राजा राजा : प्रसिद्ध संगीतकार हितेश मोडक यांची आगळी-वेगळी कलाकृती

    29-Nov-2025
Total Views |
 
Marathi Song Raja Raja

मराठी मनोरंजनविश्वात नुकतेच एक आगळंवेगळं गाणं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दाखल झालं आहे, ते म्हणजे ‌‘राजा राजा.‌’ प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हितेश मोडक यांची ही कलाकृती असून सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता आयुष संजीव अभिनीत ‌‘राजा राजा‌’ हे गाणं आहे. नुकतीच या गाण्याच्या टीमने दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’शी विशेष बातचीत केली.
 
“हे गाणं पाहून त्याच्या चित्रीकरणाचंसुद्धा कौतुक केलं जात आहे. गाण्यात विशेषकरुन अमृतावर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत. अगदी गावरान बाजात ती खूपच सुंदर दिसते. सतत पाऊस, व्हॅनिटी व्हॅनची सोय नाही, अशा अनेक समस्या समोर असताना अमृताने 200 नर्तकांच्या टीमसह या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. गाण्याच्या चित्रीकरणावेळी अमृताची तब्येतही ठीक नव्हती, मात्र तिने हे कुठेही जाणवू दिलं नाही. कारण, अभिनयाप्रति असलेलं तिचं प्रेम आणि अर्थात तिच्या मेहनतीचं फळ संपूर्ण गाण्यात प्रतिबिंबित होते,” असे संगीत दिग्दर्शक हितेश मोडक सांगतात.
 

पुढे गाण्याबाबत बोलताना मोडक म्हणाले की, “युट्यूबसाठी काहीच मर्यादा नाहीत, म्हणून मी या प्लॅटफॉर्ममार्फत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ‌‘हितेश मोडक ओरिजिनल्स‌’मार्फत केला. आपल्या दिग्गजांनी संगीतात जे कार्य केलं आहे, त्याला व्हिडिओचे स्वरूप देण्याचा माझा प्रयत्न आहे. अगदी सिनेमासारखं गाण्याचं चित्रीकरण हवं आहे, त्यामुळे त्याचा विचारही तितकाच मोठा पाहिजे. हे ‌‘ब्रेकअप साँग‌’ आहे. भावना दुखावल्यानंतर एक मुलगी काय करू शकते, ते या गाण्यातील नृत्यामधून मांडलं आहे. अमृताने हे गाणं खूप अडथळ्यांचा सामना करत पार केलं.”
 
टिझरवरून या गीताच्या कथेत प्रियकर-प्रेयसीमध्ये निर्माण झालेला दुरावा पाहायला मिळतो. अर्थात, हा दुरावा संगीतकार हितेश मोडक यांनी त्यांच्या संगीताने अगदी उठावदार केला आहे. नृत्यदिग्दर्शक सचिन कांबळे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. ‌‘जीव रंगला‌’, ‌‘लल्लाटी भंडार‌’ यांसारखी प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर नाव कोरली गेलेली गाणी लिहिणारे गीतकार संजय पाटील यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर गायक रामानंद उगले, सौरभ साळुंखे, श्वेता दांडेकर यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं गायलं आहे, तर हे सुंदर गाणं अगदी अचूक लोकेशनसह सुनीत गुरवने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
 



‌‘हितेश मोडक ओरिजिनल्स‌’च हे पहिलंच गाणं असून, टिझर पाहूनच गाण्याची उत्सुकता वाढली आहे. आजवर हितेश मोडक यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचासुद्धा आवाज या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. डबिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रेयसने या गाण्यातसुद्धा सुरुवातीला आवाज दिला आहे.

- अपर्णा कड