Ram Mandir Ayodhya Dhwajarohan : राम मंदिरावर फडकला धर्मध्वज, काय आहेत खास वैशिष्ट्यं?

25 Nov 2025 16:04:27

Ram Mandir Ayodhya Dhwajarohan

मुंबई : (Ram Mandir Ayodhya Dhwajarohan)
अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर सनातन धर्मध्वज फडकवला. हा धर्मध्वज केवळ वस्त्र किंवा धार्मिक परंपरेचा भाग नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा, भक्तांच्या एकसंध श्रद्धेचा आणि रामराज्याच्या आदर्शांचा जिवंत प्रतीक आहे.

असा आहे 'धर्मध्वज'

हा धर्मध्वज त्याग, धर्म, शौर्य आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक असणाऱ्या भगव्या रंगाचा आहे. या ध्वजावर तीन चिन्हे आहेत. यामध्ये सूर्य, ॐ (ओम) आणि कोविदार वृक्षाचा समावेश आहे. हा धर्मध्वज त्रिकोणी आकाराचा असून साधारण २० ते २२ फूट लांबी आणि १० ते ११ फूट रुंदीचा आहे. त्याच्यावर असलेली सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष ही चिन्हे रेशमी धाग्याने बारीक शिलाईकाम करून सजवण्यात आली आहेत. ध्वजासाठी ४२ फूट उंच पोल उभारण्यात आला आहे, ज्यामध्ये ३६० अंशामध्ये फिरणारी यंत्रणा बसवली आहे. यामुळे कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाऱ्याबरोबर हा ध्वज सहज फिरू शकतो. तसेच ध्वजाचे कापड पॅराशूट-ग्रेड पासून बनवले असल्याने ६० किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या जोरदार वाऱ्यातही ध्वज मुक्तपणे फडकू शकतो.

तिन्ही चिन्हांचं महत्त्व

भगवान श्रीराम हे सूर्यवंशीय असल्याने ध्वजावरील सूर्य हा रामवंशाच्या तेजस्वितेची आठवण करून देतो. ॐ हे ब्रह्मांडाचे नादरूप आहे. तर कोविदार वृक्ष हा समृद्धी, शुद्धता आणि रामायणातील सांस्कृतिक संदर्भांचे प्रतीक आहे. कोविदार वृक्षाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक मान्यतांनुसार हा पारिजात व मंदार या वृक्षांच्या दिव्य संयोगातून बनलेला दिव्य वृक्ष आहे. आजच्या काळातील कचनार वृक्ष हा कोविदार वृक्षासारखा दिसतो. सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणानुसार भरत राजाच्या ध्वजावर कोविदार वृक्षाची प्रतिमा होती.

Powered By Sangraha 9.0