शरीरासोबत राखूया मानसिक स्वास्थ्य!

25 Nov 2025 11:10:48
 
 
Mental Health
भारतात मानसिक आरोग्याचा प्रश्न हा आजच्या काळातील सर्वांत गंभीर आणि अदृश्य आरोग्य संकटांपैकी एक. शारीरिक आजारांना आपण तातडीने उपचार देतो, परंतु मनाच्या वेदनांकडे मात्र समाज अजूनही दुर्लक्ष करतो. ताण, नैराश्य, चिंता, झोपेचे विकार, डिजिटल व्यसन या सर्वांचा परिणाम, लाखो भारतीयांच्या जीवनावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, मानसिक आरोग्य हा शरीराच्या प्रत्येक कार्यप्रणालीचा पाया असल्याने, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संपूर्ण आरोग्य धोक्यात घालणे होय! या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याची जाणीव, योग्य उपचार यांचा घेतलेला मागोवा...
भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या समोरील चिंता विचारात घेतल्या, तर मानसिक आरोग्य ही आजची सर्वांत गांभीर्याने पाहण्यासारखी समस्या ठरणार असल्याचे चित्र आहे. शरीरातील जखमा दिसतात, वेदना जाणवतात; परंतु मनावरील जखमा अदृश्यच राहतात. म्हणूनच बहुतेक भारतीय मनाच्या त्रासाकडे सहजगत्या दुर्लक्ष करतात. परंतु, वैद्यकशास्त्र सांगते की, मानवी शरीराच्या सर्व कार्यप्रणालींचे नियमन करणारा मेंदू असंतुलित झाला, तर आरोग्याच्या प्रत्येक स्तरावर परिणाम अपरिहार्य आहे. मानसिक आरोग्य ही चैनीची बाब नसून, सामाजिक आरोग्याचाही केंद्रबिंदू झाली आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, मानसिक आरोग्य सुदृढ म्हणजे केवळ मानसिक विकार नसणे, एवढेच नव्हे. विचारांचे संतुलन, भावनांची स्थिरता, निर्णयक्षमतेची क्षमता, सामाजिक नातेसंबंधातील समरसता, ताणतणावाशी लढण्याची शक्ती, काम करण्याची मानसिक ऊर्जा या सर्वांचे एकत्रित स्वरूप म्हणजे मानसिक आरोग्य होय! ‌‘न्यूरोबायोलॉजिकल‌’ पातळीवर मानसिक आरोग्य म्हणजे, मेंदूमधील न्यूरोट्रान्समिटरचे संतुलन, हॉर्मोन्सची नियमित लय आणि मज्जासंस्थेची अखंड कार्यक्षमता होय.
 
इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे भारतीय समाज दुर्लक्ष का करतो, याची कारणे खोलात गेल्यावर अत्यंत गुंतागुंतीची आढळतात. सर्वप्रथम सामाजिक कलंकाची असलेली भावनाच यामधला सर्वांत मोठा अडसर. ‌‘मानसिक उपचार घेणे म्हणजेच वेडेपणा‌’ हा आपल्या समजात खोलवर रूजलेला एक गैरसमज आहे. मानसिक आजार म्हणजे कमकुवतपणा, असा अज्ञानाधारित दृष्टिकोनही आज समाजात आढळून येतो. अशा वातावरणात लोक स्वतःच्या संघर्षांना दाबून ठेवतात आणि आरोग्याच्या नव्या संकटाला आमंत्रण देतात.
 
मानसिक आरोग्य बिघडण्याची कारणे वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत व्यापक आहेत. मेंदूमधील ‌‘सेरोटोनिन‌’, ‌‘डोपामाईन‌’ आणि ‌‘नॉरएड्रेनालिन‌’ यांतील असंतुलन, चिंता आणि नैराश्य निर्माण करते. दीर्घकालीन ताणामुळे कोर्टिसोलचे प्रमाण सतत वाढते आणि यामुळे मज्जासंस्था कमकुवत होते. झोपेचा अभाव भावनिक स्थिरता ढासळवण्यास कारणीभूत ठरतो. शहरी जीवनातील वेग, डिजिटलच्या अतिरेकामुळे निर्माण होणारी ‌‘डोपामाईन‌’ स्रवण्याची बदलती लय, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक दबाव, व्यसनाधीनता या सर्व घटकांचा एकत्र परिणाम मानसिक स्वास्थ्यावर दिसतो. हे परिणाम केवळ मानसिकच नाहीत; तर ते शरीरातील जैविक प्रक्रियांनाही थेट प्रभावित करतात.
 
आकडेवारी पाहिली, तर चिंता वाढवणारी आहे. भारतात प्रत्येक चार व्यक्तींमध्ये एकाला मानसिक अस्वस्थतेचा काही ना काही प्रकार जाणवतो. तरुणांमध्ये नैराश्य, चिंता, वर्तन विकार आणि डिजिटल तणाव दुप्पट वेगाने वाढत आहेत. आत्महत्यांचे प्रमाण वाढणे, उत्पादनक्षमतेत घट, अनपेक्षित शारीरिक आजारांचे प्रमाण वाढणे ही सर्व लक्षणे मानसिक आरोग्याच्या ‌‘सायलेंट इमर्जन्सी‌’चे स्पष्ट इशारे आहेत.
 
मानसिक आरोग्य बिघडल्याने शरीरावर होणारे परिणाम तर अधिक भीषण आहेत. दीर्घ ताणामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, थकवा, पचनाच्या तक्रारी, प्रतिकारशक्ती घटणे, त्वचारोग निर्माण होणे, झोपेची समस्या वाढणे, व्यसनाधीनता ही सर्व मानसिक असंतुलनाची चिन्हे आहेत. मेंदू हा शरीराचा मुख्य अवयव असल्यामुळे, मानसिक अस्थिरतेचा परिणाम शरीराच्या प्रत्येक अवयवावर जाणवतो.
 
यावर उपाय काय? तर ताण-तणावाचे व्यवस्थापन हेच पहिले आणि शाश्वत पाऊल आहे. दीर्घ श्वसन तंत्र, योग, शारीरिक व्यायाम, झोपेची शिस्त या विज्ञानाधारित पद्धती, ताणाचे प्रमाण निर्णायकपणे कमी करतात. मानसोपचार आणि समुपदेशनामुळे मेंदूमधील विचारांच्या रचनेत सकारात्मक बदल घडवले जाऊ शकतात. आवश्यक असेल तेथे औषधोपचाराच्या मदतीने न्यूरोट्रान्समिटरचे संतुलन पुन्हा प्रस्थापितही केले जाते. जीवनशैलीतील बदलही येथे महत्त्वाची भूमिका बजावतो. यामध्ये संतुलित आहार, व्यसनापासून दूर राहणे, सामाजिक नातेसंबंध जपणे, स्क्रीन टाईम कमी करणे हे सर्व उपाय मानसिक आरोग्य सुदृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
कामगारांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यालयात मानसिक आरोग्य तपासणी, जागतिक मानसिक आरोग्य दिनासारखे उपक्रम भारतीय उद्योगजगताने गांभीर्याने स्वीकारण्याची आज गरज आहे. शेवटी, भारताचे तरुणांचा मेंदू सुदृढ नसल्यास राष्ट्राच्या प्रगतीची गती मंदावेल. मानसिक आरोग्य हा सामाजिक किंवा भावनिक विषय नाही, तो शुद्ध वैद्यकीय विषय आहे. त्यामुळे या देशासमोरील या ‌‘सायलेंट इमर्जन्सी‌’चा सामना करण्यासाठी विज्ञानाधारित, संवेदनशील आणि दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. मानसिक आरोग्याला सार्वजनिक आरोग्याच्या मुख्य प्रवाहात आणणे, हीच आता काळाची सर्वांत मोठी मागणी आहे.
 
Powered By Sangraha 9.0