न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी दिली 'सर्वोच्च' पदाची शपथ; सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

24 Nov 2025 12:33:59

CJI Surya Kant

मुंबई : (CJI Surya Kant)
मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी सोमवारी, दि. २४ नोव्हेंबर शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत यांना राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे पुढील १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असणार आहे.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी २३ नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर  न्यायमूर्ती सूर्य कांत यांची ३० ऑक्टोबरला देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडच्या काळातील काही सरन्यायाधीशांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाळ मोठा असेल. तो तब्बल १५ महिन्यांचा असेल, म्हणजे ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते सरन्यायाधीश असतील.

सात देशांच्या न्यायाधीशांची उपस्थिती

राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, नेते आणि माजी न्यायाधीश देखील उपस्थित होते. सूर्य कांत यांचा शपथविधी सोहळा आणखी एका कारणामुळे ऐतिहासिक ठरला आहे. कारण पहिल्यांदाच सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये सहभाग

अलीकडच्या काळात न्यायमूर्ती सूर्यकांत अनेक प्रसिद्ध प्रकरणांच्या बाबतीत चर्चेत होते. बिहारमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो संदर्भातील वाद आणि अशोका विद्यापीठातील प्राध्यापक मली खान महमूदाबाद यांना झालेली अटक, या प्रकरणांमध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.


Powered By Sangraha 9.0