मुंबई : (Ditwah Cyclone) गेल्या काही दिवसांपासून भारताच्या सागरी किनारपट्टीवर सातत्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असून आता दितवाह (Ditwah Cyclone) नावाच एक नवीन वादळी संकट देशाच्या सागरी हद्दीत येत असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे दितवाह वादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरातून वायव्येकडे सरकत असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दितवाह चक्रीवादळाचा (Ditwah Cyclone) परिणाम व्यापक असण्याची शक्यता आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार हे कमी दाबाचं क्षेत्र १७ किमी प्रतितास इतक्या वेगानं उत्तर पश्चिमेस पुढे जाणार असून३० नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये त्याचा परिणाम जाणवेल. त्यासोबतच सध्या या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Ditwah Cyclone)
हवामान विभागाने जाहीर केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार, बंगालच्या नैऋत्य उपसागर आणि लगतच्या श्रीलंकेच्या किनाऱ्यावरील दितवाह चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Ditwah Cyclone)