"अंबरनाथमध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला, पण त्यांपैकी केवळ २० ते २५ टक्के निधीचा वापर विकासकामांसाठी करण्यात आला. उर्वरित निधी हा कोणाच्या खिशात गेला? अंबरनाथ शहराला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीमुळेच इथला विकास होऊ शकला नाही. मी नगराध्यक्ष झाले, तर भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम करेन,” असा विश्वास भाजप आणि आरपीआय (आठवले गट) युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीए तेजश्री करंजुले-पाटील यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला. तसेच अंबरनाथ शहराच्या विकासाचे व्हिजनही त्यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केले.
अंबरनाथ शहरात गेल्या २५-३० वर्षांपासून सत्ताधार्यांनी काळराज्य केले. विकास मात्र ठप्पच राहिला. तुम्हाला काय वाटतं, अंबरनाथचा विकास कोण थांबवतंय?
अंबरनाथकरांचा विकास हा भ्रष्टाचाराने अडविला आहे. आपल्या बाजूलाच असलेले शहर म्हणजे बदलापूर. या बदलापूरमध्ये विकास झाला, मग अंबरनाथमध्ये का होऊ शकला नाही?
अंबरनाथ शहर आज कचरामय झालेले दिसते. ठाणे महानगरपालिकेने ‘ब्लॅकलिस्ट’ केलेली कंपनी घनकचर्याचे अंबरनाथमध्ये काम करीत आहे. मग ही अंबरनाथकरांची फसवणूक नाही का?
अंबरनाथकरांची नक्कीच फसवणूक होत आहे. आतापर्यंत जे नगरसेवक राहिले, तेच ठेकेदार राहिल्यामुळे शहरात कचराप्रश्न अधिक जटिल झाला आहे. शहरात रस्त्यावर सर्व ठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. येत्या काळात नगरसेवकांकडे असलेली ठेकेदारी संपुष्टात आणायची आहे.
घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टीने तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे?
अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कचरा घराघरांतून उचलला गेला पाहिजे, अशा निविदा काढल्या आहेत. मात्र, त्या पद्धतीने काम चालत नाही. खरं तर सध्या दररोज कचरा गोळा करण्यासाठी चार-चार दिवस गाडीच येत नाही. सोसायटीवाले कचरा गोळा करून ठेवतात. पण, पैसे दिल्याशिवाय कचरा उचललाच जात नाही. इतका भ्रष्टाचार या शहरात आहे आणि तोच भ्रष्टाचार मोडीत काढायचा आहे. कचर्याच्या विघटनासाठी जी सोसायटी आम्हाला मदत करेल, त्यांना आम्ही घनकचराकरात सूट देऊ.
गेल्या तीन दशकांत सत्ताधार्यांनी शहरातील पाणीपुरवठा सुधारण्याकडेही लक्ष दिले नाही. तेव्हा, नगराध्यक्षपदी निवड झाली तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना तुमच्याकडून केल्या जातील?
पाणी ही मूलभूत गरज असून, मुबलक आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. नागरिकांचे प्रश्न समजून घेत असताना, कधी नळाला हिरवे पाणी येते, तर कधी एक ते दोन दिवसाआड पाणी येते. पाणीचोरी आणि पाणीगळती यांमुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पाण्याची पाईपलाईन बदलून आणि पाणीचोरीला आळा घालून नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
अंबरनाथमध्ये ड्रेनेज लाईनची समस्यादेखील मोठी आहे. ही समस्या तुम्ही कशी सोडविणार आहात?
अंबरनाथमध्ये लोकसंख्या वेगाने वाढते आहे. आजूबाजूला नवनवीन नागरी प्रकल्प उभे राहात आहेत. नाले-जिथून ड्रेनेज जाते, ते अरुंद आहेत. ते बदलण्याची गरज आहे. ड्रेनेजचे पाईप रुंद करण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणाचा आढावा घेऊन गरजेनुसार बदल केले जातील.
महिलांसाठी स्वतंत्र प्रसुती रुग्णालय उभारणं हे तुमच्या प्राधान्यक्रमात असेल का?
अंबरनाथ नगरपालिकेचे जे रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात महिलांची प्रसुती होत नाही. कैलासनगर विभागात मी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गेली असता एका कुटुंबांची भेट घेतली, तेव्हा ही बाब निदर्शनास आली. रुग्णालयाच्या चुकीमुळे त्या आईला आपले बाळ गमावावे लागले. एका खासगी रुग्णालयाने त्यांना सेंट्रल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, तोपर्यंत बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत गेले आणि बाळ दगावले.
‘भयमुक्त अंबरनाथ’ ही घोषणा आपण प्रत्यक्षात कशी अमलात आणणार आहात?
अंबरनाथमधील ‘एमआयडीसी’ कंपन्यांना आम्ही नुकतीच भेट दिली. एकूण १४ कंपन्यांना आम्ही भेट देणार होतो. कारण, त्याठिकाणी आपल्या स्थानिक महिला काम करतात. त्यामुळे तिथे जाऊन महिलांशी चर्चा केली. कंपनीमालकांशीही महिलांना मतदानांच्या दिवशी मतदान करण्यासाठी कार्यालयीन वेळेत थोडीफार सवलत देण्याबाबत चर्चा केली. त्याच्या दुसर्या दिवशी आम्ही उर्वरित कंपन्यांत जाणार होतो. तेव्हा त्या कंपनीकडून ‘तुम्ही येऊ नका’ असे सांगण्यात आले. कारण, पाच कंपनीमालकांना धमकीचा फोन आला होता. एवढी अंबरनाथमध्ये दहशत आहे. ही दहशत आम्हाला मोडून काढायची आहे. मी नगराध्यक्ष झाले, तर याला पाठिंबा देणार नाही.
अंबरनाथचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार तुम्ही व्यक्त केला आहे. तेव्हा हा बदल तुम्ही कसा घडवून आणणार? तुमचे व्हिजन काय?
अंबरनाथ शहर हे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पहिल्या एका वर्षात लोकांना चांगल्या मूलभूत सोयी मिळतील, हे पाहणार आहोत. तीन वर्षांच्या आत अद्ययावत रुग्णालय उभारणार आहोत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात भटया कुत्र्यांची समस्या जाणवते. त्यांच्यासाठी ‘शेल्टर होम’ बनविणार आहोत. आरक्षित जागांसाठी निधी आला, पण त्यांचा विकास झाला नाही. त्यांचा विकास करून सांस्कृतिक केंद्र, रोजगारनिर्मिती प्रशिक्षण केंद्र यासाठी प्रयत्न करणार आहे.
विकसित व आधुनिक अंबरनाथसाठीचं आपलं व्हिजन काय?
मूलभूत गरजांपासून सुरुवात करून ‘विकसित अंबरनाथ’कडे जायचं आहे. प्रत्येक चौकात सुशोभीकरण करायचे आहे. नगरपालिकेची वेबसाईटदेखील चालत नाही. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागते. मग आपण घरबसल्या घरपट्टी का भरू शकत नाही? तक्रारदेखील ऑनलाईन करू शकत नाही. म्हणजे, एकीकडे आपली वाटचाल ‘डिजिटल इंडिया’कडे सुरू आहे. पण, अजूनही अंबरनाथ डिजिटायझेशनकडे वळलेले दिसत नाही.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अखेरीस मतदारांना आपण काय आवाहन कराल?
जेव्हा आपण नोकरीसाठी अर्ज करतो, तेव्हा साहजिकच शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाते, तर नगराध्यक्ष हे तर एवढे मोठे पद आहे. त्यामुळे इथेही मतदान करताना जनतेने नक्कीच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहिली पाहिजे. शिक्षित व्यक्तीला त्यांचे विचार असतात. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शहराच्या विकासासाठी होऊ शकतो. त्यामुळे दि. २ डिसेंबरला नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन मतदानाचा हक्क बजावावा आणि भाजपला भरघोस मतांनी जिंकून द्यावे.