समाजामध्ये असलेला वावर असो, याविषयी साहित्यामध्ये फारशी मांडणी होताना आपल्याला दिसत नाही. तेव्हा, आपण हा वेगळा विषय कादंबरीसाठी का निवडला?
१९७३ साली मी ‘आयआयटी’मध्ये उच्च शिक्षण घेत होतो. त्यावेळेला ‘डे ऑफ द जॅकल’ ही कादंबरी फार गाजली आणि डोयात एक किडा घुसला. मात्र, ‘विश्वस्त’ या कादंबरीनंतरच ‘टार्गेट असद शाह’ आकार घेत गेली. आपल्या साहित्यामध्ये याची मांडणी होत नाही, याचे एक कारण म्हणजे आपल्याला दहशतवादाची व त्यातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची, त्याच्या आपल्यावर होणार्या परिणामांची पुरेशी जाणीव नाही. तो आपल्या अनुभवविश्वाचा भाग नाही. बाजूच्या देशामध्ये फोफावणारा दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही विषवल्ली वाढू देणारे लोक हे देश विकायला निघाले आहेत. एखाद्-दुसरी घटना घडली की आपल्याला याबद्दलचं वास्तव कळतं; मात्र या अराजकाचे मूळ अत्यंत खोल पसरलेले आहे, हे आपण लक्षात घेत नाही.
इंग्रजीतील ‘लासिस’ असो किंवा ‘सेल्फ हेल्प’ पुस्तकं, ती मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये अनुवादित होतात. मात्र, मराठीतून इंग्रजीत अनुवादित होणारी पुस्तकं तशी कमी आहेत. यावर आपले निरीक्षण काय?
मला असं वाटतं की, अनुवादाच्या बाबतीत जी एका प्रकारची उदासीनता आहे, ती मारक आहे. ‘कशासाठी हे करायचे, एवढे पैसे का खर्च करायचे,’ अशा अनेक गैरसमजुतींमध्ये लोक अडकलेले असतात. इतिहासलेखनाच्या बाबतीत आपण मागे का पडलो, तर आपला इतिहास हा इंग्रजीमध्ये इतर भाषांमध्ये लिहिलाच गेला नाही म्हणून. आपल्याकडे उदय कुलकर्णी आता इंग्रजीमध्ये मराठ्यांचा इतिहास लोकांसमोर आणतात. त्या अनुषंगाने इतिहासाचे यथार्थ दर्शन सगळ्यांना होतं. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुस्तक लोकांपर्यंत पोहोचतात. अनेक मराठी मुलं-मुली अशी आहेत, ज्यांची ‘प्रेफर्ड लँग्वेज’ ही इंग्रजी आहे. याचा अर्थ ते मराठीचा दुस्वास करतात असे नाही; पण त्यांना इंग्रजीमध्येसुद्धा वाचन करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आपलं जे समृद्ध साहित्य आहे, ते इतर भाषांमध्ये लोकांपर्यंत कसं पोहोचेल, यासाठी काम करायला लागेल.
आपण उत्कृष्ट लेखक तर आहातच, मात्र त्याचबरोबर छायाचित्रकार, गिर्यारोहक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी आपण केली आहे. याचा लेखनामध्ये उपयोग कसा होतो? आपण इतया सगळ्या गोष्टी एकत्र कशा काय जुळवून आणता?
खरं तर इतया सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज होत नाहीत. एका वेळेला एक किंवा दोन गोष्टी समांतर सुरू असतात. उदाहरणार्थ, गिर्यारोहण आणि छायाचित्र. यामुळे अनुभवविश्वाची खोली रुंदावते. आपण जे प्रत्यक्षात अनुभवतो, त्याचा वापर नंतर लिखाणामध्ये होतो. काळाच्या ओघात माझी माध्यम बदलत गेली, असं मी म्हणेन. वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव घेत, नंतर त्याचा वापर तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये करू शकता.
महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर साहित्याचं आणि समाजाचं नातं कसं असतं? आणि ते नातं कसं असायला हवं?
मागील २० वर्षांमध्ये माध्यमे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. व्यक्त होण्याला कुठल्याही प्रकारचे बंधन राहिले नाही, आपल्या अवतीभोवती आमूलाग्र बदल झाले. या अनुषंगाने मला असं वाटतं की, आपल्याकडचं साहित्य क्षेत्र जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हायला हवं. लोकांपर्यंत पोहोचायला हवं. जुन्या संकल्पनांना किंवा विचारांना आता थारा नसेल, वाचक आपल्यापर्यंत येत नसतील, तर आपल्याला वाचकांपर्यंत जावं लागेल. याच्यातल्या सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे लिखाणामागचं संपादन. ही संपादकीय प्रक्रिया साहित्यकृतीमध्ये अत्यावश्यक असते. साहित्यातल्या वेगवेगळ्या घटकांची भूमिका आज बदललेली आहे, ही बदललेली भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे एकूणच साहित्यव्यवस्थेने कात टाकण्याची गरज आहे, असं मला वाटतं.