‘कोकणाई’तील वाटाडे

27 Nov 2025 10:17:45
 
Omkar Gaonkar 
 
मुंबई ते कोकण, असा चक्क उलटा प्रवास करून, आपल्या मुळाशी परतून पर्यटनाच्या अनुषंगाने ‘कोकणाई’ची वाट निर्माण करणार्‍या ओमकार सदाशिव गांवकर याच्याविषयी...
 
ओमकारचा जन्म २२ ऑटोबर १९९८ रोजी मुंबईतील बोरिवलीत झाला. त्याने आपले शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत पूर्ण केले. गांवकर कुटुंब मुंबईत रमलेले असले, तरी त्यांचा जीव आपल्या मूळ गावी कोकणातील कुडाळमधील कुसबे या गावी गुंतलेला. वडील सदाशिव गांवकर मुंबईत रमलेले असले, तरी शेतीची त्यांना आवड. म्हणून हे कुटुंब वर्षातून दोन-तीन वेळ कुसब्यात येई. ओमकारला लहानपणापासून निसर्गाची तशी जुजबी आवड होती. मात्र, लहानपणी गावी गेल्यावर मोठी मंडळी या लहानग्यांना जंगलात एकटी जाऊ देत नव्हती. त्यामुळे या आवडीला एकप्रकारचे वेसण लागले. मात्र, ‘कोविड’च्या ‘लॉकडाऊन’मध्ये हे वेसण सैल झाले. ‘लॉकडाऊन’च्या काळात ओमकार आणि त्याची लहान बहीण प्रज्ञा हे गावी आले होते. या काळात त्यांनी आपल्या मालकीचे खासगी जंगल आणि गावाच्या आसपास असणारे जंगल पिंजून काढले. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या मनी दडलेली निसर्गभ्रंमतीची सुप्त इच्छा पूर्ण झाली. महत्त्वाचे म्हणजे, यातूनच ओमकार आणि त्याचा बहिणीला गावातल्या मातीची वाट गवसली. निसर्गाची आवड निर्माण झाली. या सगळ्याची परिणीती म्हणजे या दोघा भावंडांनी यापुढे गावीच राहून आपले आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
 
कुसब्यात गांवकर कुटुंबाचे ६६ वर्षे जुने मातीचे घर. कुटुंबाची शेतीवाडी भरपूर. त्यामुळे ओमकार आणि प्रज्ञा यांनी गावात राहण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्यासमोर शेती आणि त्यातून होणारे पर्यटन हाच एकमेव पर्याय होता. मे, २०२२ मध्ये ते मुंबईत आईवडिलांना सोडून आपल्या कुसब्यातील घरी स्थायिक झाले. स्थायिक झाल्यावर ओमकारने सर्वप्रथम मालकीच्या जमिनीचा अंदाज घेतला. ओमकार आणि प्रज्ञा यांनी अगदी नियोजितरित्या ‘कृषी पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित कामाला सुरुवात केली. मालकीच्या पडीक जमिनींचा अंदाज आल्यावर दूरदृष्टी ठेवून आणि भविष्याचा विचार करून त्यांनी या जमिनीवर सर्वप्रथम लागवड करण्यास सुरुवात केली. याच काळात महाराष्ट्र पर्यटन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी टूर गाईडच्या कोर्सचे आयोजन केले होते. या संधीचा फायदा घेऊन ओमकार आणि प्रज्ञा दोघांनी या कोर्समध्ये सहभाग नोंदवला. यापूर्वी हे दोघेही सिंधुदुर्गात आपापल्यापरिने फिरत होते. मात्र, या कोर्सच्या निमित्ताने त्यांना सिंधुदुर्गामधील पर्यटनाच्या संधी, जिल्ह्यातील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक स्थळांचे महत्त्व, भविष्यातील संधी याचा अंदाज मिळाला. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर ते ’एमटीडीसी’चे सिंधुदुर्गातील अधिकृत ‘टूर गाईड’ म्हणून काम करू लागले.
 
दरम्यानच्या काळात ओमकारने लागवडीच्या अनुषंगाने बांबूबद्दलदेखील माहिती मिळवली होती. त्याआधारे त्यांनी आपल्या पडीक शेतजमिनीत गेल्या तीन वर्षांत एक हजार बांबूंच्या बेटांची लागवड केली. भविष्याचा विचार करून त्यामधून मिळणारे उत्पन्न पाहता, तातडीने पर्यटनाच्या अनुषंगाने काहीतरी करणे आवश्यक होते. त्यातून विचार आला, ‘कोकणाई’चा, शेतीवर आधारित पर्यटनाचा. ओमकार आणि प्रज्ञा यांच्या वडिलांनी गावातील मातीच्या जुन्या घराशेजारीच बंगला आणि त्याच्या आसपास जागा असणारी एक मालमत्ता खरेदी करून ठेवली होती. या मालमत्तेमधीलच बंगल्याला पर्यटकांच्या दृष्टीने राहण्याजोगे करून त्याठिकाणी ‘अ‍ॅग्रो-टूरिझम’ सुरू करण्याचा निर्धार या दोघांनी केला. कामाला सुरुवात झाली अन् ’कोकणाई’चा प्रवास सुरू झाला. याखेरीच त्यांनी घरातच निर्माण केल्या जाणार्‍या गोष्टींचे ब्रॅण्डिंग करून ते विकण्याचादेखील निर्णय घेतला. घरात लाकडी घाण्यावर तयार केले जाणारे खोबरेल तेल असो, हळद असो वा हंगामी पन्हे असो, याचे ’कोकणाई’ नावाने ब्रॅण्डिंग करून ओमकार आणि प्रज्ञा यांनी ते विकण्यास सुरुवात केली.
 
’कोकणाई’त स्थिरावले; पण आल्यानंतर त्यांनी ‘अ‍ॅग्रो-टूरिझम’बरोबर ‘वाईल्डलाईफ टूरिझम’च्या अनुषंगानेदेखील विचार केला. त्यासाठी सिंधुदुर्गात वाईल्डलाईफ टूरिझम करणारे व्यक्ती आणि होम-स्टे यांना भेटी दिल्या. ’वानोशी’चे प्रवीण देसाई यांची त्यांना मदत झाली. पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर, गजानन शेटये यांच्यासोबत पक्षीनिरीक्षणाचे दौरे करून पक्ष्यांविषयी माहिती जाणून घेतली. त्यातूनच पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण झाली. ’कोकणाई’च्या आसपासचे जंगल फिरून तिथे दिसणारे पक्षी टिपले. पारपोली गावात आयोजित केल्या जाणार्‍या ‘फुलपाखरू महोत्सवा’त सहभाग घेऊन फुलपाखरांची माहिती अवगत करून घेतली. आता ही दोघं भावंडं ’कोकणाई’त ‘अ‍ॅग्रो-टूरिझम’बरोबर ‘वाईल्डलाईफ टूरिझम’देखील करतात. तसेच सिंधुदुर्गातील मंदिरे फिरवून तिथल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहितीची देवाणघेवाण करतात. या दोन्ही भावडांना येत्या काळात वृक्षारोपण, बागायत, लागवड याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. आजमितीस कोकणाला ओमकार आणि प्रज्ञासारख्या कोकणातील मातीत राहून उत्तन्न मिळवणार्‍या आणि रोजगार निर्माण करणार्‍या तरुणांची गरज आहे. या दोघांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0