Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावरील ध्वजारोहणानंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारतीय मुस्लिमांविषयी सतावतेय चिंता

26 Nov 2025 18:05:28

मुंबई : (Pakistan On Ram Mandir Dhwajarohan)
अयोध्येतील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी केलेल्या धर्मध्वजारोहणावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दावा केला की, हा कार्यक्रम भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लिमांवर वाढत्या दबावाचे आणि त्यांच्या ऐतिहासिक वारशाचे ‘व्यवस्थित पद्धतीने मिटवण्याचे’ प्रतीक आहे.

पाकिस्तानने म्हटले की, ज्या ठिकाणी पूर्वी बाबरी मशीद होती, त्याच जागी आता राम मंदिर उभारण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबरी मशीद अनेक शतकांचे इस्लामिक धार्मिक स्थळ होते, जे ६ डिसेंबर १९९२ रोजी जमावाने पाडले. पाकिस्तानचा आरोप आहे की, भारताच्या न्यायालयांनी या प्रकरणातील आरोपींना निर्दोष सोडले आणि त्या जागी मंदिर बांधण्याची परवानगी दिली, जे भारतातील अल्पसंख्याकांवरील भेदभावाचे स्पष्ट उदाहरण आहे.

पाकिस्तानने या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला की, भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवर विशेषतः मुस्लिमांवर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सर्वच स्तरांवर दबाव वाढला आहे. अनेक ऐतिहासिक मशिदी धोक्यात असल्याचा दावा करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय संस्थांना भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानचे म्हणणे आहे की, भारतातील वाढता इस्लामोफोबिया, द्वेषपूर्ण भाषणे, आणि मुस्लिमांवरील हल्ले आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने घ्यायला हवेत. संयुक्त राष्ट्रांनी भारतातील मशिदी आणि मुस्लिम धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

दरम्यान, भारतातील विश्लेषकांच्या मते पाकिस्तानची ही भूमिका दुटप्पीपणाची आहे. कारण पाकिस्तानमध्येच हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि अहमदिया समुदायांवरील अत्याचार, जबरदस्तीने धर्मांतरण आणि धार्मिक हिंसा या मोठ्या समस्या आहे. त्यामुळे पाकिस्तानची भारतावरील टीका ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा केवळ प्रयत्न असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.





Powered By Sangraha 9.0