मुंबई : (PM Narendra Modi) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर सनातन धर्मध्वजारोहण केले. या धर्मध्वजारोहण सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत आणि मोठ्या संख्येने साधूसंत उपस्थित होते. आज राम मंदिराच्या बाहेर फडकवण्यात आलेला भगवा ध्वज हे भारताच्या सभ्यतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
आज अयोध्यानगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका उत्कर्षबिंदूची साक्षीदार बनलीय. आज संपूर्ण भारतासह विश्व राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताच्या ह्रदयात अद्वितीय संतोष, असीम कृतज्ञता, अपार अलौकिक आनंद आहे. अनेक पिढ्यांचे घाव आज भरले आहेत. वेदनेला आता पूर्णविराम मिळतो आहे. अनेक वर्षांपासूनचा संकल्प आज पूर्ण झाला आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे ज्याचा अग्नि ५०० वर्षांपर्यंत प्रज्वलित राहिला. जो यज्ञ एका क्षणासाठी विझला नाही.
हा धर्मध्वज केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचे प्रतीक
आज भगवान श्रीरामाच्या गर्भगृहाची अनंत ऊर्जा आणि श्रीरामांच्या परिवाराचा दिव्य प्रताप या धर्मध्वजाच्या रुपात प्रतिष्ठापित झाला आहे. हा धर्मध्वज केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचे प्रतीक आहे. या ध्वजातला भगवा रंग, यामधील सूर्यवंशाची ख्याती, ओम शब्द, यावर रेखाटलेला कोविदार वृक्ष या सगळ्यातून राम राज्याची किर्ती प्रतिरुपित होत आहे. हा ध्वज संकल्प व यशाचा आहे. ही संघर्षातून सृजनाची गाथा आहे. ध्वज संकल्प व यशाचा आहे. हा ध्वज अनेक शतकांच्या साकार झालेल्या स्वप्नाचं प्रतिक आहे. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाची प्रेरणा आहे.
हा धर्मध्वज 'सत्यमेव जयते'चं आवाहन करेल
येणाऱ्या काळात आणि पुढच्या अनेक शतकापर्यंत हा धर्मध्वज प्रभू श्रीरामाच्या आदर्श सिद्धांतांचा उद्घोष करेल. हा धर्मध्वज 'सत्यमेव जयते'चं आवाहन करेल. सत्याचा नेहमी विजय होतो हेच जगाला सांगेल. हा धर्मध्वज उद्घोष करेल, सत्यम एकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः अर्थात सत्य हेच ब्रह्माचे स्वरुप आहे. सत्यातच धर्माची स्थापना झालेली आहे. हा धर्मध्वज प्रेरणा बनेल. प्राण जाए पर वचन न जाए अर्थाच जे सांगितले जाते तेच करावं हेच हा ध्वज संदेश देईल. या विश्वात कर्म आणि कर्तव्याला प्राधान्यता दिली पाहिजे, हेच हा ध्वज सांगेल. हा धर्मध्वज वैर मिटवण्याचा संदेश देईल. सर्वांचे सुख पाहायला सांगेल. भेदभाव आणि पीडेतून मुक्ती देण्यास सांगेल. कोणी दुःखी राहू नये, कोणी दरिद्री राहू नये, गरीबीत राहू नये असा समाज बनवा असं हा ध्वज सांगेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
रामलल्लाच्या जन्मभूमीचे दर्शन घडवणारा हा ध्वज आहे
जे लोक काही कारणामुळे मंदिरात येऊ शकत नाहीत आणि दूरुनच मंदिराच्या ध्वजाला नमस्कार करतात त्यांनाही तेवढंच पुण्य मिळतं हे सांगणारा ध्वज आहे. रामलल्लाच्या जन्मभूमीचं दर्शन घडवणारा हा ध्वज आहे. हा ध्वज रामाच्या आदर्शाना सगळ्या जगापर्यंत पोहचवणारा ध्वज आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या आणि या सोहळ्याच्या मी जगभरातल्या कोट्यवधी राम भक्तांना शुभेच्छा देतो. ज्यांनी ज्यांनी राम मंदिर निर्माणासाठी मदत केली त्यांनाही मी प्रणाम करतो असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.