दिव्यांग स्त्रियांच्या सशक्तीकरणाचे दुसरे नाव - मीनाक्षी निकम!

29 Nov 2025 10:38:19
 
Meenakshi Nikam
 
दिव्यांग महिलांच्या प्रश्नांवर गेली ३१ वर्षे अविरतपणे कार्य करणार्‍या ‘स्वयंदीप’ संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांना आज पुणे येथे आयोजित सोहळ्यात महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दिव्यांग स्त्रियांच्या सशक्तीकरणाचे व्रत घेतलेल्या मीनाक्षी निकम यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख...
 
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा चाळीसगाव, जि. जळगाव येथील ’स्वयंदीप’ संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांना जाहीर झाला आहे. कौटुंबिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक असे विविध कंगोरे असलेला व काही अंशी समाज व शासकीय पातळीवर दुर्लक्षित अशा महिला दिव्यांगांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर गेली ३१ वर्षे मीनाक्षी निकम कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे, केवळ दोन वर्षांचे वय असताना त्यांना पोलिओचे निमित्त होऊन दोन्ही पायांना अपंगत्व आले; परंतु स्वतः भोगलेले दुःख, अडचणी व कटू अनुभवांचा बाऊ न करता, त्यांनाच जगण्याचे निमित्त करीत दिव्यांग स्त्रियांच्या सशक्तीकरणाकरिता त्या समर्थपणे अनेक दिव्यांग स्त्रियांमागे ठामपणे उभ्या राहिल्या.
 
दिव्यांग घटकांकरिता शासनपातळीवरून सहअनुभूतीचा भाव राखत कल्याणकारी योजनांची निर्मिती व सुव्यवस्थापन व्हावे, तसेच दिव्यांग घटकांकडे बघण्याचा कुटुंबाचा व सामाजिक दृष्टिकोन/मानसिकता बदलणे, ही खूप मोठी आव्हाने असल्याचे मीनाक्षी प्रत्येक व्यासपीठावरून सांगतात. त्यांच्याकरिता समान संधीसाठी विशेष संधीची अनेक दारे उघडली पाहिजेत, या त्यांच्या विश्वासावर त्या ठाम असून, याकरिता शासन व राज्यकर्त्यांची सकारात्मक इच्छाशक्ती महत्त्वाची, हे त्या मानतात.
राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने या कामाचे महत्त्व आहेच. दिव्यांग हे आपल्या समाजातील एक घटक आहेत व अनेकजण देशाच्या आर्थिक प्रगतीत सहभाग देतात. त्यांचा सहभाग अधिक सन्मानपूर्वक व्हावा, हा विचार मांडणार्‍या मीनाक्षी यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना अत्यंत आदरपूर्वकरीत्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री-शिक्षणसंस्था येथे दिव्यांगांसाठी कार्यरत असणार्‍या ’सक्षम’ या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते आज दि. २९ नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात येत आहे. ‘एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह’ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
१२५ वर्षांपूर्वी ‘भारतरत्न’ महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून, म्हणजेच १९९६ पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचा नावे देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. समाजाच्या उत्थानाकरिता, संबंधित समाज विकासाच्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता, एखाद्या सामाजिक प्रश्नाचा पाठपुरावा करीत; त्या प्रश्नावर असामान्य व अद्वितीय असे प्रेरणादायी कार्य उभ्या करणार्‍या महिलांचा सन्मान यानिमित्ताने संस्थेमार्फत केला जातो. या कामासह या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींची ही विशेष ओळख; यानिमित्ताने समाजाला करून दिली जाते.
 
मीनाक्षी यांनी स्वतःतील अपंगत्व जाणत, जगण्यातील आव्हाने लक्षात येत असतानाच; याच प्रश्नावर कार्य हाती घेण्याचे निश्चित केले. एक स्त्री म्हणून या शारीरिक वैगुण्यावर स्वतःसह समस्त दिव्यांग स्त्रियांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे काम हाती घेत असताना, त्यांना या घटकांमधील मानसिक ऊर्जा व इच्छाशक्तीचे बळ लक्षात आले व हाच दुवा पकडत त्यांनी एका अनुकरणीय कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
 
कौटुंबिक पार्श्वभूमी फारशी अनुकूल नसतानाही त्यांनी सर्व अडचणींवर मात करीत, मोठ्या जिद्दीने बारावीपर्यंतचे शिक्षण आणि हस्तकला-शिवणकामाचा डिप्लोमा पूर्ण केला. हे शिक्षण पूर्ण करीत असताना, अपंग स्त्रियांच्या आत्मसन्मानाकरिता आपले आयुष्य समर्पित करण्याचा निश्चयही दृढ होत गेला. प्रत्यक्ष कार्याचा ‘श्रीगणेशा’ हा दोन्ही पायांनी अपंगत्व असलेल्या महिलांसाठी ‘निवासी प्रशिक्षण व हाताला काम’ असा उपक्रम हाती घेत झाला. पोटच्या दिव्यांग मुलीदेखील अनेकदा कुटुंबीयांना नकोशा होतात. या मुलींना छत्र व हाताला काम देण्याकरिता आज हा उपक्रम २० महिलांना प्रशिक्षण, काम व निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देत आहे.
 
१९९४ साली त्यांनी ‘राज लासेस’ची स्थापना केली व दिव्यांग महिलांना पूर्णत: नि:शुल्क प्रशिक्षण या माध्यमातून देण्यास प्रारंभ झाला. आज अशा सुमारे दोन हजार महिला याद्वारे ‘आत्मनिर्भर’ झाल्या आहेत. कामाचा पसारा वाढत असताना, या कार्याला एक संस्थात्मक चौकटीत बसविण्याच्या दृष्टीने २०१६ साली त्यांनी ‘स्वयंदीप’ हा प्रकल्प सुरू केला. संस्थेच्या माध्यमातून दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मुलींचे पालन करणे, त्यांना शिकवणे आणि पुढे जाण्यास प्रेरित करणे, ही सर्व कामे एकाच छताखाली सुरू झाली. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार शिबिरे, पुनर्वसन कार्यक्रम आयोजित करण्याचे काम त्या सातत्याने करीत आहेत. विविध सामाजिक कल्याणकारी संस्थांच्या सहकार्याने शेकडो दिव्यांगांना ट्रायसायकल, व्हीलचेयर, कैलिपर्स आणि हियरिंग एड्स देण्याचे काम त्यांनी केले.
 
त्यांच्या या कार्याची दखल घेत, त्यांना ‘समाजभूषण’, ‘तेजस्विनी’, ‘प्रेरणा’ तसेच, झी टीव्ही कडून ‘उंच माझा झोका’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ’स्वयंदीप’च्या कामासह त्या २०२३ पासून ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’च्या सिनेट सदस्य म्हणूनही सक्रियरीत्या कार्यरत आहेत. दिव्यांग घटकांचे प्रश्न, अडचणी, मर्यादा व त्यांच्याप्रति असलेला दुर्लक्षित भाव या सगळ्यावर आपल्या परखड लेखणीतून त्या समाजप्रबोधन ’अपंग स्मृती’ साप्ताहिकाचे सहसंपादक या पदावरून करीत आहेत. तसेच, ‘अपंग विकास बहुउद्देशीय संस्था (चाळीसगाव)’च्या अध्यक्ष म्हणूनही त्या आपले दायित्व निभावत आहेत.
 
दिव्यांग घटकांच्या विकासासाठी झटणार्‍या मीनाक्षी यांना अपंग विकासासाठी राष्ट्रीय महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणूनदेखील दायित्व देण्यात आले. मीनाक्षी यांनी आपल्या कार्यातून, समाजातील एका दुर्लक्षित अशा घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया केली. हे कार्य हाती घेणे व पुढे त्यास संस्थात्मक आकार देणे सहजसोपे नव्हते. मात्र, त्यांच्या मनाचा निश्चय व या कामाप्रति असलेल्या निष्ठा व प्रेमामुळे अनेक कठीण प्रसंगातून त्या अधिकच खंबीर व धीट झाल्या. अनेक कटू प्रसंगातून त्या हाती घेतलेल्या कामाशी समरस होत गेल्या. आपले काम हाच आपला प्रपंच, हे मानणार्‍या मीनाक्षी यांनी या कार्यात आयुष्यभर समर्पित राहण्याचा संकल्पच केला आहे. त्यांच्यासह काम करणार्‍या सर्वच कार्यकर्त्या या दिव्यांग सेवा करण्याचा संकल्प करतात, हेही विशेष.
 
आज मीनाक्षी यांनी हजारो स्त्रियांना त्यांचा जगण्यातील आत्मविश्वास दिला आहे. मीनाक्षी यांनी दृढ निश्चयाचे एक अप्रतिम; परंतु तितकेच आव्हानात्मक कार्य स्वतःवरील विश्वास, कामातील निष्ठा व समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व जपत उभे केले. ज्या दिव्यांग घटकांच्या उन्नतीकरिता त्या समर्पित आहेत, स्वतःदेखील दिव्यांग आहेत अशा तेजःपुंजास सन्मानित करताना, संस्था म्हणून आम्हीही गौरवान्वित झाल्याचे नक्कीच अनुभवत आहोत.
मीनाक्षी निकम यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन!
 
- स्मिता कुलकर्णी
(लेखिका महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0