मुंबई : ( Anti-Hindu Books at Ambivli Station ) आंबिवली रेल्वेस्थानक परिसरात नुकताच घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तथाकथित संत रामपाल यांच्या अनुयायांनी उभारलेल्या स्टॉलवरून सनातन धर्मविरोधी आशयाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाटप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हरियाणातील हिसार येथे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरलेले आणि सध्या तुरुंगामध्ये असलेले रामपाल यांच्या विचारसरणीचे हे साहित्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आंबिवलीसारख्या गर्दीच्या परिसरात उघडपणे धर्मविरोधी पुस्तके वाटप केल्याची घटना उघड झाल्यानंतर नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. आरोप-प्रत्यारोप, धार्मिक तणाव आणि सनातनविरोधी वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराकडे गंभीरतेने पाहण्याची मागणी वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टॉलवरील पुस्तकांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक आणि भ्रमित करणारे मजकूर स्पष्टपणे छापलेले होते.
‘ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पूजा करणारे राक्षस आहेत’, ‘हे देव नव्हेत, आमच्याच उपासनेला वाचा फोडा,’ अशा थेट आणि उघडपणे सनातन धर्माची खिल्ली उडवणार्या ओळी अनेक पुस्तकांत वारंवार लिहिलेल्या दिसतील. यांपैकी ‘अंध श्रद्धा भक्ति-खतरा-ए-जान’ नावाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कुंभमेळ्याचे छायाचित्र आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या साधूंचा फोटो वापरण्यात आला होता. पुस्तकाच्या आतील पानांमध्येही धार्मिक चालीरितींबाबत दिशाभूल करणारी, उत्तेजक आणि सनातनविरोधी कथने मोठ्या प्रमाणावर असल्याचे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले.
हिंदुत्ववादी संघटनांनी स्टॉल बंद पाडला
या प्रकरणाची माहिती मिळताच ‘विश्व हिंदू परिषद’-बजरंग दल, कल्याण जिल्हा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्टॉल बंद पाडला. संघटनांनी संबंधित साहित्य जप्त करून संपूर्ण प्रकरण खडकपाडा पोलीस चौकीत नोंदवले. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना त्यांनी अशा प्रकारच्या साहित्यामुळे सामाजिक वैमनस्य निर्माण होऊ शकते, सार्वजनिक शांतता भंग होण्याची शयता असल्याचा मुद्दा मांडला. यावेळी तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी वितरित करण्यात आलेल्या सर्व पुस्तकांप्रति चौकीत जमा करून पुढील कारवाईचे आश्वासन दिले. साहित्याचे परीक्षण करून आवश्यक ते कायदेशीर पावले उचलली जातील, असे पोलिसांनी संघटनांना कळवले आहे.
कल्याण परिसरात हिंदू समाजाची दिशाभूल करण्याचे आणि धर्मांतरित करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अनधिकृत प्रार्थनास्थळे, मदरसा आणि चर्चच्या माध्यमातून ‘लॅण्ड जिहाद‘चे प्रमाण आंबिवली, बाल्याणी आणि कल्याणमध्ये दिसून येत आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रशासनाला ताकीद देत आहे की, साधू-संतांचा, संस्कृतीचा, सनातनचा अपमान सहन केला जाणार नाही.
- अॅड. रोशन बबन जगताप,
कल्याण जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद