'या' चित्रपटामुळे धर्मेंद्र यांना मिळाला ही-मॅनचा टॅग; 'शोले'सोबत केली जाते तुलना

24 Nov 2025 21:03:38

Dharmendra

मुंबई : (Dharmendra)
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. बॉलिवूडमध्ये स्टारडम हे फारसे टिकत नाही. पण धर्मेंद्र यांना मिळालेले स्टारडम आजतागायत कोणाला मिळाले नाही. बॉलिवूडचे 'ही मॅन' अशी ओळख मिळवणारे धर्मेंद्र यांनी गेली अनेक दशक बॉलिवूडवर राज्य केले.

धर्मेंद्र यांनी आजवर अनेक अजरामर सिनेमे बॉलिवूडला दिले. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तब्बल ७० पेक्षाही जास्त हीट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून केली. मात्र, शोले सिनेमा त्यांच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. परंतु, धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील असा एक चित्रपट आहे ज्याची तुलना शोलेसोबत केली जाते. शिवाय याच चित्रपटामुळे इंडस्ट्रीत त्यांना हि-मॅन म्हणून ओळखले जाऊ लागलं. हा चित्रपट होता 'फूल और पत्थर' १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. या चित्रपटानं खऱ्या अर्थानं सोलो हिरो म्हणून धर्मेंद्र यांची ओळख निर्माण झाली.

या चित्रपटात एक दृश्य होतं की गुंड, दारुड्याच्या भूमिकेतील धर्मेंद्र त्यांचा शर्ट काढून एका विधवेच्या अंगावर टाकतात. त्यावेळेस कोणत्याही हिरोची अशी शरीरयष्टी नव्हती. याच चित्रपटात ही-मॅनची पहिली झलक पाहायला मिळाली. याच चित्रपटानं धर्मेंद्र यांना फिल्मफेअरचं पहिलं नामांकनदेखील मिळवून दिलं. एका मुलाखतीत स्वतः धर्मेंद्र यांनी या चित्रपटाची तुलना शोलेसोबत केली होती.


Powered By Sangraha 9.0