गेल्या अनेक दिवसांपासून आय पॉपस्टार’ संगीत रिॲलिटी शोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू होती. ‘ॲमेझॉन एमएक्स प्लेअर’वर हा शो स्ट्रीम होतो. याच कार्यक्रमातून मराठमोळी गायिका राधिका भिडे देशभरात प्रसिद्ध झाली. तिच्या ‘मन धावतया’ने सगळ्यांनाच वेड लावलं, तर आता मराठमोळा रोहित राऊत विजेता ठरून सगळ्यांचीच मने जिंकत आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या आवाजानं एक वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर मराठमोळा गायक रोहित राऊत पुन्हा एकदा रिॲलिटी शो गाजवताना दिसला. अंतिम फेरीची सुरुवात स्पर्धकांनी स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत झाली. चरण पथानिया याने कॉन्सर्ट-स्टाईलमधे आपला परफॉर्मन्स सादर करत अंतिम फेरीची दमदार सुरुवात केली. यावेळी गायिका राधिका भिडे हिनं आपल्या कुटुंबासमोर गायन सादर केलं. अंतिम स्पर्धकांनी त्यांचं सादरीकरण पूर्ण केल्यानंतर संपूर्ण भारत ज्या क्षणाची वाट पाहात होता, तो क्षण आला आणि विजेता घोषित झाला.
‘टॉप 2’मध्ये ‘टीम किंग’चा रिषभ पांचाल आणि ‘टीम पर्मिश’चा रोहित राऊत यांचा समावेश होता. काही क्षणानंतर रोहित राऊत याला पहिल्यावहिल्या ‘आय-पॉपस्टार’चा विजेता घोषित करण्यात आलं आणि सात लाख रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. ‘रनर अप’ ठरलेल्या रिषभ पांचाल याला तीन लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. दोघांना यावेळी केवळ बक्षीसच नव्हे, तर देशभरात चाहतावर्गही मिळाला. रोहित यापूवही अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. लहानपणी तो ’मराठी लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. तेव्हापासून तो मराठी प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला. आता तो देशभरात ओळखला जातोय.
ही ट्रॉफी जिंकल्यावर रोहित म्हणाला की, “आय-पॉपस्टार’मध्ये मी कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख शोधायचा प्रयत्न केला आणि काही आठवड्यांनंतर आज मी विजेतेपदी उभा आहे. या विजेतेपदानं मला माझ्या कलेचा पाठपुरावा करण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. मी माझे मेंटॉर परमिश पाजी यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय आणि अर्थातच माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या चाहत्यांशिवाय हे शक्य झालं नसतं. हा पुरस्कार मी आपल्या चौकटीबाहेर पडून गुणवत्ता सिद्ध करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक प्रादेशिक कलाकाराला अर्पण करतो. सरतेशेवटी ‘ॲमेझॉन एमएक्स प्लेअर’नं माझ्यासारख्या स्वतंत्र कलाकाराला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करत गुणवत्ता दर्शवण्याची आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.”