"रामराज्याच्या मूल्यांचे नवे युग सुरु...", अयोध्येतून योगी आदित्यनाथ यांचं प्रतिपादन

25 Nov 2025 17:54:09

Yogi Adityanath

मुंबई : (Yogi Adityanath)
तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अयोध्यानगरीमध्ये एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) सनातन धर्मध्वज फडकवला.या धर्मध्वजारोहण सोहळ्याला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास महाराज, कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरिजी महाराज, महामंत्री चंपत राय आदि मान्यवर उपस्थित होते. धर्मध्वजारोहण ही एका नव्या युगाची सुरूवात आहे, असे योगी आदित्यनाथ याप्रसंगी बोलताना म्हटले आहे.

धर्मध्वजारोहण हा एका नव्या युगाचा शुभारंभ

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहण एका यज्ञाची पुर्णाहुती नव्हे तर एका नव्या युगाचा शुभारंभ आहे. धर्मध्वजारोहण हे त्या सत्याचा उद्घोष आहे की, रामराज्याचे मूल्ये कालजयी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाचे नेतृत्व स्वीकारले त्या दिवसापासूनच भारतवासियांच्या हृदयात विश्वासाचा सूर्योदय झाला होता. आज तीच तपस्या आणि असंख्य पिढ्यांची प्रतीक्षा आपल्या करकमलांद्वारे राम मंदिराच्या स्वरूपात पूर्णत्वाला पोहोचली आहे. प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर, १४० कोटी भारतीयांची आस्था, सन्मान आणि आत्मगौरवाचे प्रतिक आहे. ध्वजारोहणाचा दिवस मंदिर निर्मितीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिलेल्या प्रत्येकाच्या बलिदानाप्रती समर्पित आहे.

ध्वजारोहणाचा दिवसही अत्यंत महत्त्वाचा निवडण्यात आला, विवाह पंचमी. भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या दिव्य विवाहाचा दिवस. या अभिजीत मुहूर्तावर पार पडलेला हा विधी मंदिराच्या आध्यात्मिक प्रभामंडलात नवा आयाम जोडणारा ठरला. शंखनाद, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या जयघोषात जेव्हा ध्वज अयोध्येच्या आकाशात फडकवला गेला, त्या क्षणी श्रद्धा, परंपरा आणि इतिहास एकाच बिंदूवर येऊन एकरूप झाले.

Powered By Sangraha 9.0