ज्वालामुखीचे ढग...

26 Nov 2025 10:38:38
 
Ash Cloud
 
आफ्रिकेतील इथिओपियामध्ये ‘हायली गुब्बी’ नावाच्या मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा ज्वालामुखी सुमारे १० ते १२ हजार वर्षांनंतर पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती आहे. उद्रेकानंतर प्रचंड राखेचा ढग निर्माण झाला आणि तो आता अंदाजे चार हजार किलोमीटर प्रवास करून भारतापर्यंत येऊन पोहोचल्याचे दिसतेय. राखेचा हा ढग ताशी १३० किमीच्या वेगाने अरबी समुद्र पार करत, सोमवारी रात्री ११ वाजायच्या सुमारास दिल्लीच्या आकाशात पोहोचला.
 
सर्वप्रथम तो पश्चिम राजस्थानातील जोधपूर आणि जैसलमेर परिसरात दिसू लागला. त्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानच्या मोठ्या भागात पसरला. सदर बाब लक्षात आल्यानंतर तज्ज्ञांचे म्हणणे असे की, ही राख जमिनीपासून सुमारे २५ हजार ते ४५ हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळे सध्या लोकांच्या आरोग्यावर थेट धोका नाही; पण हवाईवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, राख असलेल्या क्षेत्रांपासून दूर उड्डाण करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
हे राखेचे ढग विमानांसाठी अत्यंत धोकादायक. कारण, दिसायला ते धुळीसारखे असले, तरी ती प्रत्यक्षात बारीक काच आणि जळलेल्या खडकांचे कण असतात. हे कण विमानाच्या इंजिनमध्ये गेल्यास इंजिन बंद पडू शकते. याशिवाय, राख ‘विंडशील्ड’ अस्पष्ट करते, ‘सेंसर’ बिघडवते. १९८२ मध्ये ‘ब्रिटिश एअरवेज’च्या एका विमानाचे चारही इंजिन अशाच राखेमुळे बंद पडले होते. म्हणूनच अनेक उड्डाणे रद्द, परिवर्तित किंवा विलंबित करण्यात आली.
 
दिल्लीचे प्रदूषण हा भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय प्रश्नांपैकी एक मानला जातो. दिल्लीतील हवेत आधीच पीएम २.५, पीएम १०, सल्फर डायऑसाईड, नायट्रोजन ऑसाईड जास्त प्रमाणात आहेत. त्यात ज्वालामुखीतील सल्फेट एरोसोल, सूक्ष्म राख, भारी कण मिसळल्याने हवा आणखी विषारी होते. अशाने दिल्लीकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याचा संभाव्य धोका उद्भवतो. दम्याचा त्रास झपाट्याने वाढण्याचा धोका असतो, फुफ्फुसांना दीर्घकालीन नुकसान पोहोचण्याची शयता असते. डोळे, नाक आणि घशात जळजळ होणे, मुलांची फुफ्फुस वाढ मंदावणे, असे परिणाम उद्भवू शकतात. ‘हायली गुब्बी’ ज्वालामुखीचा ढग भारतात दीर्घकाळ राहणार नाही; परंतु दिल्ली-एनसीआर सारख्या आधीच प्रदूषित भागांमध्ये गेल्याने आरोग्य आणि हवाईवाहतूक यांच्यासाठी गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
 
दूरच्या देशातील ज्वालामुखी फुटून राख हजारो किलोमीटर दूर इतर देशांपर्यंत पोहोचणे, हे याआधी अनेकवेळा घडले आहे. २०१० रोजी आईसलॅण्ड येथील ‘एजाफ्जालाजोकुल’ ज्वालामुखी फुटल्याने जगातील विमानवाहतूक एक आठवडा ठप्प होती. ३७ देशांमध्ये ९५ हजार विमानांच्या फेर्‍या रद्द झाल्या होत्या. १८१५ दरम्यान इंडोनेशियातील ‘माउंट टांबोरा’चा उद्रेक हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी स्फोटांपैकी एक मानला जातो. ज्याची राख युरोप, उत्तर अमेरिकेपर्यंत पोहोचली होती आणि यामुळेच तेव्हाचे वर्ष हे ’इयर विदाऊट ए समर’ अर्थात, ‘उन्हाळा नसलेले वर्ष’ म्हणून ओळखले गेले होते.
 
जेव्हा राख आणि वायूंचा थर पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये येतो, तेव्हा तापमान खाली येऊ लागते. अनेकवेळा ते इतके कमी होते की, बेमोसमी थंडी पडू लागते. ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर पृथ्वी गरम होईल, असे सामान्यतः वाटते; पण याउलट परिणाम होत असतो. मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे काहीकाळ पृथ्वी थंड होऊ शकते. या अवस्थेला ‘ग्लोबल कूलिंग पीरियड’ असे म्हणतात; पण यामुळे ‘हिमयुग’ सुरू होऊ शकत नाही.
 
दिल्लीचे वाढते प्रदूषण आणि ‘हायली गुब्बी’ ज्वालामुखीच्या ढगासारख्या दूरच्या नैसर्गिक घटनांमुळे निर्माण होणारे संभाव्य संकट टाळण्यासाठी भारताने सतत सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. हवेच्या गुणवत्तेचे सतत मॉनिटरिंग करणे आवश्यक ठरेल. रुग्णालयांत श्वसन संसाधने, फिल्टर मास्क, नेब्युलायझर, ऑसिजन सिलिंडरचा साठा राखणे यांसारख्या मुद्दांकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. एकंदरीतच, अशाप्रसंगी वैज्ञानिक निरीक्षण, सरकारी तत्परता आणि नागरिकांचे सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0