इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल; तरुणांच्या विचारांनी राष्ट्रनिर्माणाची नवी दिशा

26 Nov 2025 10:44:42
 
Indian Constitution
 
भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या भक्कम भूमीवर तरुणांनी सजग नागरिक म्हणून उभे राहावे, संविधानिक मूल्यांचे ज्ञान आणि भान नव्या पिढीच्या मनात दृढ व्हावे, या उद्देशाने मुंबईत ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल’ पार पडणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विवेेकानंद इंगळे यांची आहे.‘बार्टी’ हार्ट फुलनेस, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘ग्यानी मीडिया’तर्फेे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी अतुल स्मृती उद्यान, बोरिवली (पश्चिम) येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाध्ये विचार, प्रेरणा आणि सामाजिक जागरूकतेचा संगम असलेले अनेक उपक्रम दिवसभर चालणार आहेत. जाणून घेऊया या फेस्टिव्हलबद्दल!
 
भारतीय लोकशाहीची पायाभरणी ज्यावर उभी आहे, ते आपल्या राष्ट्राचे संविधान. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेलेले आणि २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आलेले भारतीय राज्यघटनाग्रंथ आज ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे शाश्वत मूल्य जपत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला आकार देणारा हा दस्ताऐवज केवळ एक कायदेशीर ग्रंथ नाही; तर भारतीय समाजाची संस्कृती, संघर्ष आणि स्वप्नांचे जिवंत तत्त्वज्ञान आहे.
 
या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत तरुणांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, संवादाला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांचा सक्रिय सहभाग प्रवर्तित करण्यासाठी ’इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल ( ICF ) या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा मुंबईत करण्यात आली. या उपक्रमामागील संकल्पनाकार विवेकानंद इंगळे, मास मीडिया पदवीधर आणि सध्या मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अभ्यास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. आधुनिक तरुणांच्या मनात संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांविषयी समज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न या उपक्रमातून प्रथमच संघटित आणि सृजनशील रूपात समोर येत आहे.
 
भारतीय संविधानाच्या मूल्यांची ओळख तरुणांच्या मनात अधिक दृढ व्हावी आणि लोकशाहीविषयक जागरूकतेचा व्यापक संदेश समाजात पोहोचावा, या उद्देशाने मुंबईत ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल’चा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. माहितीपूर्ण प्रदर्शने, संवादसत्रे, प्रश्नमंच, मार्गदर्शनपर कार्यक्रम, तरुणांशी थेट चर्चा आणि सहभागावर आधारित उपक्रम अशा विविध अंगांनी हा महोत्सव समृद्ध करण्यात आला आहे. संविधानाचा विचार कृतीतून जगण्याची प्रेरणा देणारा आणि नव्या पिढीला राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने सजगपणे पुढे आणणारा हा उपक्रम लोकजागृतीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
 
उद्घाटन सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळात संविधानाचा आधार कसा अधिक महत्त्वाचा ठरतो, युवकांनी नागरिक म्हणून समाजात कोणती भूमिका निभावावी आणि राष्ट्रनिर्माणात मूल्याधिष्ठित विचारांची गरज का वाढत आहे, यावर त्यांचे चिंतन तरुणांना नवी दिशा देणारे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आजच्या आव्हानात्मक काळात संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून समाजाला जोडणारी मूल्यव्यवस्था आहे, हे ते आपल्या उद्बोधनातून सांगणार आहेत.
 
या कार्यक्रमाला आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, ‘गोखले शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. संत व समाजसेविका सुचित्रा देहेरकर-इंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरुणांच्या सर्वांगीण घडणीत शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व व नागरिकत्त्वाची जाण यांचे महत्त्व हे मान्यवर आपल्या भाषणातून उलगडून सांगणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सुरू होणारा हा सोहळा विद्यार्थ्यांना व युवकांना प्रत्यक्ष संवाद आणि मार्गदर्शन मिळण्याची अनमोल संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
 
या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे, भारतीय संविधानाचे सर्वांगीण दर्शन घडवणारी माहितीपूर्ण प्रदर्शने. संविधानाची निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, मूलभूत हक्क-कर्तव्ये आणि आजच्या सामाजिक जीवनात घटनेचे प्रत्यक्ष मार्गदर्शन या सर्वांचा सखोल परिचय यातून होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रे आणि माहितीफलकांमुळे तरुणांना संविधानाशी भावनिक नाते निर्माण करण्याची प्रेरणा मिळणार आहे.आज दिवसभर आयोजित संवादसत्रे आणि प्रात्यक्षिक आधारित कार्यक्रम युवकांना विचारप्रवर्तक मंच देणार आहेत. लोकशाहीतील सक्रिय सहभाग, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, जबाबदार नागरिकत्त्व यांसारख्या विषयांवर तरुणांमध्ये मोकळ्या चर्चांना वाव देण्यात आला आहे. प्रश्नमंच, गटचर्चा आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या संवादपर सत्रांमधून संविधानाची व्यावहारिक मांडणी अधिक समजेल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
 
या महोत्सवाचा पुढील प्रवास अत्यंत समृद्ध स्वरूपाचा आहे. महापरिनिर्वाण दिन दि. ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांच्या स्मरणार्थ विशेष जागरूकता स्टॉल उभारण्यात येणार आहे. या स्टॉलचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होईल, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या स्टॉलला भेट देणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून सर्वांसाठी खुला असलेला हा स्टॉल संविधानाची माहिती, तरुणांशी संवाद, मार्गदर्शन उपक्रम आणि नोंदणी सुविधा यांसह दिवसभर लोकशिक्षणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
 
यानंतर दि. २४ जानेवारी रोजी सांस्कृतिक आणि भाषण सादरीकरणाचा दिवस विशेष ठरणार आहे. देशभरातील विद्यापीठांतील तरुणांना भाषणे, नाटिका, कलात्मक सादरीकरण, अभिव्यक्ती आणि संविधानविषयक सांस्कृतिक रचना सादर करण्यासाठी व्यासपीठ देण्यात आले आहे. भारतीय संविधानाबद्दलची त्यांची समज, अनुभव, भावना आणि संशोधन जगासमोर मांडण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरची संधी निर्माण करतो. या मंचावर उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामुळे या कार्यक्रमाला आणखी प्रेरणादायी ओढा लाभणार आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.
 
फेस्टिव्हलचा भव्य समारोप दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय स्तरावर होणार असून, देशभरातून निवडले गेलेले विद्यार्थी, विजेते आणि विशेष योगदान देणारे तरुण या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. संविधानाप्रति निष्ठा आणि लोकशाहीची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त करणारी सामूहिक राष्ट्रप्रतिज्ञा हा या दिवसाचा केंद्रबिंदू ठरेल. त्याच दिवशी ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल’चा राष्ट्रीय अहवाल प्रकाशित केला जाईल. या अहवालात संपूर्ण प्रवासातील चर्चा, युवकांचे मत, व्यावहारिक निष्कर्ष आणि पुढील कृती आराखडा मांडला जाणार आहे.
 
मुंबईतील उद्घाटन महोत्सवात माहितीपूर्ण प्रदर्शने, संविधानाचा इतिहास सांगणारे फलक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दर्शन, युवकांना प्रेरणा देणारी संवाद सत्रे, प्रश्नमंच आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम या सर्वांचा समावेश आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रत्यक्ष जीवनातील वापर, जबाबदार नागरिकत्व, स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय या चार मूल्यांची ताकद आणि राष्ट्रनिर्माणातील तरुणांची निर्णायक भूमिका यांचा विचार विविध उपक्रमांतून मांडला जात आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या महोत्सवाची मध्यवर्ती हाक स्पष्ट आहे. ती म्हणजे, भारताचे संविधान कृतीतून जगवा आणि ज्ञानाला आवाज द्या, अफवांना नाही.
 
तरुणांच्या विचारांना दिशा देणारा, नेतृत्वाची नवीन व्याख्या घडवणारा आणि समाजाला संविधानाशी भावनिकपणे जोडणारा हा उपक्रम भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा आहे. राष्ट्राची ओळख शक्तिशाली लोकशाहीतून तयार होते आणि लोकशाहीची ओळख सुजाण नागरिकत्वातून. म्हणूनच हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही; तो विचारांचा, कृतीचा आणि परिवर्तनाचा प्रवास आहे. आयोजकांच्यावतीने अधिकाधिक युवकांनी आज होणार्‍या कार्यक्रमाला भेट द्यावी, प्रदर्शने पाहावी, चर्चा आणि सत्रांत सहभागी व्हावे आणि संविधानिक मूल्यांना आपल्या जीवनाचा आधार बनवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 - सागर देवरे
 
Powered By Sangraha 9.0