॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ५॥

27 Nov 2025 10:52:22

 
 Devi

 

त्वदन्यः पाणिभ्याम अभयवरदौ दैवतगणः

त्वमेका नैवासि प्रकटित-वरभीत्यभिनया|

भयात् त्रातुं दातुं फलमपिवांछासमधिकं

शरण्ये लोकानां तव हि चरणावेव निपुणौ॥४॥

शब्दार्थ - हे जगन्माते, समस्त देवगणांच्या चरणी त्यांचे भक्त वंदन करत असतात आणि हेच देवगण, आपल्या भक्तांना वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करून आशीर्वादही देत असतात. परंतु, तुला असा अभिनय करण्याची गरजच नाही. तुझ्या दोन हातांत पाश आणि अंकुश आहेत आणि तुझ्या समोरच्या दोन हातांमध्ये पौंड्र जातीचा ऊस आणि पुष्पबाण आहेत. तसेच, तुझ्या भक्तांवर कृपावर्षाव करण्यासाठी तुझे चरण अत्यंत निपुण आहेत. तुझ्या चरणांना स्पर्श करून, तुझ्या समस्त भक्तांच्या मनोवांच्छित कामना पूर्ण होतात.

भावार्थ - श्री ललिता देवी ही सगुण ब्रह्म आहे. परम शिवतत्त्व हे निर्गुण ब्रह्म आहे. या दोघांच्या मिलनातूनच संपूर्ण जगत आकाराला आले आहे. यात प्रथम प्रकट झालेले शब्दब्रह्म ॐकार उत्पत्ति, स्थिती आणि लय, या तिन्ही ब्रह्मतत्त्वांचे स्वामी ब्रह्मदेव, विष्णु आणि रुद्र अर्थात शंकर हे परम ब्रह्माचेच अंश आहेत. त्यांच्या पत्नी अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यासुद्धा याच ब्रह्माचे अंश आहेत. हे समस्त देव भगवतीच्या कृपेनेच, जगतातील प्रत्येक कार्य योग्य पद्धतीने पूर्णत्वाला नेत आहेत.

शब्दब्रह्म ॐकार गणेश संपूर्ण शब्दसृष्टीची उत्पत्ती, भगवतीचे लाडके बालक म्हणूनच घडवतो आणि या शब्दसृष्टीला सामर्थ्य प्रदान करण्याचे कार्य, भगवती वाकबिजाच्या माध्यमातून घडवते.

श्लोक क्रमांक २ मध्ये हा उल्लेख आहे की, भगवतीच्या चरणांचे रज अर्थात धूळ आपल्या मस्तकी धारण करून, ब्रह्मदेव कोटी ब्रह्मांडांची उत्पत्ती घडवतात आणि त्यांना सुचालित ठेवतात. विष्णु/आदिशेष आपल्या मस्तकी देवीच्या चरण रजाचा एक कण कसाबसा धारण करून, जगताचे पालन करतो आणि शिव प्रलयाच्या क्षणी देवीच्याच चरण रजाला आपल्या देहाला भस्म म्हणून विलेपन करत, जगताचा विनाश करतो.

संपूर्ण जगताचा व्यवहारच देवीच्या कृपेने सुरू असल्यामुळे, एका सामान्य भक्ताच्या प्रापंचिक कामनांची पूर्तता करण्यासाठी ती त्याच्याकडून स्तुतीची, उपासनेची अपेक्षा बाळगत नाही, ना त्याच्यावर प्रसन्न होऊन ती कराभिनय करून अभय प्रदान करणे किंवा वरदान देण्याचा उपचार करत नाही. तिच्या चरणांमध्ये ते सामर्थ्य आहे की, भक्ताने परम श्रद्धेने तिच्या चरणी लीन होण्याचा मात्र अवकाश, तिचा कृपावर्षाव त्याच्या सर्व कामनांची पूर्तता घडवतो.

या श्लोकात भगवतीच्या उपासनेसाठी ज्या बाला मंत्राकडे निर्देश केला आहे, तो मंत्र म्हणजे ‘ऐं लीं सौः’ आहे. या मंत्रामुळे समस्त भक्तांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. याचा अर्थ जाणून घेऊया.

शास्त्रात भगवतीला प्रसन्न करण्यासाठी अग्नी प्रज्वलित करून, हवन करणे इष्ट मानले गेले आहे. अग्नी प्रकाश निर्माण करतो आणि प्रकाश अंधकार दूर करतो. भयाची उत्पत्ती ही स्थूल पातळीवर अंधारातून आणि सूक्ष्म पातळीवर जिवाच्या अज्ञानातूनच होत असते. यज्ञात प्रज्वलित केलेला अग्नी हा स्थूल आणि सूक्ष्म पातळीवरील अंधकार दूर करत, साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म भयाचा विनाश करतो.

श्री ललिता देवीने संपूर्ण जगताला आकाराला आणले आहे. परंतु, या जगताचा मोह पडलेला सामान्य मानव आपल्या अस्तित्वाचा शेवट घडवणार्‍या मृत्यूला घाबरतो, भयभीत होतो. वास्तवात आत्म्याचे अविनाशी असणे त्याला ज्ञात असले, तरीही जगताच्या मोहाने ग्रस्त असलेल्या त्याचे आत्मतत्त्व मायापटलानेच झाकलेले आहे. तो आपल्या दैहिक अस्तित्वालाच प्रमाण समजतो आणि मग, आपल्या या अस्तित्वाच्या विनाशाच्या कल्पनेने त्याला भय वाटते. या भयापासून परिहार व्हावा, म्हणून तो ईश्वरी शक्तींना शरण जातो आणि अभयाची याचनाही करतो.

त्याचप्रमाणे प्रपंचात बद्ध असणारा सामान्य जीव हा, संसारातील त्रितापांनी त्रस्त झालेला असतो. हे तीन ताप अनुक्रमे आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक आहेत. आधिदैविक ताप म्हणजे अतींद्रिय शक्ती, आधिभौतिक ताप म्हणजे पंच तन्मात्रा, आध्यात्मिक ताप म्हणजे अन्तःकरण चतुष्टय, पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये. या तापांचे शमन करून, आत्मोन्नतीसाठी साधकाला प्रेरित करण्याचे कार्य श्री ललिता देवी करते. या तापांचे शमन होऊन, क्षुब्ध जीव शांतता आणि समृद्धीसाठी ईश्वरी शक्तींना शरण जातो आणि त्यांना वरदान मागतो.

आधिदैविक ताप हा पूर्वकर्मांशी निगडित असतो. पूर्वजन्मातील कर्मांचे चांगले किंवा वाईट फळ, जीवात्मा या जन्मी भोगतो. हा ताप आधिदैविक स्वरूपाचा आहे. यापासून निर्माण होणार्‍या क्षोभाचे शमन होण्यासाठी, कर्मफळ भोगणे आणि उपासना मार्गाचा अवलंब आवश्यक आहे. आध्यात्मिक ताप हा बुद्धिजन्य असतो. अर्थात, अन्तःकरण चतुष्टय हे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांशी संलग्न असते. मानव ज्या ज्या अनुभूती घेतो, त्याचे बुद्धीद्वारा विश्लेषण आणि त्यातून निर्माण होणारा क्षोभ म्हणजेच आध्यात्मिक ताप होय. जीवात्मा या जन्मात पंचमहाभूते आणि पंचतन्मात्रांमार्फत ज्या अनुभूती घेतो आणि त्यातून जो क्षोभ निर्माण होतो, तो म्हणजे आधिभौतिक ताप.

आधिदैविक ताप हा पूर्व सुकृताशी निगडित आहे, याचे मिळणारे फळ ही जीवात्म्याच्या क्षमतेबाहेरील गोष्ट आहे. जसे, एखादी व्यक्ती राजाच्या घरी जन्माला येईल आणि एखादी अत्यंत गरीब व्यक्तीच्या घरी. एखादी व्यक्ती सुदृढ असेल आणि एखादी व्यंग घेऊन जन्माला येईल. याच आधिदैविक तापाच्या अग्नीत जीवात्मा जळत राहील परंतु, त्याला स्वतःला यावर नियंत्रण मिळवणे शय होत नाही.

आध्यात्मिक ताप हा या जीवनात जीवात्मा घेत असलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभवांशी निगडित असतो. जीवात्मा देहाद्वारे हे अनुभव घेतो आणि त्याची अनुभूती आणि विश्लेषण करण्याचे कार्य बुद्धी करते. या चांगल्या वाईट अनुभवांच्या अग्नीत, जीवात्मा संपूर्ण जीवन जगतो आणि सामान्यतः त्याची यातून सुटका होणे शय नसते, कारण हे अनुभव तो नित्यच घेत असतो.

आधिभौतिक ताप हा जीवात्म्याच्या या जन्मातील अनुभवांच्या, भौतिक अनुभूतीशी निगडित असतो. या अनुभूतींमधील सुख आणि दुःख यांच्याशी संलग्न होऊन जीवात्मा देहभावात बद्ध राहतो. या तिन्ही तापरुपी अग्नींमध्ये जीवात्मा संपूर्ण आयुष्य जळत असतो. या तापाचे शमन करून, याला मनोवांच्छित फळे प्रदान करण्याचे कार्य केवळ ललिता देवीच करते.

अन्य देवांच्या चरणी भक्त विलीन होतो, ते देव त्याला अभयमुद्रा आणि वरमुद्रा धारण करून आश्वस्त करतात. त्यांच्या आशीर्वादाने त्याच्या समस्त कष्टांचा परिहार होतो, हे जरी सत्य असले, तरी हे कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा, चेतना ही त्यांना श्री ललिता देवी अर्थात सगुण ब्रह्माकडूनच प्राप्त होत असते. अर्थात, या भक्तांवर होणारी कृपा ही श्री ललिता देवीचीच असते. श्री ललिता देवीच्या कृपा बळावर देवगण आपल्या भक्तांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू शकतात. या समस्त देवगणांना ही जाणीव असते की, जरी आपण अभय आणि वरमुद्रा धारण करून आपल्या भक्तांना आश्वस्त करत असलो, तरी आपण स्वतः हे सामर्थ्य श्री ललिता देवीच्या कृपेनेच प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांनी धारण केलेल्या मुद्रा हा निव्वळ अभिनय असून, त्यामागील सामर्थ्य आणि चेतना श्री ललिता देवीच आहे.

देवगण साधकाला लौकिक सुख प्राप्त करून देतात. परंतु जर तोच साधक ललिता देवीच्या चरणी लीन झाला, तर ती त्याला भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करण्यासाठी, प्रथमतः त्याला देहभावातून बाहेर काढून आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करते. आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावरील साधक तिच्या चरणी नतमस्तक होऊन, आनंदाच्या आणि सुखाच्या सागरात अनंतकाळापर्यंत रममाण राहतो.

 - सुजीत भोगले
 
Powered By Sangraha 9.0