मुंबई : ( Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दक्षिण गोव्यातील गोकर्ण जीवोत्तम मठात प्रभू रामाच्या ७७ फुटांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. शुक्रवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३: ४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल होतील, त्यानंतर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण हेणार असल्याची माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांनी दिली आहे.
भारताचे लोह पुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनीच गोव्यातील प्रभू रामाचा हा भव्य पुतळा घडवला आहे. प्रभू रामाचा हा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा असणार आहे.
नरेंद्र मोदी हे शुक्रवारी दुपारी ३:४५ वाजता विशेष हेलिपॅडद्वारे मठ परिसरात पोहोचतील. त्यांच्यासोबत गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि अनेक कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील. गोव्याचा हा ऐतिहासिक मठ ५५० वर्षे पुरातन आध्यात्मिक इतिहासाचे प्रतीक आहे. २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत दररोज ७,००० ते १०,००० भाविक येण्याची शक्यता आहे.