मुंबई : ( Ram Mandir ) राम मंदिर परिसरात कारसेवकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक सुंदर स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा ‘विश्व हिंदू परिषदे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी नुकतीच केली. त्यांनी म्हटले की, "५०० वर्षांच्या संघर्षानंतर मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. हे कारसेवकांनी दिलेल्या बलिदानाचे यश आहे. येत्या तीन महिन्यांत राम मंदिराच्या परिसरात त्यांच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभे राहणार आहे.”
स्वदेशाशी अनुरूप असलेला ‘स्व’ पुनर्प्राप्त करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या आणि ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ६१ वर्षांच्या प्रवासाला आता एक मोठी भरारी मिळायला हवी. वकील, डॉटर, अभियंते, चार्टर्ड अकाऊंटंट यांचे काम इंग्रजी सिद्धांतांवर चालते. स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहा. जे स्वदेशाशी अनुरूप आहे, जे या भूमीशी समरस आहे, त्या ‘स्व’चा बोध आपण पुन्हा प्राप्त केला पाहिजे. हिंदूंनी ‘हिंदू’ म्हणून जगणे, समाज आणि कुटुंबासोबत त्या मूळ मूल्यांना धारण करणे, जगाला आनंद आणि सुखाचा मार्ग दाखवणे, हा आमचा संकल्प आहे.”
कार्यशाळेतील काम कधी थांबू दिले नाही
अशोक सिंघल यांची आठवण करताना आलोक कुमार यांनी सांगितले की, "लोकांच्या मनात मंदिर मिळणार की नाही, असा संशय होता, त्या काळात अशोक सिंघल यांनी मोठी रक्कम खर्च करून भूमी विकत घेतली. कुसुमपूरच्या टेकडीवरून दगड आणले. त्यांचे शिल्पकाम सुरू केले. कार्यशाळेतील काम थांबले नाही.”