मराठी सिनेविश्वात सध्या फार वेगळ्या धाटणीचे आणि पारंपरिक लोककला, प्रथा यांना उजेडात आणणारे चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. मागच्या काही दिवसांत ‘गोंधळ’, ‘दशावतार’ यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले, तर दि. 5 डिसेंबर रोजी ‘असुरवन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातही कोकणातल्या मातीतली एक आगळीवेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे.
‘असुरवन’ चित्रपटाच्या नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये कोकणातील मातीचा गंध दरवळताना दिसतो. कोकणच्या आदिवासी पाड्यांतील प्राचीन वारली संस्कृतीची प्रथा, रूढी, परंपरा या चित्रपटात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. कोकणातील एका शापित घनदाट डोंगररांगेवर झालेला फिरसत्या देवाचा कोप, तसेच उत्सुकता वाढवणारा सूर्याचा मुखवटा असणारा चेहरा नेमका कोणाचा, यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘खबर कलली का?’ या आगरी भाषेतील संवादाने या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. तेव्हा, दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही नेमके या चित्रपटात आहे तरी काय, हे ‘असुरवन’च्या टीमकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
‘असुरवन’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सचिन आंबात सांगतात की, “ ‘असुरवन’ या शब्दातच अर्थ आहे आणि तो म्हणजे शापित जंगल! चित्रपटाची कथा एका जंगलाभोवती फिरते. या चित्रपटातून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील परंपरा, संगीत, कला आणि एकूणच त्यांची संस्कृती, जी यापूव कधीही मोठ्या पडद्यावर झळकली नाही, त्याचे दर्शन होणार आहे. जसे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तेथील सांस्कृतिक परंपरा याच कथेच्या केंद्रस्थानी असतात, तसेच आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या आपण चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजे. तेव्हा, चित्रपट वास्तवदश वाटण्यासाठी या संपूर्ण चित्रपाटेच चित्रीकरणसुद्धा आम्ही ठाणे आणि तेथील आसपासच्या खऱ्याखुऱ्या ठिकाणीच केले आहे.”
‘असुरवन’ चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांसमोर आल्यानंतर, प्रेक्षकांच्या अपेक्षा या चित्रपटाकडून वाढल्या आहेत. त्याविषयी सचिन आबात सांगतात की, “जेव्हा हा ट्रेलर आम्ही एडिट करत होतो, तेव्हा माझ्या मनात एकच होतं की, या चित्रपटासाठी सिनेमागृहाची तिकिटं प्रेक्षकांनी आवर्जून काढली पाहिजे. या चित्रपटातील गूढ, रहस्य, वारली संस्कृती यांची उत्कंठा त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मराठीत असं सस्पेन्स, थ्रिलर शापित जंगलाची कथा पहिल्यांदाच चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दि. 5 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि माझी खात्री आहे, रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”
याशिवाय, इतर कलाकारांनीसुद्धा आपापल्या भूमिकांविषयी थोडक्यात माहिती दिली; पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, असे सांगून ही उत्कंठा त्यांनी अधिकच ताणली. या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे, गणेश गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच या चित्रपटाची प्रदर्शनापूवच ‘कांतारा’ आणि अन्य चित्रपटांशी होत असलेल्या तुलनेवर दिग्दर्शक आणि कलाकार सांगतात की, “या चित्रपटाची तयारी मागील चार-पाच वर्षांपासून सुरू झाली होती. अशा धाटणीच्या चित्रपटांचा ट्रेंड आता आला असला, तरी ‘असुरवन’ची कहाणी खूप आधीच लिहिली गेली होती.”
दरम्यान, ‘असुरवन’ चित्रपटाचं पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण, यादरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली. ‘असुरवन’ चित्रपटातील मुख्य अभिनेता सचिन चांदवडे याने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. त्याच्या निधनाच्या बातमीने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार, तसेच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला होता. पण, चित्रपटात त्याने फार उत्साहाने काम केल्याचे यावेळी दिग्दर्शकांनी आवर्जून अधोरेखित केले.