मुंबई : ( Ganesh Khanakar ) भाजपचे मुंबई सरचिटणीस गणेश खणकर यांच्यावर बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री काजूपाडा, बोरिवली पूर्व, मुंबई येथे शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर दवाखान्यात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. याबाबत दहिसर पोलीस ठाण्यात गणेश खणकर यांच्या तक्रारीनुसार गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी ‘कलम बीएनएसएस १७३’अंतर्गत ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ‘कलम ११८(२)’, ‘११५’, ‘३५१(२)’, ‘३५२,३(५)’नुसार सुबोध माने, स्वाती माने आणि अफरोझ काझी यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी बिल्डिंगसमोर टँकर लावून वाहतुकीची कोंडी केल्याबाबत विचारणा करण्यास गेले असता, गणेश खणकर यांच्यविषयी मनात राग धरून रात्री ८.४५ वाजता सुबोध माने, स्वाती माने आणि अफरोझ काझी यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच गणेश खणकर यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्यांनी आणि लोखंडी वस्तूने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
या भ्याडहल्ल्याचा भाजप माध्यमप्रमुख नवनाथ बन आणि भाजप जिल्हा अध्यक्ष उत्तर मुंबई दिपक तावडे यांनी निषेध केला आहे. "मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्यावे. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांचे हे वर्तन योग्य नाही. पोलीस पुढील तपास करीत असून त्यातून सत्य बाहेर येईल. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत.अन्यथा, आम्हीही ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सक्षम आहोत,” अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली, तर दिपक तावडे म्हणाले की, "उबाठा गटाचे शाखाप्रमुख सुबोध माने यांनी केलेल्या या भ्याडहल्ल्याचा मी निषेध करतो. आम्ही त्यांना कायद्याने योग्य ते उत्तर देऊ. निवडणुकीच्या तोंडावर या कुरापती काढल्या जात आहेत.”