सायंकाळी पक्षी विसावण्याच्या जागेला ‘रुस्टिंग साईट’ असे म्हटले जाते. अमरावती शहरातील पक्ष्यांच्या अशा विसावण्याच्या जागांची माहिती करून देणारा हा लेख...
पक्ष्यांचे काही समूह रात्रभर गावातील, शहरातील तसेच पाणवठा व नदी-नाल्यांजवळ असलेल्या झाडांवर सायंकाळ होताच समूहाने किलबिलाट करत जमा होतात. रात्रभर तेथील वृक्षांवर आश्रयाला राहून सकाळी पुन्हा वेगवेगळ्या दिशेने उडून जातात. पोपट, मैना, कावळे, बगळे, ढोकरी, करकोचे, शराटी इत्यादी पक्षी-प्रजाती सुरक्षित व रात्रीच्या निवाऱ्यासाठी आवडलेल्या झाडांवर वर्षानुवर्षे येत असतात. अशा जागेला इंग्रजीत ‘रुस्टिंग प्लेस’ म्हणतात. या स्थानासाठी ‘रातथारा’, ‘रातनिवारा’ किंवा ‘रातआसरा’ अशा शब्दांचा वापर ज्येष्ठ पक्षीअभ्यासक ‘पद्मश्री’ मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या ‘पक्षिकोश’ या पुस्तकात केला आहे.
बगळे, ढोकरी, पाणकावळे, शराटी, करकोचे इत्यादी पक्षी-प्रजाती पावसाळ्याच्या सुरुवातीला तलावाकाठच्या, नदी-नाल्यांच्या काठावरील उंच व सुरक्षित अशा देशी वृक्षांवर समूहाने घरटी बांधून पिल्लांना वाढवतात. अशा जागेला इंग्रजीत ‘हेरॉनरी’ म्हणतात. चितमपल्ली यांनी या जागेला मराठीत ‘सारंगागार’ असे संबोधिले आहे. ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने’च्या कार्याबद्दल तसेच पक्षी-अभ्यास व पक्षी-संशोधन याबद्दल आमच्याकडून जाणून घेताना मारुती चितमपल्ली नेहमी म्हणायचे की, “आपल्याला गावातील, शहरातील तसेच तलाव परिसरातील, नदीकाठावरील मोठे जुने वृक्ष वाचवायचे आहेत. तसेच, त्यांचे संवर्धनही करायला हवे. वड, पिंपळ, चिंच, कडूनिंब, बाभूळ, काटेसावर, अशा अनेक देशी वृक्षांचे पक्षिमित्रांनी संवर्धन करावे,” असे ते आवर्जून सांगत असत आणि त्यासंबंधीच्या सूचनादेखील ते नेहमीच करीत असत. आदरणीय मारुती चितमपल्ली यांच्या सूचना तसेच ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’चे वरिष्ठ पक्षीअभ्यासक तथा सदस्य शरद आपटे यांनी ‘रातथारा पक्षीगणना’ यासंदर्भात ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’च्या कार्यालयात केलेला पत्रव्यवहार पाहून आम्ही कामाला सुरुवात केली. मी आणि माझ्या मार्गदर्शनात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील बगीचे व शहर-सभोवताल असलेल्या पाणवठ्याजवळील स्थळांना भेटी दिल्या. तिथल्या ‘रातथारा’ व ‘सारंगागार’ याबाबत अभ्यास करायचे ठरवले. अमरावती शहरातील पोपट, कावळे आणि गाय बगळे यांचा ‘रातथारा’ व त्यांच्या विणीचे ठिकाण, म्हणजेच ‘सारंगागार’ याबाबतच्या नोंदी व शास्त्रीय पद्धतीने तेथील अधिवासाचा केलेला संपूर्ण अभ्यास, हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.
अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या राजापेठ, पोलीस स्थानक परिसरात रोज सायंकाळी हजारोंच्या संख्येने पोपट तेथील झाडांवर मुक्कामाला निवाऱ्याला असत. त्यांची संख्या जवळपास साडेतीन ते चार हजार इतकी आढळून आली. त्यामध्ये तिन्ही प्रजातींचा समावेश होता, करण पोपट, पोपट आणि टोई पोपट. मानेवर रिंग असलेले पोपट मात्र याठिकाणी मोठ्या संख्येने मुक्कामाला आढळून आले. राजापेठ पोलीस स्थानक हे शहराच्या वर्दळीच्या भागात असले, तरी तिथे वड, पिंपळ, कडूलिंब, इत्यादी प्रजातींचे मोठे व जुने वृक्ष आहेत. या परिसरात मोठे वृक्ष, रात्रभर प्रकाश आणि अधिकची सुरक्षितता या बाबींमुळे हे पक्षी रात्रीला इथे मुक्कामाला असतात, असेच म्हणावे लागेल.
अमरावती शहराच्या पूर्वेकडील भागात तपोवन परिसर आहे. तपोवन म्हणजे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी डॉ. पटवर्धन यांनी 1950 मध्ये स्थापन केलेले निवासी आश्रम आणि सेवा केंद्र. या परिसरात अनेक प्रकारचे जुने व उंच असे वड, पिंपळ, चिंच व सागाचे वृक्ष आहेत. तिथे अमरावती शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या गावांमधूनसुद्धा कावळे सायंकाळी मोठ्या संख्येने जमा होतात आणि तेथील वृक्षांवर रात्रीला ते निवाऱ्याला असतात. अमरावती शहरातील कावळे नेहमी सायंकाळी कुठे बसत असतील, या गोष्टीचा उलगडा करण्याकरिता मी सुटीच्या दिवशी म्हणजेच एका रविवारी सायंकाळी माझ्या घरावरून उडणाऱ्या कावळ्यांवर लक्ष ठेवून त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. जवळपास पाच ते सहा किमीवर असलेल्या तपोवन परिसरात कावळ्यांचा ‘रातथारा’ शोधण्यात मला यश मिळाले. कावळ्यांच्या रात्रीच्या बसणाऱ्या या जागेला मारुती चितमपल्लींनी ’काकागार’ असे संबोधले आहे. आणखी अशाच प्रकारचे एक कावळ्यांचे आश्रयस्थान ’काकागार’ मला अमरावती-नागपूर रस्त्यावरील मोझरी या गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रम परिसरात आढळून आले. अमरावती शहरापासून जवळच असलेल्या राजुरा, शेवती या तलावांच्या मध्य भागात असलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांवर गाय बगळे मोठ्या संख्येने जमा होतात आणि तिथेच ते रात्रीला मुक्कामी असतात. सावंगा विठोबा-तलाव परिसरात असलेल्या अर्जुन आणि चिंच या वृक्षप्रजातींवर आम्हाला रात ढोकरी या पक्ष्यांचा रातनिवारासुद्धा आढळून आला. अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावरील अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या जुन्यावडाळी बगीच्यामध्ये तेथील अशोकांच्या व पिंपळाच्या झाडावर मोठ्या प्रमाणात गाय बगळे, ढोकरी व पाणकावळे या पक्षी-प्रजातींची घरटी जून-जुलै महिन्यात पाहायला मिळाली. गाय बगळे, ढोकरी, पाणकावळे, करकोचे व शराटी यांसारख्या पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान व ‘सारंगागार’ यांची नोंद प्रथमच अमरावती शहर व सभोवतालच्या परिसरात करण्यात आली.
अमरावती शहर व परिसरात ‘रातथारा’, ‘सारंगागार’ अशा स्थळांची नोंद व शास्त्रीय पद्धतीने तेथील वृक्ष आणि अधिवासाचा अभ्यास करीत असताना असे लक्षात आले की, गावातील व शहरातील पक्षी रात्रीला सुरक्षित भागात जुन्या, मोठ्या, उंच असलेल्या देशी वृक्षांवर मुक्काम करणे पसंत करतात. त्यामुळे, गावातील, शहरातील व तलावाकाठचे देशी वृक्ष, उदाहरणार्थ चिंच, वड, पिंपळ, कडूलिंब, कवठ, काटेसावर, अर्जुन इत्यादी वृक्ष प्रजातींना संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच गावाभोवतालच्या व शहरातील उद्यानात आणि कॉलनीच्या छोट्या बगीच्यात अशा प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करून या पक्षी-प्रजातींना आपण आश्रय देऊ शकतो. एकूणच त्यांचे संवर्धन करू शकतो.
त्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षीमित्रांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत व शहरातील नगर परिषद आणि नगरपालिका यांच्या सहयोगाने मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करावी. तिथे असलेल्या उंच आणि मोठ्या अशा देशी वृक्षांना ‘वारसा वृक्ष’ असे संबोधून त्यांचे संवर्धन करावे; जेणेकरून गावातील व शहरातील पक्षी जैवविविधतेचे जतन व संवर्धन होईल. या लेखाच्या निमित्ताने नवोदित पक्षीमित्रांना ‘रातथारा’ व ‘सारंगागार’ या शब्दांची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.
- प्रा. डॉ. गजानन वाघ
(लेखक पक्षीअभ्यासक असून ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने’मध्ये कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत.)