२०२५ मध्ये यूकेसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या लाटा जाणवल्या. हवामान संशोधनानुसार, भविष्यात आणखी जास्त आणि असह्य तापमानाची शयता तिथे वर्तवली जाते आहे. संपूर्ण जगाला हवामानबदलाचा फटका बसत असताना, उद्योग आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासावर अधिक चर्चा होण्याची गरज निर्माण होत आहे, ज्यामुळे जलदगतीने बदलणार्या हवामानाला तोंड देता येईल किंवा त्याला रोखता येईल.
हवामानबदल ही एक जागतिक घटना असून, त्याचा सर्वाधिक परिणाम शहरी जीवनावर होतो. वाढते जागतिक तापमान समुद्राची पातळी वाढवतेच; शिवाय पूर, दुष्काळ आणि वादळांसारख्या तीव्र नैसर्गिक संकटांनाही आमंत्रण देते. तसेच उष्णकटिबंधीय आजारांचा प्रसारही यादरम्यान वाढतो. या सर्व गोष्टी शहरांच्या मूलभूत सेवा, पायाभूत सुविधा, निवासव्यवस्था, मानवी उपजीविका आणि आरोग्यावर मोठे व खर्चिक परिणाम घडवतात. याचवेळी शहरे स्वतः हवामान बदलासाठी कारणीभूत ठरत आहेत. कारण, शहरी क्रियाकलाप हरितगृह वायू उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. एका अंदाजानुसार, जागतिक ऊर्जा उत्सर्जनापैकी ७० टक्के उत्सर्जनासाठी शहरी क्षेत्रे जबाबदार आहेत, ज्यात वाहतूक आणि इमारती हे मोठे घटक आहेत.
हवामानबदलाचा पायाभूत सुविधांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर विविध प्रकारे परिणाम होतो. मंदगतीने घडणार्या हवामान घटनांमुळे कालांतराने मोठे नुकसान होऊ शकते, तर तीव्र हवामान घटना काही दिवसांमध्ये किंवा अगदी काही तासांतही अत्यंत गंभीर व्यत्यय निर्माण करु शकतात. हवामानबदलामुळे पायाभूत सुविधा आणि त्यांचे संचालन अधिक काळ खंडित राहण्याच्या जोखिमेला सामोरे जात आहे, ज्याचे परिणामही वेळेनुसार वाढत आहेत. बहुतांश पायाभूत सुविधा एकमेकांवर अवलंबून असतात आणि समाज व अर्थव्यवस्थेतील अनेक कार्ये त्यांच्या कामगिरीवर आधारलेली असतात. त्यामुळे एखादी पायाभूत सुविधा निकामी झाल्यास त्याचे परिणाम साखळीप्रमाणे विविध क्षेत्रांवर दिसून येऊ शकतात.
‘रिसर्च गेट’ने उत्तर आशियातील चार देशांमध्ये हवामानबदलाचा नव्याने निर्माण केलेल्या परिसरावर आणि पायाभूत सुविधांवर होणारा संभाव्य परिणाम अभ्यासला आहे. यासाठी त्यांनी चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मंगोलिया या देशांमधील रस्ते व इमारत पायाभूत सुविधांवरील परिणाम हा अनुक्रमे २०३०, २०५० आणि २०९० या दशकांसाठी विचारात घेतला. या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, मंगोलिया, चीन हे देशदेखील बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याबाबत असुरक्षित आहेत; परंतु ही असुरक्षितता निवडलेल्या हवामान परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणावर बदलते. जपान प्रामुख्याने रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित जोखिमांना सामोरे जातो. तरीही, काही परिस्थितीमध्ये इमारतींनाही धोका दिसून आला. मात्र, दक्षिण कोरिया सर्वात कमी असुरक्षित आढळून आला; परंतु तरीही हवामान बदलाच्या परिणामांमुळे या देशातही दरवर्षी एक अब्ज डॉलरपर्यंत खर्च उद्भवू शकतो. या निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की, पायाभूत सुविधांची हवामान-लवचीकता वाढवण्यासाठी त्यावर मोठी आर्थिक गुंतवून करणे आज आवश्यक आहे.
अशा उपाययोजनांमुळे पायाभूत सुविधांचे आयुर्मान वाढतेच; पण त्याचबरोबर गुंतवणुकीवरील परतावा सुरक्षित राहतो आणि व्यवसायसातत्य टिकून राहते. जागतिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरांवर समन्वित दृष्टिकोन आणि कृती केल्यासच हवामानबदलाशी यशस्वीरीत्या सामना करता येऊ शकतो. म्हणूनच, हवामानबदलाच्या लढ्यात शहरांना उपाययोजनेचा अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. अनेक शहरे आधीच नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर, स्वच्छ उत्पादन तंत्रज्ञान, तसेच औद्योगिक उत्सर्जन मर्यादित करण्यासाठी नियम आणि प्रोत्साहन योजना सादर करत आहेत. यामुळे उद्योग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणारे स्थानिक प्रदूषण कमी होते आणि परिणामी, शहरी हवेची गुणवत्ता, तसेच नागरिकांचे आरोग्य सुधारते.