जेव्हा धर्मेंद्र दिलीप कुमार यांच्या घरात शिरले; 'अशी' झाली होती धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांची पहिली भेट!

24 Nov 2025 21:35:09

Dharmendra

मुंबई : (Dharmendra) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवार, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. धर्मेंद्र यांची सिनेकारकिर्द तशी मोठी होती. त्यांच्याविषयी अनेक किस्से सांगितले जातात. ऐन तारुण्यात ते इतके देखणे दिसायचे की, त्यांचा समावेश जगातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत झाला होता.
धर्मेंद्र यांच्या देखणेपणाची भुरळ बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनाही पडली होती. धर्मेंद्र तर दिलीप कुमार यांना आपला आदर्श मानत; पण दिलीप कुमारही त्यांच्या सौंदर्याचे तितकेच कौतुक करीत. एका कार्यक्रमात दिलीप कुमार म्हणाले होते की, जेव्हा ते देवाला भेटतील तेव्हा त्याला विचारतील की देवानं त्यांना धर्मेंद्रसारखं देखणं का नाही बनवलं. लहानपणी, एकदा धर्मेंद्र यांनी चोरून दिलीप कुमार यांचा शहीद हा चित्रपट पाहिला. या चित्रपटानं आणि दिलीप कुमार यांनी त्यांच्या मनावर जणू काही गारुडच केले होते.
जेव्हा धर्मेंद्र दिलीप कुमार यांच्या घरात शिरले...

दिलीप कुमार यांच्या द सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्रात धर्मेंद्र आणि दिलीप कुमार त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितलीय. १९५२ साली धर्मेंद्र लुधियान्यात शिक्षण घेत होते. त्याच काळात ते मुंबईला सहलीसाठी आले. दिलीप कुमार यांना भेटण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे ते थेट वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात गेले. त्या वेळी गेटवर कुठलाही सुरक्षा रक्षक नव्हता, त्यामुळे ते सरळ घरात पोहोचले. वरच्या मजल्यावर गेले असता, बेडरूमच्या दाराजवळील सोफ्यावर गोरे, सडपातळ आणि देखणे व्यक्तिमत्त्व झोपलेले दिसले. ते होते दिलीप कुमार. यावेळी दिलीप कुमार यांना अचानक एक मुलगा आपल्या बेडरुमच्या दरवाज्यात दिसल्याने धक्का बसला होता. ते घाबरून किंचाळले. ते किंचाळल्यानंतर धर्मेंद्र यांनी तिथून पळ काढला होता. ही भेट अवघी काही क्षणांची असली, तरी धर्मेंद्र यांच्या मनात मात्र ती कायमची कोरली गेली.


Powered By Sangraha 9.0