सिंध आणि भारत : एक दृष्टिकोन असाही...

27 Nov 2025 10:11:46
 
Rajnath Singh
 
सिंध किंवा पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्याच्या विचाराने भारतीय सुखावतात. पाकिस्तानच्या भूमीवर कब्जा केल्याशिवाय त्या देशाच्या लष्कराची रग जिरणार नाही, हेही तितकेच खरे; पण दरिद्री आणि कट्टर धार्मिक मुस्लीम लोकसंख्या असलेले प्रदेश ताब्यात घेऊन भारताला कसला लाभ मिळणार आहे? आपला सुखाचा जीव दु:खात घालण्यापेक्षा, त्याचे आर्थिक नुकसान करून पाकिस्तानला जेरीस आणणे, हाच खरा यावरील उपाय!
 
यंदा मे महिन्यात भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून, त्या देशाची हवाईसंरक्षण सिद्धता नष्ट करून टाकली. तसेच, रावळपिंडीसारख्या लष्करी मुख्यालयाच्या शहरातील नूर खान विमानतळावर हल्ला करून तो निकामी केला आणि सरगोधाजवळील किराना टेकड्यांवर हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराने या टेकड्यांमध्ये बोगदे खोदून तेथे अमेरिकेची अण्वस्त्रे दडवून ठेवलेली होती. या हल्ल्यामुळे त्यापैकी काही नष्ट झाली असावीत. इतके सारे घडल्यावर पाकिस्तानी लष्करी नेतृत्व मनातून हादरले आणि त्यांनी युद्धबंदीची भीक मागितली. आपला हेतू साध्य झाल्यामुळे भारतानेही फार ताणून न धरता, युद्धबंदीला मंजुरी दिली. पाकिस्तानला दिलेला धडा पुरेसा आहे, अशी भारताची समजूत होती; पण घडले उलटेच.
 
काही दिवसांनंतर पाकिस्तानने आपली हार झाल्याचे मान्यच केले नाही. उलट, भारतालाच या लढाईत पराभव पत्करावा लागल्याचा उलटा प्रचार करण्यास प्रारंभ केला. इतकेच नव्हे, तर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याला या ‘गौरवास्पद’ कामगिरीबद्दल ‘फील्ड मार्शल’ हे सर्वोच्च लष्करीपदही बहाल करण्यात आले. युद्धबंदीच्या दिवशीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धबंदीचे श्रेय स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर उद्भवलेला वाद सर्वश्रुत आहे.
 
पाकिस्तानच्या या शुद्ध निर्लज्ज वर्तनावर काय करावे, असा प्रश्न भारताला पडला होता. अर्थात, पाकिस्तान म्हणते म्हणून या युद्धात त्याचा जय झाला, ही गोष्ट कोणीच मान्य करीत नाही. भारत तर नाहीच नाही; पण पाकिस्तानच्या या दाव्याने भारताला फारसा फरक पडत नव्हता. फक्त एकच गोष्ट की, आपल्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये यामुळे उद्विग्नतेची एक भावना निर्माण झाली आहे. इतका भीषण पराभव करूनही पाकिस्तान एका कोडग्या, द्वाड मुलासारखा ‘जितं मया’चा ढोल वाजवीत असल्याने लष्करी अधिकार्‍यांचे हात पुन्हा शिवशिवू लागले आहेत. अलीकडेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले की, "देशाच्या सीमा बदलत असतात. त्यामुळे कोणी सांगावे, एक दिवस पाकिस्तानचा सिंध हा प्रांत भारताचा हिस्साही बनेल. पाकव्याप्त काश्मीरही भारत एक दिवस परत मिळवेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे लष्करी वर्तुळात एकाच चर्चेला तोंड फुटले. भारत लवकरच ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा अंक राबविण्याचा विचार करीत असावा, अशीही चर्चा आहे. याचे कारण सध्या बांगलादेशातील घडामोडी पाहता आणि प. बंगालमधील ‘एसआयआर’च्या कारवाईमुळे बांगलादेश सीमेवर खूपच वर्दळ सुरू आहे. त्यातच ‘सिलिगुडी कॉरिडोर’चा उल्लेखही केला जात आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’चा हा दुसरा अंक बहुदा बांगलादेशी सीमेवर साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
भारताने गेल्या महिन्याच्या अखेरीस अरबी समुद्र आणि पश्चिमेकडील तीन सीमावर्ती राज्यांमध्ये ‘त्रिशूळ’ नावाने फार मोठा लष्करी युद्धसराव केला होता. सुमारे १५ दिवस चालणार्‍या या सरावात सशस्त्र दलाच्या तिन्ही सेना- लष्कर, नौदल आणि हवाई दल सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातही असाच एक लष्करी युद्धसराव केला जाणार होता. या भव्य युद्धसरावामुळे पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाच्या पोटात गोळा उठला. या सरावाच्या आडून भारत पाकिस्तानवर हल्ला चढवून काही भाग ताब्यात घेईल, अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. त्याच सुमारास ‘राजपूत रेजिमेंट’चे लेफ्टनंट जन. एम. के. कटियार यांनीही एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "जोपर्यंत पाकिस्तानचा काही भूभाग आपण ताब्यात घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी हे मान्यच करणार नाहीत की, त्यांचा भारताबरोबर लष्करी पराभव झाला आहे. पाकिस्तानच्या लष्कराची नांगी ठेचण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा काही भाग भारताने आपल्या ताब्यात घ्यावा,” असा एक मतप्रवाह भारतीय लष्करी नेतृत्वात आहे.
 
या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांचे सिंधबद्दलचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले. सिंध हा पाकिस्तानातील पूर्वीपासूनच हिंदुबहुल प्रांत होता. अर्थात, आता पाकिस्तानात कुठेच हिंदू फारसे शिल्लक राहिलेले नाहीत, हा भाग वेगळा; पण फाळणीनंतर बहुसंख्य हिंदू भारतात स्थलांतरित झाले, ज्यांना आपण ‘सिंधी’ म्हणून ओळखतो. सिंधी लोकांचे सिंध प्रांताशी आजही भावनिक नाते आहे. भारताच्या राष्ट्रगीतात सिंधचा उल्लेख असल्याने त्या प्रांताबद्दल भारतीयांनाही आत्मीयता वाटणे स्वाभाविक आणि प्राचीन भारतीय संस्कृती ही सिंधू नदीच्या काठीच वसली होती.
 
सिंध हा पाकिस्तानचा दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला प्रांत. पाकिस्तानचे एकमेव बंदर आणि देशाची आर्थिक राजधानी कराचीही याच सिंध प्रांतात. पाकिस्तानच्या जीडीपीत सिंधचा वाटा २० टक्के आहे. त्यामुळे सिंध हातचा गेल्यास पाकिस्तानला मोठा झटका बसेल, यात शंकाच नाही; पण वरील गुण सोडल्यास सिंधकडून भारताला काय मिळेल? सिंधमधील बहुतांशी लोकसंख्या ही निरक्षर किंवा अत्यल्प शिक्षित आहे. तिथे बेरोजगारीही प्रचंड. त्याहीपेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे, सिंधच्या लोकांमध्ये गेल्या काही दशकांपासून धार्मिक कट्टरता फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रांत भारताने ताब्यात घेतलाच तर त्याची फार मोठी किंमत भारताला चुकवावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकतर वाढीव आणि त्यातही धार्मिक कट्टरवादी मुस्लीम लोकसंख्येमुळे सरकारची डोकेदुखी कित्येक पटीने वाढेल. सिंधकडून ना पर्यटनाच्या स्वरूपात, ना उद्योगधंद्यांच्या स्वरूपात फारसा महसूल भारताला मिळेल. त्यामुळे या प्रांताचा कब्जा घेतल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडण्याची चिन्हे अधिक. तसेही सिंधमध्येही गेली कित्येक दशके स्वतंत्र ‘सिंधूदेश’ची मागणीही जोरात आहेच, ज्याला वारंवार पाकिस्तानी सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न केला जातो.
 
पाकव्याप्त काश्मीर किंवा सिंध यांसारखे प्रांत आपल्या ताब्यात घेण्याच्या कल्पनेने भारतीयांच्या मनाला गुदगुल्या होतात, हे खरे; पण हे म्हणजे ‘घी देखा, पर बडगा नहीं देखा’ असे आहे. हे प्रांत ताब्यात घेणे तितके अवघड नसले, तरी ते घेऊन पुढे काय करायचे, हा खरा प्रश्न आहे. सध्या भारतातीलच मुस्लीम लोकसंख्येमुळे देशात किती समस्या उद्भवत आहेत, ते स्पष्टच आहे. त्यात सिंधचे विकतचे दुखणे ठरु नये, इतकेच!
 
 - राहुल बोरगांवकर
 
 
Powered By Sangraha 9.0