वरळीतील दुबार मुस्लीम मतदारांच्या जोरावर आदित्य ठाकरे विजयी झालेत का?

27 Nov 2025 14:00:55


मुंबई, दि. २७ : आदित्य ठाकरे दुबार मतदारांवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतात, परंतू, वरळीतील याच मुस्लीम दुबार मतदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात का? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत वरळीतील मुस्लीम दुबार मतदारांची यादीही वाचून दाखवली.

नवनाथ बन म्हणाले की, "कालपासून उबाठा गटाच्या वतीने आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून दुबार मतदार या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. किशोरी पेडणेकर यांचेसुद्धा दुबार मतदारांमध्ये नाव असल्याने त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. उबाठा गट सातत्याने जाणीवपूर्वक ठरावीक दुबार मतदारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उबाठा गटाच्या वतीने किशोरी पेडणेकर आणि इतर नेते फक्त हिंदू दुबार मतदारांवरच आक्षेप घेत आहेत. मात्र, वरळीतील अल्पसंख्यांक दुबार मतदारांची यादी माझ्याकडे असून त्यात शेकडो मुस्लीम दुबार मतदार आहेत. परंतू, उबाठ गट याबद्दल चकार शब्दही बोलायला तयार नाही. या यादीतील एका एका मतदाराचे नाव दोन ते तीन ठिकाणी आहे. उबाठा गटाच्या वरळीतील एका जेष्ठ नेत्याने ही यादी मला दिली आहे. त्यांनी किशोरीताईंना ही यादी दाखवण्याची विनंतीही केली. पण मुस्लीम मतदार दुरावण्याच्या भीतीने त्यांच्यात ही यादी दाखवण्याची हिंमत नाही."

वरळीत दीड ते २ हजार मुस्लीम दुबार नावे

"या यादीमध्ये जवळपास २५० ते ३०० मुस्लीम दुबार मतदारांची नावे आहेत. बुथ क्रमांक ६२, १४८, १३३, ६६, ७५, १९५, २७, ७६, २००, १५६, ८२, १२८, १५६, ६२ अशा अनेक बुथमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम दुबार मतदार आहेत. यामध्ये आणखी शोध घेतल्यास जवळपास दीड ते २ हजार मुस्लीमांची दुबार नावे वरळी मतदारसंघात आढळून आली आहेत. परंतू, उबाठा गटाचे नेते त्यावर बोलायला तयार नाहीत. ते जाणीवपूर्वक हिंदू दुबार मतदारांच्या नावावर शंका घेतात. मुस्लीम मतदारांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उबाठा गटाचा हा डाव दिसतो. किशोरीताईंकडे ही यादी असतानाही त्या यावर काल बोलल्या नाहीत," असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा

"आदित्य ठाकरे दुबार मतदारांवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतात, परंतू, वरळीतील याच मुस्लीम दुबार मतदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात का? तुम्हाला मुस्लीम दुबार मतदारांनी मतदान केल्याने जिंकलात का? वरळीसह मुंबईतील अनेक भागात मुस्लीम दुबार नावे आढळत आहेत. ही नावे तातडीने कमी करण्याचे काम निवडणूक आयोगाने केले पाहिजे. फक्त हिंदू दुबार मतदारांवर आक्षेप घेऊन हिरव्या मतांवर जिंकण्यासाठी उबाठा गटाचा हा डाव आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात २० ते २२ हजार दुबार मतदार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तर मग ते या दुबार मतांच्या जोरावरच निवडून आलेत का? आदित्य ठाकरे यांनी वरळीत आपला राजीनामा द्यावा आणि मग दुबार मतदारांवर शंका उपस्थित करावी. दुबार मतदारांमुळेच आदित्य ठाकरे वरळीत निवडून आले आणि संदीप देशपांडे यांचा पराभव झाला. त्यामुळे मनसेनेदेखील यामध्ये लक्ष दिले पाहिजे. हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जावे," असे आव्हानही नवनाथ बन यांनी दिले आहे.

किशोरीताईंचे नाव कसे आले?

किशोरी पेडणेकर यांचे नाव दुबार मतदार यादीत कसे आले? त्यांनी नोंदणी केल्यानेच त्यांचे दोनदा नाव आले असावे. परंतू, आता त्या विनाकारण निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. त्यांच्याकडे मुस्लीम नावे असतानाही त्यांनी ती नावे घेणे टाळले," असेही ते म्हणाले.

भाजप पैशांच्या जोरावर निवडणूक लढत नाही

"मालवणमधील त्या कार्यकर्त्यांचे पैसे बांधकाम व्यवसायाचे होते. निलेश राणे यांना अशी धाड टाकण्याचा अधिकार नाही. कुठल्याही यंत्रणेमार्फत धाड टाकली जाऊ शकते. परंतू, एखाद्याच्या घरात अनधिकृतपणे घुसखोरी करणे चुकीचे आहे. अधिकृतपणे पोलिसांत तक्रार न करता कार्यकर्त्याच्या घरात धाड टाकणे चुकीचे आहे. भाजप पैशांच्या जोरावर निवडणूक लढत नाही. निलेश राणे निवडून आले तेव्हा त्यांनीदेखील पैसे वाटप केले होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. भाजपविरोधात अशी भूमिका घेणे योग्य नाही हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे," असेही नवनाथ बन म्हणाले.



Powered By Sangraha 9.0