_202511250955384206_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबईकरांना हिवाळ्याचे अप्रूप असते, कारण अतिशहरीकरणामुळे मुंबईत जवळपास वर्षभर उन्हाळा हाच एक ऋतू जाणवतो. मात्र, उन्हाळ्यात ‘उन्हाळा’ आणि हिवाळ्यात ‘हिवाळा’ असे ऋतू जाणवणारी बरीच शहरे देशात आहेत. त्यात दिल्लीचाही समावेश होतो. आता दिल्लीतही सुखद गारवा पडू लागला आहे; पण दिल्लीच्या हवेला एक शाप आहे. तेथे थंडीच्या दिवसांत हवेतील प्रदूषण फार वाढते. सध्याही दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. या पर्यावरणीय प्रदूषणावर काही उपाय तरी करता येतो; पण दिल्लीतील काही विद्यापीठांमध्ये जे वैचारिक प्रदूषण ठाण मांडून बसले आहे, त्यापासून आजच्या तरुणपिढीची सुटका कशी करायची, हाच मोठा प्रश्न आहे.
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाविरोधात काही विद्यार्थ्यांनी नुकतीच निदर्शने केली; पण निदर्शने करताना लवकरच त्यांनी प्रदूषणाचा विषय सोडून, नुकताच मारला गेलेला नक्षलवादी मदानी हिडमा याच्या बाजूने आणि नक्षलवादाच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. म्हणजे, प्रदूषण हे केवळ निमित्तच होते. त्यांना हिडमाच्या मृत्यूचा निषेध करायचा होता. ज्या विद्यार्थ्यांना अजून बाहेरच्या जगाचा अनुभव आलेला नाही, त्यांना हिडमासारख्या क्रूर नक्षलवाद्याबद्दल इतकी सहानुभूती कशी वाटू शकते? हाच खरा प्रश्न आहे. या हिडमाने केलेल्या दुष्कृत्यांची त्यांना कल्पना आहे का? त्याच्यावर सरकारने एक कोटी रुपयांइतया मोठ्या रकमेचे इनाम का लावले होते, याचा त्यांनी कधीतरी विचार केला आहे का? भारतात ‘माओवादी’ किंवा ‘नक्षली’ हिंसाचार आता जवळपास संपुष्टात आला आहे. हजारो नक्षलवाद्यांनी सरकारपुढे शरणागती पत्करली आहे. देशातील दाट जंगलांनी भरलेल्या प्रदेशातूनही, या ‘माओवाद्यां’चे उच्चाटन होत आहे.
प्रत्यक्ष जमिनीवरील कार्यकर्ते किंवा दहशतवादी संपत चालल्याचे पाहून या नक्षलवाद्यांनी आपल्या धोरणात बदल केला असावा, अशी शयता दिसून येते. आता प्रत्यक्ष लढाई करून आपली विचारसरणी लादणे शय होणार नाही हे लक्षात आल्यावर, या नक्षलवाद्यांनी तरुणपिढीच्या मनात हे नक्षली किंवा डाव्या विचारसरणीचे विष पेरण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते. ‘इंडिया गेट’सारख्या दिल्लीच्या आलिशान परिसरात जीन्स, टी-शर्ट घातलेल्या आणि आंग्लाळलेल्या हिंदीत वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलणार्या या विद्यार्थ्यांपैकी, कितीजणांनी आदिवासींच्या खडतर जीवनाचा अनुभव घेतला आहे? यापैकी किती विद्यार्थ्यांनी दांतेवाडा, बस्तरसारख्या जंगलांमध्ये वास्तव्य करणार्या आदिवासी लोकांशी संपर्क साधला आहे? यापैकी कितीजण तेथे प्रत्यक्ष वास्तव्य करून आले आहेत? त्यापैकी किती विद्यार्थ्यांना, या लोकांच्या मूलभूत मागण्या काय आहेत आणि सरकार त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कोणत्या योजना राबवत आहे, तेथे कोणते बदल घडत आहेत; याची कल्पना आहे?
या आदिवासी तरुणांनाही एक सुरक्षित, स्थिर आणि संपन्न जीवन जगायचे आहे. त्यांनाही शहरी सुखसुविधा हव्या आहेत मात्र, हिंसक मार्गाचा अवलंब करून या आकांक्षा पूर्ण करता येणार नाहीत, याची जाणीव त्यांना होत आहे. या नक्षलवाद्यांनी आपल्या परिस्थितीचे भांडवल करून, आपला जम बसवला आणि आपले शोषण सुरूच ठेवले, याचे भान आदिवासी समाजाला येत आहे. यामुळेच नक्षलवाद्यांना असलेला पाठिंबा झपाट्याने घटत चालला आहे. या नक्षलवाद्यांमुळेच आजही आपल्याला जंगलात काटया आणि मातीच्या भिंती असलेल्या झोपडीत जीवन कंठावे लागत आहे, हे या समाजाला कळून चुकले आहे. उलट, नक्षलवाद्यांनी तेथे असलेल्या, तुटपुंजा सरकारी सुविधाही उद्ध्वस्त करून टाकल्या. कारण समाजात भौतिक सुधारणा करणे, हा त्यांचा उद्देशच नाही.
जगात ‘साम्यवादी’ विचारसरणी स्वीकारलेल्या कोणत्याच देशाला प्रगती करता आलेली नाही. रशिया, चीन, यूबा, उत्तर कोरिया यांसारखे ‘साम्यवादी’ देश, हे भौतिक प्रगतीपासून वंचितच राहिले. चीनने आर्थिकक्षेत्रात ‘साम्यवादी’ विचारसरणी सोडून देऊन ‘भांडवलवादी’ विचारसरणी स्वीकारली, तेव्हाच तो आधुनिक आणि विकसित देश बनला. यूबा आजही एक दरिद्री देश आहे. द. कोरियाबद्दलही सांगण्यासारखे काही नाही.
भारतालाही हाच अनुभव आला. नेहरू आणि इंदिरा गांधीप्रणीत ‘समाजवादा’चे जोखड मानेवर वागवणारा भारत, हा कमालीचा दरिद्री आणि भुकेकंगाल देश होता. खरेतर ब्रिटिश राजवटीपूर्वीही भारत हा गरीब देश असला, तरी त्याची अवस्था भुकेकंगाल देश अशी नव्हती. ती अवस्था ब्रिटिशांच्या धोरणांनी ओढवली. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या ‘साम्यवादा’ने प्रगतीलाच लायसन्स-परमिट राज्यात बंदिस्त केले. त्यामुळे क्षमता आणि मागणी असूनही, भारतात सदैव अन्न, वस्त्र आणि निवार्याची टंचाईच जाणवत राहिली. त्याला इंदिरा गांधींच्या काळात भ्रष्टाचाराची जोड मिळाल्यावर, अखेरीस हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा राहिला. नरसिंह राव यांनी नाइलाजाने का होईना; पण बाजारचलित अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यावर अल्पावधीत भारताची स्थिती सुधारली. इतकेच नव्हे, तर भारताची विकासाची भावी क्षमता किती मोठी आहे, त्याची झलकही पाश्चिमात्य जगाला दिसली. त्यानंतर भारताने मागे वळून बघितलेले नाही. आज भारत ही चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, तो या आधुनिक भांडवलशाहीच्या जोरावरच.
आजच्या तरुणाईला याची जाणीव नाही. त्यांना कथित ‘रोमॅन्टिसिझम’चे डोस पाजण्यात येत असले, तरी त्याचा अंमल आता उतरत आहे. दिल्लीतील ‘जेएनयू’सारख्या विद्यापीठातही ‘अभाविप’ला पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे हवेतील नसले, तरी दिल्लीच्या विद्यापीठांतील तरुणपिढीच्या मनावरील प्रदूषण घटण्यास नक्कीच मदत होईल.