पाढ्यांना घराघरात नेणारे व्यक्तिमत्व

28 Nov 2025 10:16:21
 
Mandar Trimbak Namjoshi
 
‘बे एके बे, बे दुणे चार’ असे बोबडे किंवा लहान मुलांचे आवाज आजकाल घराघरातून ऐकूच येत नाहीत. यासाठीच तळमळीने ‘चळवळ’ म्हणून कार्य करणार्‍या पुण्यातील मंदार त्रिंबक नामजोशी यांच्याविषयी...
 
‘शिक्षणपंढरी’ म्हणून ख्यातनाम पुण्यातच जन्म, बालपण आणि शिक्षण घेतलेल्या मंदार नामजोशी यांचा प्रवास चकित करणारा असाच. ध्येयवेडी माणसे कशी असतात, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंदार नामजोशी. एसएसपीएस, पुणे विद्यार्थी गृह आणि सिम्बॉयसिस येथून शिक्षण घेतलेल्या मंदार यांना इयत्ता चौथीतच नाट्यवेड जडले. त्यांनी ‘बालनाट्य’ ते ‘नाटक’ प्रवासातील सर्व प्रकार अगदी या आवडीतून लीलया हाताळले. जयंत तारेंकडे त्यांचा सुरू झालेला हा प्रवास भन्नाट असाच. अभिनेता सतीश तारेंसमवेतही त्यांची गट्टी जमली. मग, उदरनिर्वाह म्हणून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे काम आले आणि येथूनच एका टप्प्यावर आपल्या भारतातील गणित नाहीसे होत चालल्याची तीव्र जाणीव झाली आणि त्यांनी यासाठी मग अक्षरशः झपाटल्यागत कार्य सुरू केले. ‘अंकनाद’ हा त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा.
 
प्रख्यात संशोधक आईनस्टाईनचे एक प्रसिद्ध वाय आहे, "भारताने आम्हाला एक ते दहा हे आकडे सांगितले नसते, तर आम्ही विज्ञानात संशोधन करूच शकलो नसतो.” आज भारतातील विद्यार्थ्यांमधील गणिताची अवस्था अतिशय भयावह आणि गंभीर आहे. आठवीतील विद्यार्थ्यांनादेखील पाढे येऊ नयेत, ही शोकांतिका दूर करण्यासाठी मंदार यांचा ‘अंकनाद’ समजून घ्यावाच लागेल, जेणेकरून घराघरातून पालकांनीदेखील पाढे पाठ करायला आपल्या पाल्याला आग्रह केला पाहिजे. आजकालचा काळ हा प्रत्येकाच्या हातात मोबाईलचा. ‘गणितालय’ पोर्टलवर जरी लहान मूल पाढे पाठ करण्यात मश्गूल झाले, तरी भविष्यात भारतात हुशार पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही, असा मंदार यांचा ठाम विश्वास आहे. आता त्यांचे कार्य चार राज्यांत अव्याहत सुरू आहे. पुण्यातील अनेक शाळांमधून त्यांचे हे प्रयोग यशस्वीपणे अंगीकारले जात आहेत.
 
सध्या ते ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि.’चे संचालक म्हणून कार्यरत असून, शिक्षणक्षेत्रातील नवोन्मेषी उपक्रमांना दिशा देण्याचे कार्य ते करीत आहेत. ‘गणित’ ही कोणत्याही शोध, कल्पना किंवा तांत्रिक प्रगतीची मूलभूत भाषा आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये गणितविषयक पायाभूत आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज आहे, ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, अंकज्ञान आणि भाषाज्ञान हे प्रारंभिक शिक्षणातील दोन महत्त्वाचे दुवे आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी विकसित केलेली ‘अंकनाद’ ही गणिताचे मूलतत्त्व आत्मसात करण्याची प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारी ठरते. मैत्रीपूर्ण पद्धतीने गणिताची भीती घालवून, संकल्पना मनात खोलवर रुजवणारी ही पद्धत शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण हस्तक्षेप मानली जाऊ शकते.
 
अपूर्णांकांचे पाढे हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. पिढ्यान्पिढ्या संध्याकाळी पाढे म्हणण्याची परंपरा होती. त्या परंपरेचा लोप झाल्यामुळे भाषिक गणिताची पकड कमी झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती निर्माण झाली. ‘पाढे सात्मिकरण’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उजवा मेंदू सक्रिय होतो आणि त्यांच्यात तार्किक विचारशक्ती विकसित होते, ज्याचा त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. सद्यस्थितीत ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली जाते. मात्र, आज ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ आणि राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग यांच्या वतीने अभिमानाने घोषणा करण्यात येते की, ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ आता राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. अपूर्णांकांचे पाढे म्हणजे पूर्णांक नसलेल्या अपूर्णांकांच्या गुणाकारांचे पाढे. हे पाढे गणित सोपे करण्यासाठी तयार केले आहेत आणि त्यात ’पाव’, ’निम्मे’, ’पाऊण’, ’सव्वा’, ’दीड’ आणि ’अडीच’ अशा अपूर्णांकांचा समावेश आहे. यामुळे गणितातील क्रिया जलद होतात. कारण, हे पाढे पाठ करण्याऐवजी ऐकून लक्षात ठेवता येतात.
 
नाट्यक्षेत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, तांत्रिक निर्मिती आणि प्रसारण क्षेत्रातही मंदार नामजोशी यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. ‘राजयोगिनी अहिल्याबाई’सारख्या भव्य नाट्य प्रयोगांपासून ते ‘डॉयुमेंटरी‘ निर्मितीपर्यंत अनेक प्रकल्प त्यांनी हाताळले. ‘लोकमान्य हॉस्पिटल’, ‘चंदूकाका सराफ’ यांसारख्या संस्थांसाठी त्यांनी टीव्ही जाहिराती आणि रेडिओ जिंगल्सचे दिग्दर्शन केले आहे. ‘रेशीमगाठी’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत ते सहदिग्दर्शक होते, तर ‘अभियान’ या मराठी चित्रपटाशीही त्यांचा संबंध दिग्दर्शन विभागातून आला. नाट्य अभिनय आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी आपली छाप निर्माण केली आहे. ‘तुरतुर’, ‘घाशीराम कोतवाल’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, तर ‘अनाहत’ या एकांकिकेचे दिग्दर्शन करून त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत.
 
प्रकाश, ध्वनी, स्टेज डिझाईन आणि कार्यक्रम समन्वय या क्षेत्रांतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय असून, ‘ज्ञानेश्वरीचा प्रसार’ या उपक्रमात ते सहभागी झाले आहेत. तसेच, ‘सुरंजन’ या नाट्य संस्थेचे ते विश्वस्त आहेत. कला आणि सामाजिक बांधिलकी यांचे अद्वितीय मिश्रण त्यांच्या कार्यात सतत दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखालील त्यांची ही संस्था केवळ गणितविषयक शिक्षण सुधारण्यापुरती मर्यादित नसून, नव्या पिढीला बौद्धिक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्ट्या ताकदवान करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘अंकनाद’सारखी प्रणाली ही त्यांच्या मोठ्या ध्येय-धोरणाची एक पायरी आहे. आजच्या डिजिटल, तांत्रिक आणि वेगाने बदलणार्‍या जगात विद्यार्थ्यांनी गणित, तर्कशक्ती आणि विश्लेषण कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
 
गणिताची भीती घालविण्यासाठी त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. गणित हा सर्व शास्त्रांचा पाया मानला जातो. तरीसुद्धा आजही शालेयस्तरावर सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती आढळते. विद्यार्थ्यांची ही भीती कमी करून गणिताशी त्यांची मैत्री व्हावी, या हेतूने ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. ‘अपूर्णांकांचे पाढे’ हे भारतीय गणिताचे अनमोल वैशिष्ट्य आहे. शालेय अभ्यासक्रमात अपूर्णांकांची उदाहरणे असली, तरी अपूर्णांकांचे पाढे शिकवले जात नाहीत. अपूर्णांकांच्या पाढ्यांची उपयुक्तता आणि महत्त्व लक्षात घेता, राज्य मराठी विकास संस्था आणि ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स’ यांनी एकत्रितपणे ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला. आजवर एक लाख ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 - अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0