
"आपला ध्वज तिरंगा. मग, पंतप्रधानांनी भगव्या ध्वजाचेरोहण का केले? पंतप्रधानपदी असताना त्यांनी ते का केले,”असाही अज्ञानातून राजा यांचा प्रश्न आहे. डी. राजांच्या मते, देशाच्या संविधानाने दिलेले धार्मिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य पंतप्रधानांना नाही का? पंतप्रधान जन्माने आणि आता त्यांच्या पूर्ण विचाराअंती कृतीतूनही हिंदूच आहेत. त्यांनी मंदिरावर ध्वजारोहण केले म्हणजे काय पाप आहे का? नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती पंतप्रधानपदी आरूढ झाली म्हणून त्यांनी काय त्यांचा धर्म, त्या धर्माची श्रद्धाशीलता त्याग करायची का? त्यांना धर्म आणि श्रद्धा जपण्याचा अधिकार नाही का? दुसरीकडे राम मंदिर हे हिंदू आस्थेचे हिंदूंचे मंदिर आहे. तिथे हिंदू धर्मसंस्कृतीचा ध्वज नाही लागणार, तर मग कोणता ध्वज लागणार? सध्या सरकारतर्फे नक्षल्यांवर यशस्वी कारवाई होत आहे, अशावेळी सरकारने नक्षलींशी संवाद साधावा, असे म्हणत नक्षल्यांचा पुळका येणार्या डी. राजासारख्या माणसाकडून या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा नाही. या देशात धर्मासाठी प्राण त्यागणार्यांचा इतिहास आहे. तो इतिहास राजासारख्या कम्युनिस्टांना कधीच समजणार नाही. मात्र, त्यांना न समजणार्या त्या इतिहासाच्या पटलावरच पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेने आणि त्यावरच्या ध्वजारोहणाने हिंदू तेजाच्या जाज्वल्यतेचा नवा अध्याय लिहिला आहे.
आदुराजांचा वैश्विक प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश कसा जगात ‘विश्वगुरू’ बनेल, हा प्रश्न पडतो. त्यानुसार, ते काम करतात. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र कसा आणखीन प्रगतिपथावर जाईल, असे वाटते आणि त्यासाठी ते काम करतात; पण अर्थातच कोणाला कसली चिंता वाटेल, कसला प्रश्न पडेल याबाबत आपण काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या आदुराजांनाही काय प्रश्न पडेल, याबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ नाही नाही; पण ते मराठीतूनच बोलणार. त्यामुळे त्यांना वैश्विक संकट दर्शवणारा प्रश्न पडला आहे - क्रिकेटचा टी-२० चा अंतिम सामना अहमदाबादला ते का करतात? अहमदाबादच का? देशात इतरही स्टेडियम आहेत ना? मग, अहमदाबादच का? असा गहन प्रश्न त्यांना पडला. अर्थात, ते युवराज आहेत. त्यांची सत्ता कुठे आहे हे विचारायचे नाही; पण ते थोर नेते असल्याने त्यांना हा प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न म्हणजे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्या प्रश्नावरून, म्हणजे सफरचंद झाडावरून खाली का पडते? या प्रश्नावरून लावला. त्या प्रश्नाइतकाच मॅच अहमदाबादलाच का? हा प्रश्नही महत्त्वाचा नव्हे, त्या प्रश्नाइतकाच तोलामोलाचा आहे.
या प्रश्नामध्ये त्यांची उत्सुकता, जिज्ञासा सगळेसगळे प्रकर्षाने दिसते; पण जळणार्यांची काय कमी आहे? त्यांच्या हुशारीवर, त्यांच्या जिज्ञासूवृत्तीवर जळणारे त्यांच्या या प्रश्नाला कमीच लेखतील, तर अहमदाबादला टी-२० मॅचचा अंतिम सामना होणे, यामध्ये काहीतरी भयंकर कारण आहे, असे त्यांना वाटते. हा सामना मुंबईत व्हावा, देशभरात कुठेही व्हावा; पण अहमदाबादला नको, असे त्यांचे ठाम आग्रही म्हणणे आहे. काय म्हणावे? कदाचित, त्यांच्या ज्ञानकक्षेत अहमदाबाद म्हणजे कुठच्या तरी परग्रहावरचे ठिकाण तर नाही ना? काय सांगावे, त्यांना तसे वाटतही असावे. ‘नटसम्राट’ जसे वेदनेने प्रश्न विचारत होते की, ‘कुणी घर देता का घर?’ (क्षमा करा नटसम्राट), तसाच यांच्या मनात प्रश्न ठसठसतोय.
जळके तुटके टोमणे मारीत, नुसती रडरड करत आहे,
खरं सांगतो बाबांनो, आम्हाला आमचे टोमणेच नडतायत रे,
टी-२०चा अंतिम सामना मुंबईमध्ये करता का रे?