दिल्ली स्फोटानंतर वेगाने फिरलेल्या तपासचक्रामध्ये ‘पांढरपेशा दहशतवादा’चा एक क्रूर चेहरा समोर आला. या पांढरपेशा दहशतवाद्यांना अटक करून, सुरक्षा यंत्रणा त्यांचा तपास पुढे नेत आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच ‘इस्लाम खतरे में’च्या घोषणा देशात ऐकू येऊ लागल्या आहेत. यात काही मौलानाही सामील आहेत, अर्शद मदानी त्यापैकीच एक ठरतात...
याच महिन्यात १० तारखेला राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यानजीक जो भयंकर स्फोट झाला, त्या स्फोटात १५ लोक ठार झाले; तर अन्य अनेक जखमीही झाले. काश्मिरी डॉटर असलेल्या उमर-उन नबी जी ‘आय २०’ मोटार चालवीत होता, त्या मोटारीत स्फोट झाला आणि त्या घटनेने केवळ राजधानी दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण भारत हादरून गेला. सदर काश्मिरी डॉटर फरिदाबाद येथील ‘अल फला’ विद्यापीठाशी संबंधित होता. या घटनेनंतर तपासचक्रे वेगाने फिरली आणि यामध्ये सुशिक्षित जहाल मुस्लीम दहशतवादी डॉटरांचे टोळके असल्याचे आढळून आले. या काश्मिरी डॉटरांचे गेली काही वर्षे ब्रेन वॉशिंग केले जात होते, त्यातूनच ते जहाल बनले. देशाच्या विविध भागांमध्ये भीषण स्फोट घडविण्याची त्यांची योजना होती.
या सर्वांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी, आत्मघातकी हल्ले करण्यासाठीच मानसिकरित्या तयार करण्यात आले होते. पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवात-उल-हिंद’ या दहशतवादी गटांशी त्यांचा संबंध असल्याचेही आढळून आले. या अतिरेकी टोळयामध्ये डॉ. शाहीन या नावाच्या एका महिलेचाही समावेश आहे. दिल्लीमधील स्फोटासंदर्भात बाहेर आलेल्या माहितीनुसार, या अतिरेयांना राजधानी दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये ३२ कार बॉम्बस्फोट घडवायचे होते किंवा आयईडीद्वारे स्फोटकांनी भरलेल्या मोटारींचे स्फोट घडविण्याचीही त्यांची योजना होती; पण तत्पूर्वीच हे कटकारस्थान उघड झाले. असे सर्व घडले असताना, मुस्लीम नेते मौलाना अर्शद मदानी यांना मात्र जो तपास केला जात आहे, त्याद्वारे केवळ मुस्लीम समाजास लक्ष्य केले जात आहे असे वाटत आहे! मौलवी मदानी यांनी जाहीर भाष्य करून, सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करीत असल्याचा आरोप केला आहे.
मौलाना अर्शद मदानी हे ‘जमात-उलमा-हिंद’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे लक्षात घेऊन ते जबाबदारीने बोलतील अशी अपेक्षा होती; पण तसे काही घडले नाही. दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेनंतर ‘अल फला’ विद्यापीठास विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचे, मदानी यांनी म्हटले आहे. वास्तविक, ज्या अतिरेयांना पकडण्यात आले त्यांचा या कथित विद्यापीठाशी संबंध आल्याचेही तपासात आढळून आले आहे. पण, त्याकडे लक्ष न देता मुस्लीम व्यक्ती, संस्था यांना गोवले जात असल्याचे मदानी यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांनी प्रगती करूच नये, यासाठी सरकार अथकपणे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "न्यूयॉर्क आणि लंडन शहराच्या महापौरपदी अनुक्रमे झोहरान ममदानी आणि सादिक खान यांची निवड होते; पण भारतातील मुसलमान एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरूही होऊ शकत नाही,” अशी टीका मदानी यांनी केली. ‘अल फला’ विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दिकी सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत. किती वर्षे ते तुरुंगात राहतील हे कोणीच सांगू शकत नाही, याकडे मदानी यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुस्लिमांना डोके वर काढू न देण्याचे प्रयत्न सरकारने केले, असा आरोप मदानी यांनी केला. पण, भारताच्या राष्ट्रपतीपदी आतापर्यंत तीन मुस्लीम व्यक्ती विराजमान झाल्या होत्या, याचा सोयीस्कर विसर मदानी यांना वरील आरोप करताना पडल्याचे दिसून येते.
मदानी यांनी असे वाट्टेल ते आरोप करून जो थयथयाट केला, त्यास भाजपचे नेते शाहनवाझ हुसेन यांनी उत्तर दिले आहे. मदानी यांनी जे वक्तव्य केले, ते अत्यंत बेजबाबदार असल्याचे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ’जे युवकांना जहाल विचारांकडे लोटतात, त्यांचा धर्म कोणता आहे याचा विचार न करता, अशांना त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे’ असे म्हटले आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी सरकारने विशिष्ट धर्माविरुद्ध पद्धतशीर मोहीम चालविली आहे, असे आरोप केले आहेत.
पण त्याचवेळी मदानी यांनी या सर्वांचा संबंध ‘अल फला’शी जोडायला नको होता, असेही म्हटले आहे. तर जे दहशतवाद पसरवितात त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी; पण संपूर्ण विद्यापीठ नष्ट करावे असा याचा अर्थ नाही असे काँग्रेस नेते रशीद नकवी यांनी म्हटले आहे. एकूणच, भारतात ज्या दहशतवादी कारवाया होत आहेत, त्यामध्ये मुस्लीम मोठ्या संख्येने असल्याचे मानण्यास मौलाना अर्शद मदानी यांच्यासारखे नेते तयार नाहीत. मुस्लीम निरपराध असून, त्या निष्पाप लोकांना या सर्वांमध्ये गोवले जात आहे असेच मदानी यांच्यासारख्या नेत्यांचे म्हणणे असल्याचे दिसून येत आहे. पण, असा थयथयाट करून काही साधले जाणार नाही, हे मदानी यांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणीही सुजाण नागरिक मदानी यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही.
राम मंदिरावर परंपरागत ध्वज फडकणार!
अयोध्येतील राम मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून, आज दि. २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात भव्य ध्वजस्तंभावर, परंपरागत ध्वजाचे आरोहण केले जाणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास अनेक संत-महंतही उपस्थित राहणार आहेत. प्रभू रामचंद्रांच्या दैवी आणि वैभवशाली परंपरेनुसार आणि शतकांच्या पासून चालत आलेली आध्यात्मिक परंपरा लक्षात घेऊन, या ध्वजाची निर्मिती करण्यात आली. प्राच्यविद्या, भारतविद्येचे अभ्यासक ललित मिश्रा यांनी केलेल्या अथक संशोधनातून, हा ध्वज साकारण्यात आला आहे.
जो ध्वज उभारण्यात येणार आहे, त्याचा उल्लेख ‘रामायणा’तील ‘अयोध्याकांडा’मध्ये आहे. अभ्यासक ललित मिश्रा यांना असा ध्वज मेवाडमध्ये जे ‘रामायणा’चे चित्र आढळून आले, त्यामध्ये दिसून आला. आज अयोध्येतील राम मंदिरात जो ध्वज उभारण्यात येणार आहे, त्यावर ‘ओम’ चिन्ह, सूर्य आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह असणार आहे. ऋषी ‘कश्यप’ यांनी मंदार आणि पारिजात वृक्ष यांचे कलम करून, कोविदार या वृक्षाची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. तर सूर्याचे चिन्ह प्रभू रामाची ‘सूर्यवंशी’ परंपरा दर्शविणारे चिन्ह आहे, तर ‘ओम’ आंतरिक आध्यात्मिक ध्वनी आहे. यासंदर्भात बोलताना ललित मिश्रा म्हणाले की, ’अयोध्येचा प्राचीन ध्वज आणि पवित्र वृक्ष महाभारत युद्धानंतर लुप्त झाले. पण विस्मृतीत गेलेली ही चिन्हे शोधण्यात आली आणि त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली, याचा आपणास आनंद होत आहे.’ भगवान राम हे ‘सूर्यवंशी’ असल्याचे आपण मानतो, त्यामुळे या ध्वजावर सूर्याचे चिन्ह राहणार आहे.
समितीने ही चिन्हे स्वीकारली आहेत. त्यामुळे या ध्वजावर सूर्य, ‘ओम’ आणि कोविदार वृक्ष असणार आहेत. महाभारत युद्धानंतर या ध्वजाची माहिती लुप्त झाली होती; पण मेवाडमधील ‘रामायणा’संदर्भातील चित्रात आणि ‘रामायणा’च्या ‘अयोध्याकांडा’त या ध्वजाचा संदर्भ मिळाला. विविध प्रकारचे सखोल संशोधन करून, हा ध्वज निश्चित करण्यात आला. आजच्या ध्वजारोहण समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याकडे देशातील आणि जगभरातील हिंदू समाजाचे लक्ष लागले आहे. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हिंदू समाज आतुरला आहे.
यासीन मलिक हा चौघांपैकी एक शूटर!
सध्या कारावासात असलेला ‘जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडी’चा नेता यासीन मलिक हा हवाई दलाच्या चार अधिकार्यांवर ज्यांनी गोळीबार केला, त्यातील एक होता. १९९० साली ही गोळीबाराची घटना घडली होती; पण हे सर्व प्रकरण तीन दशकांहून अधिक काळ रेंगाळत पडले होते. या खटल्यातील दोन महत्त्वपूर्ण साक्षीदारांनी, गेल्या शनिवारी यासीन मलिक यास ओळखले. गोळीबार करणार्यांमध्ये यासीन मलिक होता, असे या साक्षीदारांनी सांगितले. जम्मूमधील टाडा न्यायालयात ही ओळख परेड झाली. तसेच, गोळीबार करतेवेळी मलिक याचे जे अन्य तीन साथीदार होते, त्यांनाही या साक्षीदारांनी ओळखले. यासीन मलिक आणि अन्य साथीदारांना ओळखण्यात आल्याने, हा खटला मार्गी लावण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे, असे मानण्यात येत आहे. या चौघांमधील मुख्य शूटर यासीन मलिक होता हे लक्षात आणून दिल्याने, जे हवाई दल अधिकारी मारले गेले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची चिन्हे आहेत.