संस्कृतीचा जागता दीप

27 Nov 2025 11:00:30
prajpathashl
 
’धर्मकार्य’ हा शब्दप्रयोग नित्यातील वापराचा. मात्र, या धर्माचे स्वरुप नेमके काय? याबाबत चिंतन करणेही महत्त्वाचे असते. भारतामध्ये सनातन धर्माचे स्वरुप सांगणारे अनेक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहेत. हे धार्मिक आणि अध्यात्मिक साहित्यातील विषयांवर चिंतन, मनन करण्याचे कार्य गेली शतकापेक्षा जास्त कालखंड वाईमधील प्राज्ञ पाठशाळा मंडळ करत आहे. ’धर्मकोष’ हा या संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम. धर्मकार्य करणार्‍या या संस्थेचा इतिहास, त्यांचे कार्य अशा विविध अंगाने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध् आहे. या भूमीतील सांस्कृतिक परंपरेला, अभ्यासपूर्ण दिशा देणारे एक तेजस्वी केंद्र म्हणजे ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ.’ १०० वर्षांहून अधिक काळ हे मंडळ वेदशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान आणि नव्या काळातील, विचारप्रवाह यांचा सुसंवाद साधत आहे.
 
कोकणातील सुडकोली या गावाहून वेदाभ्यासासाठी वाई येथे आलेल्या नारायणशास्त्री मराठे यांनी, आपल्या ध्येयाने प्रेरित होऊन इ.स. १९०४ मध्ये ‘प्राज्ञमठ’ या उपक्रमाची पायाभरणी केली. पुढे विजयादशमीच्या मंगल दिनी दि. ६ ऑटोबर १९१६ रोजी प्राज्ञपाठशाळेची स्थापना झाली. दि. २१ जुलै १९२० रोजी या संस्थेची विधिवत नोंदणी ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’ या नावाने झाली. संन्यासस्वरूप स्वीकारल्यानंतर नारायणशास्त्री ‘स्वामी केवलानंद सरस्वती’ या नावाने प्रसिद्ध झाले. कोणताही मोबदला न घेता, त्यांनी १९३१ पर्यंत संस्थेचे नेतृत्व सांभाळले आणि एक विलक्षण आदर्श समाजासमोर ठेवला.
 
पहिल्या काळात येथे वेदशास्त्र आणि संस्कृत शिक्षणाची परंपरागत पद्धती जोपासली गेली. विद्यार्थ्यांचे जीवन शिस्तबद्ध, सदाचारी आणि संस्कारित घडविणे हा येथील शिक्षणाचा पाया होता. पुढे स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रनिर्मितीच्या चळवळीची हवा देशभर पसरत असताना, तिचा सुगंध प्राज्ञपाठशाळेतही पोहोचला. पौर्वात्य ज्ञानपरंपरा आणि उदयोन्मुख विचार यांचा संगम साधून, एक वैशिष्ट्यपूर्ण, धाडसी शैक्षणिक प्रयोग येथे घडून आला.
 
इ.स. १९२५ मध्ये स्वामी केवलानंद सरस्वती यांनी ‘धर्मकोश’ या महत्त्वाकांक्षी कार्यास प्रारंभ केला. हिंदू संस्कृतीच्या मूळ स्रोतांचा ऐतिहासिक आणि तत्त्वनिष्ठ अभ्यास करून, धर्मविषयक माहिती प्रामाणिक आणि पद्धतशीर रूपात सादर करण्याचा हा प्रयत्न होता. या ‘धर्मकोशा’च्या ११ कांडांपैकी, सध्यापर्यंत २७ खंड प्रसिद्ध झाले आहेत. देशविदेशांतील विद्वानांनी या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. ‘धर्मकोश’ प्रकल्प हा केवळ ग्रंथनिर्मितीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण हिंदू धर्मपरंपरेचा सखोल उलगडा आणि पुनर्विचार करण्याचा एक व्यापक वैचारिक उपक्रम आहे. १९२५ मध्ये स्वामी केवलानंद सरस्वती यांनी हा प्रस्ताव स्वीकारला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर धर्म आणि संस्कृतीविषयी विखुरलेले संस्कृत स्रोत एकत्र करून, त्यांचे ऐतिहासिक व तात्त्विक विश्लेषण करणे आणि पुढील पिढ्यांसाठी संदर्भग्रंथसंच तयार करणे, हाच ध्यास होता. हा प्रकल्प बदलत्या काळाचा वेध घेतो, पण त्यातून मूळ परंपरेचे भान राखण्याचा समन्वयवादी दृष्टिकोनही आम्ही पाहतो.
 
‘धर्मकोशा’ची रचना एकूण ११ कांड व ४६ खंड असा नियोजित असून, त्यात व्यवहार, उपनिषद, संस्कार, राजकारण, शांती अशा धर्मजीवनाच्या विविध अंगांना स्वतंत्र विभाग मिळाले आहेत. आतापर्यंत २८ खंड प्रकाशित झाले आहेत आणि उर्वरित भागावर, जवळपास शतकभर सातत्याने काम सुरू आहे. म्हणजेच, यावरून उपक्रमाची व्याप्ती व त्यामागे असणारी दूरदृष्टी यांचा आपल्याला अंदाज लावता येईल. खंडसंख्या विषयाच्या विस्तारानुसार बदलत असतात, त्यामुळे संपादन, संदर्भसंकलन व भावनिरूपणासाठी विद्वत्तेबरोबरच संयमही अपरिहार्य असाच.
 
‘धर्मकोश’ हे ग्रंथसंच तयार करताना, केवळ संचयित साहित्य संकलित करण्यापुरते समाधानी न राहता, त्यांना त्यांच्या ऐतिहासिक क्रमात ठेवून पार्श्वभूमी स्पष्ट केली जाते आणि परस्पर संबंध उलगडणारा अभ्यासकांपुढे सादर केला जातो. यामुळे हे ग्रंथसंच फक्त पौराणिक, स्मृतिग्रंथीय वा वेदकालीन संदर्भांच्या भांडारापुरते मर्यादित राहात नाहीत, तर धर्म व समाजातील बदल कसे घडले, काय टिकून राहिले आणि काय रूपांतरित झाले, याचा बौद्धिक मागोवा देणारे साधन ठरतात.
 
आजच्या झपाट्याने बदलणार्‍या शिक्षणपद्धतीमध्ये असे संयत, सूक्ष्म आणि दीर्घकालीन अभ्यास करणारे विद्वान कमी होत चालले असताना, प्राज्ञपाठशाळा मंडळाने हा दिवा विझू दिलेला नाही आणि हीच या कामाची मजबूत बाजू आहे. या प्रकल्पाचे महत्त्व ओळखून, देशविदेशांतील प्राच्यविद्याविशारदांनी त्याला मोठा मान दिला आहे. उदाहरणार्थ, रा. ना. दांडेकर, म. अ. मेहेंदळे यांसारख्या अभ्यासकांनी ‘धर्मकोशा’च्या शास्त्रशुद्धतेचे व मौलिकतेचे कौतुक केले आहे; तर पाश्चिमात्य पंडित लुडविग स्टर्नबाख आणि लुई रेनॉ यांसारख्या विद्वानांनीही साध्या खासगी देणग्यांवर चालवणारी ही संस्था असं विस्तृत संशोधन कार्य करत असल्याबद्दल आश्चर्य आणि आदरच व्यक्त केला.
 
देशपातळीवरील विद्वानांनी, विद्यापीठीय जर्नल्सनी आणि अग्रणी वर्तमानपत्रांनी ‘धर्मकोशा’वर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला आर्थिक आधार मिळवण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या आवाहनपत्रावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्वाक्षरी केली आहे. ‘धर्मकोश’ प्रकल्प हा केवळ पंडितपरंपरेपुरता मर्यादित न राहता, नवभारताच्या जडणघडणीच्या व्यापक चिंतनाशी त्याची नाळ जोडलेली आहे, हे यावरून सहज लक्षात येते.
 
१९३१ नंतर त्यांनी जवळपास २० वर्षांचा परिश्रम खर्चून, मीमांसा शास्त्रावरील विस्तृत ‘मीमांसा कोश’ सिद्ध केला. सात खंडांच्या, सुमारे पाच हजार पृष्ठांच्या या ग्रंथकार्यामुळे, प्राज्ञपाठशाळेला राष्ट्रीय पातळीवर लौकिक प्राप्त झाला. यातील काही ग्रंथांचे प्रकाशन देशाच्या तत्कालीन सर्वोच्च मान्यवरांच्या हस्ते होणे, ही संस्थेच्या विद्वत्तेला मिळालेली मोठीच दाद.
 
१९५७ पासून प्राज्ञपाठशाळा मंडळ ‘नवभारत’ नावाचे मासिक चालवत आहे. विवेक, विज्ञान, धर्मश्रद्धा, सामाजिक प्रथा आणि कला यांसारख्या विषयांवर विचारप्रवर्तक लेख सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे या मासिकाचे ध्येय असून, त्यातील दिवाळी विशेषांकांना वेळोवेळी राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला आहे.
 
स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानाचा संस्कृत भाषेतील अधिकृत अनुवाद करण्याची जबाबदारीही, या मंडळावर सोपविण्यात आली होती. अतिशय अल्प कालावधीत हा अनुवाद सिद्ध करून, वाई येथेच त्याचे प्रकाशनही झाले, हीच या संस्थेविषयी निर्माण झालेल्या प्रचंड विश्वासाची साक्ष आहे. पुढे सोमनाथ मंदिराच्या पुनःप्रतिष्ठा विधीचे निर्धारण करण्याची जबाबदारीही, मंडळाने कुशलतेने सांभाळली.
 
महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत ‘वेदांमध्ये अस्पृश्यतेला कोणताही आधार नाही,’ हा अभ्यासपूर्ण निष्कर्ष मांडणार्‍या अग्रगण्य विद्वानांत स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अग्रक्रम होता. धर्मनिरूपण, सामाजिक विचार आणि सुधारणा यांसंबंधी विवेकपूर्ण दिशादर्शन देण्याचे कार्य, या मंडळाने सातत्याने चालवले आहे.
या संस्थेशी संबंधित नामवंत व्यक्तींमध्ये महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे, आचार्य विनोबा भावे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. या तिघांना मिळालेले ‘सर्वोच्च नागरी’ सन्मान हा संस्थेच्या लौकिकाचा देदीप्यमान पुरावा आहे. देशातील अनेक मान्यवरांनी वाई येथे येऊन या कार्याचा साक्षात अनुभव घेतला असून, हा सांस्कृतिक वारसा आजही जिवंत असल्याचेच ते द्योतक आहे.
 
तर्कतीर्थांच्यापश्चात प्रा. मेघश्याम रेगे यांनी संस्थेचे नवे बौद्धिक नेतृत्व स्वीकारले. पुढे डॉ. सरोजा भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीपर्यंत, चिंतनप्रधान वाङ्मय पोहोचवण्याची धडपड सुरू झाली. वैदिक संस्कृती, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजविचार आणि धर्मसमीक्षा यांवरील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ आज रसिकांच्या ग्रंथालयात अभिमानाने स्थान मिळवून आहेत.
 
संस्कृत आणि गंभीर अभ्यासपर लेखनाचे वाचक कमी होत चालले असले तरी, प्राज्ञपाठशाळा मंडळ प्रामाणिक विचार, तर्कशीलता आणि संस्कृतीचा सन्मान यांचा संतुलित संगम जपत आहे. ’धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा’ या ब्रीदातून व्यक्त झालेल्या सर्व मानवजातीच्या कल्याणधर्माची ही प्रत्यक्ष साधनाच आहे.
 
- प्रणव गोखले 
 
 
 
Powered By Sangraha 9.0