मुक्तछंदातील ‘कविता’

26 Nov 2025 10:21:47

Kavita Vibhavari
 
प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहात, आयुष्य खर्‍या अर्थाने ‘मुक्तछंदा’सारखे मुक्त; पण आशयघन जगत कलाक्षेत्रात नावीन्याची भर घालणार्‍या कविता विभावरी यांच्याविषयी...
आयुष्य म्हटले की, ते एका सरळ रेषेतच असले पाहिजे, प्रत्येक गोष्ट ठरवल्याप्रमाणेच झाली पाहिजे, असा अनेकांचा अट्टाहास असतो. मात्र, कधीकधी या सरळ रेषेत आयुष्य जगण्याच्या नादात आपण अनेक संधी गमावून बसतो. त्यामुळे आयुष्याकडे सजगपणे पाहाणे गरजेचे असते. ज्यांनी-ज्यांनी असे सजगपणे आयुष्याकडे पाहिले, त्यांना आयुष्यात विविध क्षेत्रांतील अनेक संधींचा लाभ झाल्याचे आपण अनेकदा वाचले आहे.अशाच प्रतिभावान व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे कविता विभावरी!
 
कविता यांचा जन्म मुंबईतील गिरगावचा. आईवडील आणि दोन भाऊ, असे पाचजणांचे कविता यांचे कुटुंब. वडिलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर घराण्याचा पान गादीचा व्यवसाय समर्थपणे सांभाळला. त्यामुळे पुढे पानाची गादी आणि मागे कविता यांचे घर. त्या चाळसंस्कृतीमध्येच कविता यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच कविता यांची नाटकाशी गट्टी जमली. गिरगावमधील बालनाट्यांच्या माध्यमातून ’बालभवन’ या संस्थेशी कविता लहान वयातच जोडल्या गेल्या. कविता शाळेत असल्यापासूनच स्वानंदासाठी कविता, कथा लेखन करत. मात्र, त्यांची सृजनशीलता पाहून लिखाणाचा हात न थांबवण्याचा सल्ला त्यांना शाळा, महाविद्यालयातील अनेक शिक्षकांनी दिला होता. कविता यांचे पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण ‘जीवरसायनशास्त्र’ विषयात झाले. त्यानंतर कविता यांनी वडिलांच्या हाडे जोडण्यासाठी वैद्यकीय शाखेला लागणार्‍या उपकरणांची निर्मिती प्रक्रियेत हातभार लावला.
 
विवाहानंतरचा प्रारंभीचा कालखंड कविता यांनी जाणीवपूर्वकपणे संसाराला दिला. कविता यांनी या काळामध्ये पुढील पिढीच्या संगोपनाला महत्त्व दिले. मात्र, मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कलासाधनेला सुरुवात केली. ‘आकाशवाणी’मध्ये ‘रेडिओ जॉकी’पदासाठी मुलाखत दिली. आवाजाची देणगी निसर्गदत्त लाभल्याने, या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. आकाशवाणीवर नोकरी करत असतानाच, अनेक ठिकाणी सूत्रसंचालन, निवेदनासाठीही त्यांना आमंत्रण येऊ लागले. परिणामी, कविता यांचे वाचन वाढले. त्यानंतर कविता यांनी काही कारणास्तव आकाशवाणीमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतरही कविता यांना त्यांच्या आवाजावरून ओळखणारे असंख्य जण आजही भेटत असल्याचे कविता सांगतात.
 
कविता यांच्या आईचा एक हट्ट होता, तो म्हणजे कविता यांनी सत्यनारायणाची पूजा शिकली पाहिजे. त्याचे शिक्षण घेण्यासाठी कविता दादरच्या विठ्ठल मंदिरात गेल्या. मात्र, तो त्या उपक्रमाचा शेवटचा दिवस होता. त्याचवेळी कविता यांना कीर्तनकलेची माहिती आणि महती समजली. सर्वच कलांचा संगम या कीर्तनामध्ये असल्याचे कविता यांना जाणवल्याने त्यांनी कीर्तनविद्या शिकण्यास सुरुवात केली. पूर्ण समर्पण भावनेने कीर्तनविद्या शिकून त्यांनी ‘कीर्तनालंकार’ पदवीही संपादन केली. कविता यांच्या ‘२६/११’च्या हल्ल्यावरील स्वरचित कीर्तनाला मिळणारा प्रतिसाद उत्तम असून, या हल्ल्याचे बळी ठरलेल्या अनेक कुटुंबांसाठी कीर्तन करण्याचा योग आल्याचेही त्या सांगतात.
 
कविता यांचा प्रत्येक संधीला स्वीकारण्याचा प्रवास सुरू असतानाच, त्यांनी केंद्रे सरांकडे नाट्यकलेचेही प्रशिक्षण घेतले. त्यावेळी, "स्वत:चेही तू काही या क्षेत्रात योगदान दे,” अशी सूचना केंद्रे सरांनी कविता यांना केली होती. त्यामुळे ’विभाजन विभिषीका दिना’च्या निमित्ताने, कविता यांनी ‘घायाळ’ या कादंबरीवरून ’घायाळ’ हे नाटक बसवले. त्याचेही त्यांनी अनेक प्रयोग केले. नंतरच्या काळात ‘संस्कार भारती’साठी कविता यांनी ’पुण्यश्लोक लोकमाता’ हे नाटक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म-त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने लिहिले. हैदराबाद येथे झालेल्या ‘लोकमंथन’ या कार्यक्रमात या नाटक कलाकृतीसाठी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्याचा बहुमानही कविता यांना लाभला.
 
या नाटकानंतर कविता ‘संस्कार भारती’शी जोडल्या गेल्या त्या कायमच्याच. आज कविता ‘संस्कार भारती’च्या नाट्य विभागाच्या प्रांत कार्यकारिणीवर असून, नाटकामधून भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसावे, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. हाच विचार पुढील पिढीमध्ये नेण्यासाठी ‘नाट्यओसरी’ हा कार्यक्रम ‘संस्कार भारती’च्यावतीने राबविण्यात येतो. त्याची जबाबदारीही कविता यांच्यावरच आहे. कविता यांचा सध्या ‘सरदार पर्व’ नावाचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरचा अभिवाचनाचा कार्यक्रमही रंगभूमीवर असून, त्यालाही चाहत्यांचा मोठाच प्रतिसाद मिळत आहे. भारतीय संस्कृतीचा प्रसार नाटकांमध्ये करण्यासाठी आणि पुढील पिढीवर त्याचे संस्कार करण्यासाठी नाट्यसंस्काराचे गुरुकुल स्थापन करण्याचा कविता यांचा विचार आहे. प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहात, खर्‍या अर्थाने आयुष्य ‘मुक्तछंदा’सारखे जगणार्‍या कविता विभावरी यांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
 - कौस्तुभ वीरकर
Powered By Sangraha 9.0