कासवांचे ‌’आर्ची कार‌’

24 Nov 2025 12:34:55

सध्या कोकणात सागरी कासवांच्या विणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जगात कासवांवर सर्वप्रथम काम करून त्यांना समाजमान्यता देणारे संशोधक ‘आर्ची कार‌’ यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख...

काही मंडळी या भूतलावर विविध भागांत निसर्ग हाच धर्म, ध्येय आणि छंद समजून आपले जीवन आनंदाने भरून टाकतात. याच निसर्ग आनंदाचे एक बीज आपल्या हृदयात पेरून जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आर्ची कार. दि. 16 जून 1909 या दिनी जन्मलेल्या या व्यक्तीने आपले संपूर्ण जीवन निसर्ग अभ्यासणे, संशोधन व विशेष म्हणजे समुद्री कासव संवर्धन आणि लोकचळवळ यासाठी समर्पित केले. आज जगभरात निसर्ग संवर्धन विशेषतः ‌‘समुद्री कासव संवर्धन व संशोधन‌’ व त्याचबरोबरीने निसर्गपूरक जीवनशैलीला साजेसे जीवन जगणारे स्थानिक मच्छीमार समाज आणि त्यांना संवर्धनात सामावून घेण्याचे प्राथमिक स्वरूपाचे कार्य आर्ची कार यांनी जगात पहिल्यांदा प्रकर्षाने सुरू केले. त्यांच्या कार्याची दखल घेत दि. 16 जून हा दिवस जगभरात ‌‘जागतिक समुद्री कासव दिन‌’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांचे कार्य हे इतके व्यापक आणि मूलगामी स्वरूपाचे आहे की, त्याच्या अभ्यासाने आजदेखील समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि संशोधन योजना आखताना आपणास प्रेरणा मिळते.

बालपणी आच कार आपले वडील आणि भावंडांसोबत बऱ्याच वेळ समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणे, बोटीने छोट्या-मोठ्या सफारी करणे, नदी आणि ओढ्यामध्ये तरंगणाऱ्या जलीय वनस्पती आणि शेवाळ जमा करणे त्याची निरीक्षणे नोंदवणे यात व्यतीत करत असे. आच कार यांच्या बालमनावर रुडयार्ड किपलिंग रचित ‌‘The Jungle Book‌’ या पुस्तकाचा प्रभाव खूप खोलवर पडला. फ्लोरिडा विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत असताना आपले लाडके शिक्षक बारबारीस यांच्या प्रेरणेमुळे त्यांनी विद्याथदशेतच आपल्या संशोधनाची सुरुवात केली. सरीसृप अर्थात सरपटणारे प्राणी ज्यात सर्प, सरडे, कासवे आणि बेडूक या प्राण्याचा अंतर्भाव होतो, अशा सजीव प्राण्यांवर त्यांनी सुरुवातीला काम केले.

संपूर्ण जगभरात सागरी क्षेत्रात सात समुद्री कासवांच्या प्रजाती आढळून येतात. ज्यामधील ऑलिव्ह रिडले, लेदर बॅक, लॉगर हेड, ग्रीन सी टर्टल आणि हॉक्सबिल या पाच प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात नोंदवल्या गेल्या आहेत, तर कॅम्प रिडले आणि फ्लॅट बॅक या दोन प्रजाती इतर ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत. 1942च्या सुरुवातीला सागरी कासवे आणि त्याच्या प्रजाती अनुरूप वगकरण यात बरेच संभ्रम आणि अडचणी होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला आच कार यांनी आपले पहिले सागरी कासवासंबंधीचे संशोधन प्रकाशित केले. लॉगरहेड, कॅम्प रिडले आणि ऑलिव्ह रिडले या तीन सागरी कासव प्रजातींसंबधी त्यांनी ‌‘Notes on Sea Turtle‌’ या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित केला. ज्यात त्यांनी लॉगरहेड एक गटात, तर ऑलिव्ह रिडले आणि कॅम्प रिडले यांना दुसऱ्या गटात मांडण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील आणखी एक प्रसिद्ध सरीसृप संशोधक डॉ. स्टेजनर याच्यासोबत त्याचे बरेच मतभेद झाले. परंतु, आज वर्ष 2021 मध्ये आपण लॉगरहेड प्रजातीला वैज्ञानिक भाषेत Caretta caretta व ऑलिव्ह रिडले आणि कॅम्प रिडले यांना अनुक्रमे Lepidochelys olivacea, Lepidochelys kempii असे शास्त्रीय भाषेत संबोधतो. याचा अर्थ आपण या तीन कासव प्रजाती दोन पोटजाती Caretta, Lepidochelys मध्ये अनुक्रमे वगकृत करतो.

आर्ची कार हे अमेरिकन दिग्गज समुद्रकासवतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता. विज्ञान आणि साहस यांचे मिश्रण असणाऱ्या त्यांच्या सशक्त लेखनाने जगभरातील वाचक मंडळींना भुरळ पाडली आहे, ज्यामुळे त्यांची पुस्तके डझनभर भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. जी आजदेखील बऱ्याच निसर्गअभ्यासकांना प्रेरणा देतात. एका अलीकडील संशोधन प्रकल्पात कार यांच्या आंतरराष्ट्रीय कीतची संपूर्ण कहाणी उलगडून समोर आली आहे, ज्यात त्यांच्या जगभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची पहिलीच यादी तयार झाली आहे. आच कार यांना फार मोठी देणगी होती, ती म्हणजे लेखनाची. त्यांची पुस्तके केवळ शास्त्रज्ञांपर्यंतच मर्यादित न राहता, सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचू शकली. त्यांनी चार मोठी नैसर्गिक इतिहासाची पुस्तके लिहिली, जी कालांतराने क्लासिक मानली जाऊ लागली - ‌‘हाय जंगल्स ॲण्ड लो‌’, ‌‘द विंडवर्ड रोड‌’, ‌‘उलेंडो‌’ आणि ‌‘सो एक्सलेंट अ फिशे‌’. या पुस्तकांद्वारे आणि त्यांनी ‌‘टाईम-लाईफ‌’साठी लिहिलेल्या मालिकेद्वारे त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचला.

प्रसिद्ध ‌‘टाईम-लाईफ‌’ पुस्तक मालिकेसाठी केलेल्या कामामुळे कार यांना सर्वांत मोठे जागतिक मंच मिळाले. त्यांनी तीन खंड लिहिले - ‌‘द रेप्टाईल्स‌’ (सरपटणारे प्राणी), ‌‘द लॅण्ड ॲण्ड वाइल्डलाइफ ऑफ आफ्रिका‌’ (आफ्रिकेची जमीन आणि वन्यजीव) आणि ‌‘द एव्हरग्लेड्स.‌’ ही पुस्तके जगातील अनेक देश आणि भाषांमध्ये प्रकाशित झाली. फक्त ‌‘द रेप्टाईल्स‌’ हे एकच पुस्तक चिनी, डॅनिश, डच, फिन्निश, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश अशा अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले. या ‌‘टाईम-लाईफ‌’ आवृत्त्या बहुतेकदा अमेरिकन आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षांनी प्रकाशित केल्या जात आणि ‌‘टाईम-लाईफ‌’च्या आंतरराष्ट्रीय कार्यालयांद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाई. मजकूर आणि छायाचित्रे बहुतेकदा सारखीच असत, काही वेळा शीर्षके स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण वाटावी, म्हणून बदलली जात. उदाहरणार्थ, ‌‘द एव्हरग्लेड्स‌’ची डच आवृत्ती ही ‌’फ्लोरिडा‌’स मार्शेस‌’ (फ्लोरिडाचे दलदलीचे प्रदेश) अशी होती.

आर्ची कार यांचा प्रभाव खरोखर जागतिक होता. इंटरनेटच्या युगापूवच त्यांची पुस्तके सांस्कृतिक आणि राजकीय सीमा ओलांडून गेली. त्यांनी विद्याथ, निसर्गतज्ज्ञ आणि सामान्य वाचकांना नैसर्गिक इतिहासाच्या आश्चर्यांशी आणि संवर्धनाची तातडीची गरज ओळखून दिली. ते केवळ एक स्थानिक नायक किंवा प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ नव्हते. त्यांच्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे, जे जगभरात भाषांतरित करून सामायिक केले गेले. आर्ची कार आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धनासाठी एक मार्गदर्शक आवाज बनले आणि जगातील दुमळ प्राणी आणि वन्य प्रदेशांची काळजी घेण्यासाठी अनेक पिढ्यांना प्रेरित केले.

आपल्या संपूर्ण किनारी प्रदेशात पालघरच्या ‌‘झाई‌’पासून सिंधुदुर्ग च्या ‌‘रेड्डी‌’पर्यंत समुद्री कूर्माच्या पाच प्रजातींची नोंद झाली आहे. पण दुर्दैव हे आहे की, याबद्दल स्थानिक बोली भाषेत आपल्याकडे बरीच कमी माहिती उपलब्ध आहे.

जीवशास्त्रातील बऱ्याच गोष्टी या मुळात इंग्रजीमध्येदेखील अत्यंत क्लिष्ट शब्दांत असतात; त्यातील काही बऱ्याच बाबी या समजण्यास अवघड असतात. त्यामुळे जे काही कुतूहलाचे प्रश्न आपल्याला पडत असतील, त्याबद्दलची माहिती रंजक स्वरूपात सगळ्यांना समजली पाहिजे, तरच कासव संर्वधन चिरंतन राहील. या लेखाचा प्रयत्न आपल्याला समुद्री कासवांबद्दल आणि त्यांना आपले जीवन समर्पित करणाऱ्या आच कार यांना समजून घेण्यासाठी होता. याच लेखाच्या पुढील भागात आपण ओळख करून घेऊन सतीश भास्कर यांची, ज्यांना 'father of Indian sea turtle research' असे म्हटले जाते.

- प्रदीप चोगले
(लेखक ‌‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट‌’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
9029145177

Powered By Sangraha 9.0