‘ईडन गार्डन्स‌’वरील हाराकिरी

24 Nov 2025 11:57:57

क्रिकेट हा भारतीयांचा श्वास. पूवच्या काळी या क्रिकेट सामन्यांसाठी रस्ते ओस पडल्याचेही भारतीयांनी अनुभवले आहे. भारतीय चाहत्यांचे त्यांच्या संघावर प्रेम असून, संघांच्या कामगिरीवर ते मोकळेपणाने व्यक्त होतात. विजयी झाल्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणारे चाहते, पराभवानंतर तेवढ्याच अधिकाराने दुषणेही देतात. त्याचाच अनुभव भारतीय संघ सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ‌‘गांधी-मंडेला‌’ मालिकेमध्ये घेत आहे. या मालिकेतील ‌‘ईडन्स गार्डन‌’वर झालेल्या पराभवाची कारणे, चाहत्यांच्या प्रतिक्रिया यांचा घेतलेला मागोवा...

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात क्रिकेट हा खेळ प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या ‌‘फ्रीडम ट्रॉफी‌’अंतर्गत, दोन कसोटी सामने सध्या भारतात चालू आहेत. या लेखात क्रिकेटच्या स्पर्धांबद्दल जाणून घेणार आहोत.

फ्रीडम ट्रॉफी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेत ‌‘फ्रीडम ट्रॉफी‌’ हा करंडक, त्यातील विजेत्या संघाला दिला जातो. ‌‘गांधी-मंडेला ट्रॉफी‌’ म्हणूनही ओळखला जाणारी ही स्पर्धा, 2015 मध्ये दोन्ही राष्ट्रांच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या सन्मानार्थ सुरू झाली. तेव्हा भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट नियामक मंडळांनी अशी घोषणा केली होती की, ”भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या भविष्यातील सर्व कसोटी क्रिकेट दौऱ्यांना, ‌‘महात्मा गांधी - नेल्सन मंडेला द्विपक्षीय मालिका‌’ असे संबोधले जाईल.” अहिंसेद्वारे स्वातंत्र्य मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, या मालिकेचे नाव या नेत्यांच्या नावावर ठेवण्यात आले.

सामन्याची नाणेफेक : भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळापासूनच क्रिकेटपटूंसाठी तीर्थस्थळ असलेल्या, कोलकात्याच्या ‌’ईडन गार्डन्स‌’वर ‌‘फ्रीडम ट्रॉफी‌’ स्पर्धेच्या दोन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली. दि.14 नोव्हेंबरला सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेकही (टॉस) वैशिष्ट्यपूर्ण अशीच होती. या सामन्यात नाणेफेकीसाठी गांधी आणि मंडेला यांच्या प्रतिमा असलेले, एक सोन्याचे ‌‘स्मारक नाणे‌’ वापरण्यात आले. बंगाल क्रिकेट असोसिएशनने, भारत- द. आफ्रिकेतील दोन्ही नेत्यांचा सन्मान करण्यासाठी हे नाणे सादर केले होते. क्रिकेटमध्ये नाणेफेकीला फार महत्त्व असते. कसोटी सामने खासकरून तुम्ही भारतीय उपखंडात खेळत असता, तेव्हा हे महत्त्व अधिक वाढते. या मालिकेत भारताच्या नशिबातील नाणेफेक जिंकणे लिहिल्याचे काही दिसत नाही. कर्णधार बदलून पाहिला, मैदान बदलून बघितलं, तरीही नाणेफेकीचा कौल तोच लागतोय. समोरचा संघ नाणेफेक जिंकतोय आणि त्यांना पाहिजे तेच करतोय. ईडन गार्डन्सवरही पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून, त्यांना हवी असलेली फलंदाजीच निवडली.

ईडन गार्डन्सवरील हाराकिरी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दमदार कामगिरीनंतर, पुरुषांचा भारतीय क्रिकेट संघ ऐतिहासिक अशा ईडन गार्डन्सच्या मैदानावर, द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी उतरला होता. दि. 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे ध्येय ‌‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप‌’च्या ‌’टॉप टू‌’मध्ये स्थान मिळवण्याचे होते. ‌‘ईडन गार्डन्स‌’वरचा भारत - द. आफ्रिका क्रिकेट कसोटी सामना भारतीय संघाने केवळ अडीच दिवसांत गमावल्यानंतर, भारताच्या या हाराकिरीची कारणमीमांसा सर्वत्र सुरू झाली.

खापरफोड : हॉकीत भारत जेव्हा हरतो, तेव्हा हॉकीचे मैदान हे कृत्रिम हिरवळीवर अर्थात ‌‘स्ट्रो टर्फ‌’वर खेळवले जात असल्याने, मैदानाला कोणी दोषी ठरवत नाही. परंतु, भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हे बहुदा विदेशी असल्याने, प्रशिक्षकाच्या कामगिरीला लगेच दोष देत, त्याची अनेकदा उचलबांगडी केली जाते. हॉकीच्या विदेशी प्रशिक्षकावर त्याचे खापर फोडले जाते. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक विदेशी नसल्याने, प्रशिक्षक अनेकदा वादातून निसटतो किंवा त्याच्या एकट्यावर खापर फोडले जात नाही. मग, उरते खेळाडूंची कामगिरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खेळपट्टी. खेळपट्टी ही आपण जशी बनवू तशी बनत असल्याने, मुक्या बिचाऱ्या खेळपट्टीला कोणीच पकडू शकत नाही. मग, उरतात ती खेळपट्टी बनवणारी आणि ती निवडणारी माणसं. जेव्हा भारत जिंकतो, तेव्हा या सगळ्यांच्या दोषांवर पांघरूण घातले जाते. ड्रेसिंग रूममध्ये, तसेच संघ बैठकीत त्यावर साधकबाधक चर्चा होतेच आणि बाकीचे सगळेजण त्यातून सुटतात.

खेळपट्टी व्यवस्थापक :
आपण खो-खो, कबड्डी सारख्या पारंपरिक मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी माती पसरणे, झारीने पाणी मारणे, रोलर फिरवणे, फक्कीने मैदान आखणे अशी अत्यावश्यक कामे करत आलेलो आहोत. तशाप्रकारची कामे क्रिकेटमध्येही केली जातात. त्या अत्यावश्यक सेवेत एक महत्त्वाचे काम ‌‘क्युरेटर‌’ ही व्यक्ती, त्या-त्या सामन्याच्या प्रशिक्षकाच्या सांगण्यानुसार करत असते. क्रिकेटमधील ‌’क्युरेटर‌’ मैदानावरील खेळपट्टी आणि मैदान तयार करतो. हे लोक हवामानाचा अंदाज घेत मातीचे मिश्रण आणि गवताच्यामाध्यमातून सामन्यासाठीची योग्य खेळपट्टी तयार करतात, ज्यामुळे खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठीही योग्य ठरते. संघव्यवस्थापनाशी सल्लामसलत करूनच ‌‘क्युरेटर‌’ने बनवलेली खेळपट्टी, सामन्याच्या निकालावर परिणाम करत असते. ‌‘क्युरेटर‌’चे काम महत्त्वपूर्ण असल्याने, तो ‌‘क्युरेटर‌’ निष्णात असावा लागतो. भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी, क्युरेटरला ‌‘भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड‌’ आणि संबंधित मंडळाच्या नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागते, म्हणूनच त्यात तो तज्ज्ञ असावा लागतो.

भारताच्या हाराकिरीत ‌‘ईडन गार्डन्स‌’च्या ‌‘क्युरेटर‌’ला कोणी दोषी ठरवलेले दिसत नाही, तर प्रशिक्षकावर दोष देण्यात येत आहे. यासंदर्भात एक गोष्ट मला स्मरते. कानपूरला 2008मध्ये झालेल्या भारत-द. आफ्रिका यांच्यातील क्रिकेट कसोटी सामना, अवघ्या तीन दिवसांतच संपला होता. त्या सामन्याच्या खेळपट्टीबाबत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी विजेत्या भारताने सामना जिंकल्याचा आनंद साजरा केला होता, असे असूनही खराब खेळपट्टी तयार केल्याचा फटका असोसिएशनला बसलाच. ‌‘आयसीसी‌’कडून त्या खेळपट्टीकडे कायम संशयाच्या नजरेतून पाहिले गेले. म्हणूनच, खेळपट्टी तयार करण्यापूव संघव्यवस्थापनाकडून आगाऊ सूचना केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याची माहिती बोर्डाला असली पाहिजे. कोलकात्याची खेळपट्टी आम्हाला हवी तशीच असल्याची कबुली मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने दिल्याने, त्यावरून जोरदार टीकाही झाली. गौतम गंभीरवरच टीकेचे जास्त आसूड ओढले गेले.

ज्येष्ठांची मते : सुप्रसिद्ध क्रीडासमीक्षक आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असलेल्या पुण्याच्या सुनंदन लेले यांनी, भारताच्या हाराकिरीवर व्यक्त केलेले मत मला एकदम समर्पक वाटते. ते म्हणतात, ‌’दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद घेणाऱ्या प्रत्येकाला, ‌‘लावणाऱ्याच्या धोतरात चमनचिडी घुसणे‌’ म्हणजे काय प्रकार असतो, हे पक्के माहीत असते.‌’ अगदी तसाच प्रकार, कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होताना बघितला. भारताची फलंदाजी आता तेवढी मजबूत नाही आणि खासकरून ‌‘फिरकी‌’ला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची त्रेधा उडते हे माहीत असून, भारतीय संघव्यवस्थापनाचा ‌‘फिरकी‌’ला पोषक खेळपट्टी बनवण्याचा हट्ट अंगलट आला आहे.

गुवाहाटीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन दिवस अगोदर, सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या सीतांशू हरगोविंदभाई कोटक यांनी, ”पराभवाचे खापर फक्त गंभीरवर फोडणे बरोबर नसून, फलंदाजही कमी पडले हे लक्षात घ्यायला पाहिजे,” असे ठासून सांगितले. तसेच “कोलकात्याच्या खेळपट्टीचा स्वभाव आम्हाला अपेक्षित होता तसा नव्हता. कोणाला कसोटी सामना तीन दिवसांत संपायला आवडेल मला सांगा!” असेही कोटक म्हणाले.

कोलकात्याच्या सामन्याबाबत ‌’स्पोर्ट्सस्टार‌’साठी लिहिलेल्या स्तंभलेखातून, सुनील गावसकरने आपले मत मांडले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या अष्टपैलू खेळाडूंवर अवलंबून न राहता, मुख्य खेळाडूंवर विश्वास दाखवण्याची गरज असल्याचे मत गावस्कर यांनी मांडले आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ते अजित आगरकर यांनी संघबांधणीवर विचार करावा असे सुचवताना गावसकर पुढे लिहितात की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मी आशा करतो की, जबाबदार खेळाडूंचे डोळे उघडतील. त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष द्यावं, जे सर्व प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी तरबेज आहेत. कोणता चेंडू कधी फिरणार आणि कधी खाली राहणार, हे त्यांना चांगलंच माहीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त असणारे खेळाडू, मायदेशात कसं खेळायचं हेच विसरले आहेत.”

शुभमन ‌’हर्ट‌’ होतो तेव्हा : भारतीय कर्णधार शुभमन गिलसाठी ईडन गार्डन्सचे मैदान नेहमीच खास राहिले आहे. कारण, त्याची क्रिकेट कारकीर्द याच मैदानावरून सुरू झाली होती. त्याच ईडन गार्डन्सवर भारताने गमावलेल्या सामन्यात, कर्णधार शुभमन गिल पूर्णपणे खेळू शकला नाही. कर्णधार शुभमन गिल फक्त चार धावांच्या वैयक्तिक धावसंख्येसह ‌‘रिटायर्ड हर्ट‌’ झाला. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 15 नोव्हेंबर) पहिल्या सत्रात घडली. कर्णधार जर खेळू शकला असता, तर कदाचित एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्याने सामना वाचवण्याच्या दृष्टीने काहीतरी धडपड केली असती. पण त्याच्या ते नशिबात नव्हते. मानेच्या दुखापतीतून शुभमन गिल अद्याप बरा झाला नसल्याने. तो गुवाहाटी कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्णधारपदाची वस्त्रे आता, ऋषभ पंतच्या खाद्यांवर देण्यात आली आहेत. या निमित्ताने आपण, क्रिकेटपटू मैदानातून ‌‘रिटायर्ड हर्ट‌’ कसा होतो ते पाहू.

या रिटायर्डचे ‌‘रिटायर्ड हर्ट‌’ आणि ‌‘रिटायर्ड आऊट‌’ असे दोन प्रकार प्रचलित आहेत. यांमधील मुख्य फरक हा, खेळाडूच्या मैदानाबाहेर जाण्याच्या कारणावर अवलंबून असतो. ‌‘रिटायर्ड हर्ट‌’मध्ये खेळाडू दुखापत किंवा आजारपणामुळे बाहेर पडतो आणि तो पुन्हा खेळू शकतो. ‌‘रिटायर्ड आऊट‌’मध्ये खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय आणि संघभावना किंवा इतर कारणांसाठी बाहेर पडतो आणि जोपर्यंत विरोधी संघनेता परवानगी देत नाही, तो पर्यंत पुन्हा खेळू शकत नाही. शुभमन गिलसारखा खेळाडू ‌‘रिटायर्ड हर्ट‌’मध्ये दुखापत किंवा आजारपणामुळे खेळत नाही; पण तो पुन्हा कधीही फलंदाजी करू शकतो. यात खेळाडू बाद होत नाही; परंतु तो दुखापतीनंतर पूर्णपणे बरे झाल्यावरच सामना चालू असेपर्यंत केव्हाही परत येऊ शकतो.

‌‘रिटायर्ड आऊट‌’मध्ये दुखापत किंवा आजारपणाशिवाय इतर कोणतेही कारण देऊन खेळाडू मैदानाच्या बाहेर पडतो. यात जोपर्यंत विरोधी संघाचा कर्णधार परवानगी देत नाही, तोपर्यंत तो खेळाडू पुन्हा फलंदाजी करू शकत नाही. परिणामत: तो बादच मानला जातो आणि त्याला पुन्हा फलंदाजी करण्याची संधीही मिळत नाही, असो.

तर आता आपल्यातील कोणाला मिरची झोंबलीय, कोणता संघ खेळपट्टीचा कसा लाभ उठवत खेळतोय, हे रविवार-सोमवारपासूनच्या खेळात आपल्याला दिसेलच. ‌‘ईडन गार्डन्स‌’ वर दिसलेले चित्र भारतीय संघ बदलून दाखवण्यात यशस्वी होवो ही इच्छा बाळगत, आपण इंग्रजीत म्हणतात तसे ‌’लेट अस कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड‌’ म्हणूया...

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
संपर्क 9422031704

Powered By Sangraha 9.0