चांगलीच जिरवली!

25 Nov 2025 11:21:13

dharmendra
 
अलिकडील काळात समाजमाध्यमांवर उतावीळ होत, उथळपणे घाईघाईने व्यक्त होण्याचा जो ट्रेंड आला आहे, तो अतिशय घातक असाच. इलेट्रॉनिक वृत्त माध्यमे आणि समाजमाध्यमाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर हे घाईघाईने ‘व्ह्युज’ मिळवण्यासाठी, ‘टीआरपी’ मिळवण्यासाठी व्यक्त होणे एवढे वाढले आहे की, कोणाच्या भावना दुखावतील, कोणाला मनस्ताप होईल किंवा कोणाला मानसिक आघात पोहोचेल, याचे मुळी भानच उरलेले नाही. सेलिब्रिटींच्या बाबतीत तर आजकाल चक्क व्यक्ती जिवंत असतानादेखील निधन पावले आहेत, असे संदेश प्रसिद्ध करण्याची तर स्पर्धाच लागलेली दिसते. महनीय व्यक्तींच्या निधनावर अनेकांनी अशीच घाई करून तोंडावर आपटणे काय असते, याचा अनुभव घेतला आहे.
 
मात्र, निर्लज्जपणा ठायीठायी भरलेला असल्याने त्याचे काहीही वाटून न घेता, कोणतीही दिलगिरीही व्यक्त न करता, ही इलेट्रॉनिक वृत्त माध्यमे आपला ‘टीआरपी’ वाढवण्यातच स्वतःला धन्य मानीत आहेत. यामुळे समाजस्वास्थ्य बिघडत आहे, याचेदेखील त्यांना भान राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेता असरानी यांच्या निधनाच्या बातम्या, त्यांचा मृत्यू होण्याअगोदरच अनेक समाज माध्यमांवर दाखवण्यात आल्या होत्या. अखेर त्या अभिनेत्याचे निधन झाले, तेव्हा कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेनुसार कोणतीही चर्चा न करता, असरानी यांचे अंत्यसंस्कार आटोपले होते. त्यांच्या भावनांशी खेळणे कितपत योग्य आहे? याचा हे लोक कधी विचार करणार? केवळ, ‘आताची सर्वांत मोठी बातमी’ अशी आरडाओरड करत, लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवणे किती दिवस चालणार? अभिनेता धर्मेंद्र यांच्याबाबतीत तर वृत्तवाहिन्यांनी कहरच केला. परिणामी, देओल कुटुंबीयांचा नैसर्गिक संताप व्यक्त झाला. विशेष म्हणजे आज खरोखरच निधन झाल्यावर, देओल कुटुंबीयांनी या वाहिन्यांना कोणतीही किंमत दिली नाही. त्यामुळे या वाहिन्यांची चांगलीच जिरली असल्याचे, आज अनेकांनी डोळे उघडून नीट बघितले. परिणामी वाहिन्यांवर ‘धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी सेलिब्रिटी येत आहेत’, अशी बातमी दाखवण्याची पाळी आली. ही आपल्यावर नामुष्की आहे, हे देखील त्यांना उमजले असेल का? याची शंकाच वाटते. तथापि, देओल कुटुंबीयांनी वृत्तवाहिन्यांची चांगलीच जिरवली, यातमात्र कोणतीही शंका नाही.
यांचीपण जिरवा!
 
अलिकडील काळात कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करण्यात पटाईत असलेल्या आणि आता उरलेल्या इन मिन विरोधी पक्षांना ज्या तर्‍हेने वृत्तवाहिन्यांनी, समाजमाध्यमांनी उचलून घेतले आहे, ते समाजस्वास्थ्य चांगले राहण्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे यावर खरेतर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विकासाचे काम करणार्‍या शासनाला विकासाच्या मुद्द्यांवर जाब विचारायचे सोडून, त्यावर आपले मत मांडायचे सोडून; हे लोक ‘सरकारमधील नेत्यांमध्ये वाद आहेत’, ‘या मंत्र्याने असे विधान केले’, ‘या सत्ताधारी आमदाराने असा घरचा आहेर दिला, म्हणून हे सरकारच वादग्रस्त आहे’, असा जो काही रोज आव आणून लोकांच्या माथी मारण्याचा प्रताप करीत आहेत, तो नक्कीच जनतेमध्ये अप्रिय ठरत आहे. विरोधी पक्षांना ताकद देणारा, खतपाणी घालणारा दररोजचा भोंगा अचानक बंद पाडण्याची पाळी एका पक्षावर आलीच ना? तसेच, या लोकांना देओल कुटुंबानेही धडा शिकवला.
  
अनेकजण तर या खोट्या आणि निराधार बातम्या देणार्‍यांनाच ट्रोल करीत आहेत. काय तर म्हणे, ‘आता तुम्ही गाफील राहिलात, तर मुंबई तुमच्या हातून गेली असे समजा,’ असा अफलातून आव एका नेत्याने आणला आहे. बरे, एवढ्यावरच न थांबता, हा नेता चक्क रस्त्यावर येण्याची चिथावणी द्यायलादेखील मागेपुढे बघत नाही. अतिशय बालिश आणि लहान मुलांसारखा आवाज असलेल्या आणि ‘पेंग्विन’ म्हणून व्हायरल होत असलेल्या एका नेत्याने, तर निवडणुका घेताच कशाला? आम्हाला मतदानाला बोलावताच कशाला? असे बाष्कळ प्रश्न विचारून, स्वतःचे हसे करून घेतले आहे. टोमणे मारणार्‍यांचे तर वेगळेच सुरू असते. उरल्यासुरल्या काँग्रेस पक्षाने अर्वाच्च बोलून, आपली पात्रता दर्शवली आहे. मात्र, ‘आम्हीच ठोस विरोधक आहोत, या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ‘भीमगर्जना’ प्रत्येक निवडणुकांपूर्वी करणारे हे विरोधक, प्रत्येक निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावरदेखील एखाद्या चित्रपटातील मार खाल्लेल्या खलनायकाप्रमाणे आव आणताना जनता बघत आहे आणि आपले मनोरंजन करून घेत आहे. यांची पुन्हा जिरवायची वेळ आली हे जनतेला ठाऊक असून, याचे उत्तर निवडणुकीत द्यायचे असा निर्धारच नागरिकांनी केला आहे.
 
 - अतुल तांदळीकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0